कोथिंबीर लागवड व व्यवस्थापन 🌱
कोथिंबीरीची लागवड भारतात अनेक राज्यात केली जाते तसेच कोथिंबीरीला वर्षभर मागणी असते.कोथिंबीर पिकास थंड हवामान मानवते.कोथिंबीरीची खरीप, रब्बी आणि उन्हाळी अश तीनही हंगामात लागवड करता येते.
जमीन व लागवड 🌱 – लागवड हलक्या ते भारी जमिनीत करता येते. लागवडीसाठी सेंद्रिय पदार्थ भरपूर असलेली व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमीन नांगरून ढेकळे फोडून घ्यावीत. कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीअगोदर हेक्टरी १५ ते २० टन शेणखत घालावे. लागवडीसाठी जमीन भुसभुशीत करावी.कोथिंबीर पेरणीसाठी ३ X २ मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. कोथिंबिरीची पेरणी बी फोकून करतात किंवा २० सें.मी. अंतरावर रेषा पाडून बी पातळ पेरणी करता येते.
सुधारित जाती 🌿-
कोइमतूर-1, कोइमतूर-2, लाम सी.एस.- 2, लाम सी.एस.- 4, स्थानिक वाण, जळगाव धना, वाई धना. बी पेरणी अगोदर धणे रगडून त्यांचे दोन भाग करावे. धण्यासाठी पीक घ्यावयाचे असल्यास हेक्टरी १५ किलो बियाणे लागते. कोथिंबिरीसाठी पीक घेताना हेक्टरी ३० ते ४० किलो बियाणे पुरेसे होते.पेरणीपूर्वी बी रात्रभर भिजवून पेरल्यास बी दहा दिवसांत उगते.
पूर्वमशागत –
पूर्वमशागतीच्या वेळी शेणखत वापरावे.सेंद्रिय खते भरपूर प्रमाणात असल्यास हलक्या किंवा भारी जमिनीत कोथिंबीरीचे पिक चांगले येते. या शिवाय पेरणीपूर्वी माती परीक्षणानुसार २० किलो नत्र (४० किलो युरिया), ४० किलो स्फुरद (२४० किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व २० किलो पालाश (४० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे.पेरणीनंतर २० दिवसांनी २० किलो नत्र द्यावे किंवा एक टक्का युरियाची फवारणी करावी.
आंतरमशागत –
सुरवातीच्या काळात एक खुरपणी करून पीक तणमुक्त ठेवावे. बी पेरल्यानंतर ३५ ते ४० दिवसांनी कोथिंबीर काढणीस तयार होते.
खत व पाणी व्यवस्थापन 💦-
बी उगवून आल्यावर २०-२५ दिवसांनी हेक्टरी ४० किलो नत्र द्यावे. कोथिंबीरीचा खोडवा घ्यावयाचा असल्यास कापणीनंतर हेक्टरी ४० किलो नत्र द्यावे.
कोथिंबीरीला नियमित पाणी देणे आवश्यक आहे. सुरूवातीच्या काळात बियांची उगवण होण्यापूर्वी पाणी देताना वाफयाच्या कडेने वाळलेले गवत किंवा उसाचे पाचट लावावे.
काढणी 🌱 –
पेरणीपासून दोन महिन्यांनी कोथिंबीरीला फुले येण्यास सुरुवात होते. हिरवीगार आणि कोवळी लुसलुशीत असतानाच कोथिंबीरीची काढणी करावी.काढणी सकाळी अथवा सायंकाळी करणे योग्य असते.