Vermicompost : गांडूळ खत निर्मिती तंत्र

0


गांडूळखतामध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जिवाणू असतात.त्यामुळे वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते.या मध्ये भरपूर अन्नद्रव्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रिय खत आहे.या खतामुळे जमिनीची पाणी शोषूण घेण्याची आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढल्यामुळे पाण्याची १५ ते २० टक्क्यांपर्यंत बचत होते तसेच जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीत गांडुळांची संख्या वाढण्यासाठी जमिनीवर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. गांडुळे खाद्य म्हणून याचा वापर करतात, याचे चांगल्या प्रकारचे कंपोस्ट तयार होते.


गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती :
खड्डा पद्धत:
झाडाच्या सावलीत, जनावरांच्या गोठ्याजवळ उंचवट्याच्या ठिकाणी जिथे पाण्याचा निचरा चांगला होऊ शकतो, अशा जागेत सहा ते नऊ फूट रुंद, दोन ते अडीच फूट खोल, बारा फूट लांब खड्डा खोदावा.
त्यामध्ये अर्धा फूट जाडीचा काडीकचरा व पिकांचे अवशेष यांचा थर देऊन चांगला दाबून घ्यावा. त्यावर अर्धवट कुटलेले शेणखत व चाळलेल्या वरच्या थरातील मातीचे मिश्रण ३ः१ या प्रमाणात अडीच ते तीन इंचांचा थर देऊन पाणी शिंपडून भिजवून घ्यावे. त्यावर एक ते दीड इंचाचा ताज्या शेणाचा थर द्यावा व परत हलकेसे पाणी शिंपडून ओलावून घ्यावे आणि सहा ते आठ दिवस तसेच ठेवल्यास त्यातील कुजण्याची प्रक्रिया सुरू होईल.
त्यानंतर खड्ड्यातील उष्णता कमी झाल्यानंतर प्रति चौरस फुटाला १०० पूर्ण वाढ झालेले गांडूळ सोडून सेंद्रिय पदार्थानेच झाकून घ्यावे. नियमित पाणी शिंपडून ओलावा टिकवून ठेवावा.
३० ते ४० दिवसांनी त्याच क्रमाने खड्डा सेंद्रिय पदार्थ, अर्धवट कुजलेले शेणखत व माती यांचे ३ः१ या प्रमाणात मिश्रण अडीच ते तीन इंचांचा थर व नंतर ताजे शेण एक ते दीड इंचाचा थर देऊन ओलावून घ्यावा. गोणपाटाने झाकून घ्यावे. अधूनमधून पाणी शिंपडून ओलावा टिकवून ठेवावा.
गांडुळांच्या मदतीने कुजण्याची प्रक्रिया सुरू राहते. एव्हाना गांडुळांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊन गांडूळ खतनिर्मितीची प्रक्रिया वेगाने सुरू होते.
साधारणतः दोन ते अडीच महिन्यांत १ टन चांगले कुजलेले गांडूळ खत तयार होते. एकदा खड्ड्यामध्ये भरपूर गांडूळ तयार झाल्यास नंतर एवढेच खत तयार होण्यास अवघा एक ते दीड महिन्याचा कालावधी पुरेसा आहे.


सिमेंट हौद पद्धत :
विटा, वाळू व सिमेंटचा वापर करून १२ फूट लांब, ४ ते ६ फूट रुंद व दीड ते दोन फूट उंच अशा आकाराचे सिमेंटचे पक्क्या बांधकामाचे टाके तयार करावे.
टाके भरण्यासाठी खड्डा पद्धतीत वर्णन केल्याप्रमाणे अर्धा फूट जाडीचा सेंद्रिय पदार्थांचा थट देऊन चांगला दाबून घ्यावा. त्यावर अर्धवट कुजलेले शेणखत व जमिनीच्या वरच्या थरातील चाळलेली माती यांचे ३ः१ प्रमाणातील मिश्रण अडीच ते तीन इंच थरात पसरून घ्यावे. त्यावर ताज्या शेणाचा शेणकाला करून एक ते दीड इंचाच्या थरात पसरून टाकावा. त्यावर हलकेसे पाणी देऊन ओलावून घ्यावे.
अशाच क्रमाने दुसरा थर करावा व आठ ते दहा दिवसांनंतर टाक्यातील उष्णता कमी झाल्यानंतर प्रति चौरस मीटरला १०० या प्रमाणात पूर्ण वाढ झालेली गांडुळे सोडावीत व खड्डा गोणपाटाने झाकून घ्यावा. अधूनमधून पाणी देऊन खड्ड्यात ओलावा सतत टिकून राहील, याची काळजी घ्यावी.
संपूर्ण टाक्यात मोकळ्या हवेचे व निर्माण होणाऱ्या उष्णतेचे नियमन व्हावे म्हणून टाक्यामध्ये सहभागी चहुबाजूंनी छिद्र पाडलेले पी.व्ही.सी. पाइपचे दोन फूट लांबीचे तुकडे दोन ते तीन फूट अंतरावर उभे पुरावे. यामुळे गांडुळांना खोलपर्यंत खेळती हवा मिळते व उष्णतेचे उत्सर्जन होऊन अनुकूल वातावरण निर्माण होईल.
दोन ते अडीच महिन्यांत उत्तम कुजलेले दीड ते दोन टन गांडूळ खत एका खड्ड्यातून मिळेल व टाकीत गांडुळांची संख्या वाढल्यानंतर हा कालावधी एक ते दीड महिन्यापर्यंत कमी होऊ शकतो.

गांडूळ खतांतील अन्नद्रव्ये :
अन्नद्रव्य —- गांडूळ खत

नत्र टक्के—- ०.८ – १.६

स्फुरद टक्के —- ०.५३ – ०.८०

पालाश टक्के —- १.३ – २.३

कर्ब नत्र प्रमाण —- १८.१ – २६.१

जस्त मि.ग्रॅ./ कि. —- ८२ – १०७

तांबे मि.ग्रॅ./ कि. —- १२ – २१

लोह मि.ग्रॅ./ कि. —- ३८९६ – ७३४७

मॅँगेनीज मि.ग्रॅ./ कि. —- ११० – १७२

गांडूळ खताचे फायदे :

१) गांडूळ खताच्या वापरामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मात बदल होतो.

२) जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारतो व उत्पादन क्षमता व जमिनीची सच्छिद्रता वाढते.

३)जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होऊन पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, त्यामुळे कमी पाण्यात पिकाचे उत्पादन घेता येते.

४) जमिनीमध्ये प्राणवायूचे प्रमाण वाढते, त्यामुळे जैविक क्रिया वाढते.

५)गांडूळ खतामुळे उपयुक्त जिवाणूंची संख्या ३ ते ५ पटीने वाढते.

६) पिकाच्या उत्पादनात वाढ होते, त्याचबरोबर उत्पादनातील प्रत सुधारते. विशेषतः रंग, साठवण क्षमता यामुळे उत्पादनाला जास्त बाजारभाव मिळतो.

७) रासायनिक खतवापरात बचत होऊन, खतावरील काही खर्च कमी होतो व पिकाचे उत्पादन वाढते.

सौजन्य : विकासपिडीया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »