श्रेयस तळपदेला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; पत्नी आनंद व्यक्त करत म्हणाली …
अभिनेता श्रेयस तळपदेला १४ डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. श्रेयसची पत्नी दीप्तीने याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत श्रेयस घरी परतल्याची आनंदाची बातमी दिली. या कठीण काळात साथ देणाऱ्या प्रत्येकाचे दीप्तीने आभार मानले आहेत.
दीप्तीने लिहिलं, “माझं जीवन, माझा श्रेयस पूर्णपणे बरा झाला आहे आणि घरी परतला आहे. कोणावर विश्वास ठेवायचा यावरून मी श्रेयसशी नेहमीच वाद घालत असे. पण आज मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. आणि ते उत्तर देव आहे. ही भयंकर घटना घडली त्या दिवशी संध्याकाळी देव माझ्याबरोबर होता. आता मी कधीच त्याच्या अस्तित्वावर शंका घेणार नाही की तो आहे की नाही. त्या संध्याकाळी ज्यांनी मला मदत केली त्या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छितो. मी एका व्यक्तीकडे मदत मागितली आणि १० हात मदतीला आले. श्रेयस गाडीच्या आत पडलेला होता, पण ते लोक कोणाला मदत करत आहेत हे त्यांना माहीत नव्हतं, तरी ते मदतीला धावून आले.”