३०३ भारतीय प्रवासी असलेल्या विमानाला फ्रान्समध्ये रोखले; मानवी तस्करीचा संशय

निकाराग्वा येथे ३०३ भारतीय प्रवशांना घेऊन जाणाऱ्या विमानाला फ्रान्स सरकारने शुक्रवारी (दि. २२ डिसेंबर) रोखले. फ्रान्समधील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या हिताची काळजी करत असताना सदर प्रकरणाची चौकशी करत असल्याचे सांगितले. “फ्रान्सच्या यंत्रणेने आम्हाला माहिती दिल्यानुसार, दुबई ते निकाराग्वा प्रवास करणाऱ्या विमानात ३०३ प्रवासी असून त्यापैकी बहुतांश भारतीय नागरिक आहेत. तांत्रिक तपासासाठी या विमानाला रोखण्यात आले आहे. भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांचा चमू विमानतळावर पोहोचला असून कॉन्सुलर ॲक्सेस देण्यात आला आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत असून प्रवाशांची काळजी घेत आहोत”, अशी भूमिका फ्रान्समधील भारतीय दुतावासाने एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट टाकून मांडली.

निकाराग्वाला जाणारे चार्टर विमान फ्रान्सकडून रोखण्यात आले आहे. दुबई ते निकाराग्वा असा प्रवास करण्याच्या उद्देशांची न्यायालयीन तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी रॉयटर्स वृत्त संस्थेला दिली.

संघटित गुन्ह्यांचा माग काढणाऱ्या तज्ज्ञ विभागाने मानवी तस्करीच्या संशय घेऊन तपास केला आणि चौकशीअंती दोघांना अटक केली आहे. पॅरिस सार्वजनिक अभियोग कार्यालयाने सांगितले की, अज्ञात माहितीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारावर सदर कारवाई करण्यात आली.

रोमानियन चार्टर लीजेड एअरलाइन्स कंपनीच्या विमानाने दुबईहून उड्डाण घेतले होते. गुरुवारी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तांत्रिक थांब घेण्यासाठी पॅरिसमधील स्मॉल व्हॅट्री विमानतळावर सदर विमानाला रोखण्यात आले, अशी माहिती फ्रान्सच्या मार्नमधील प्रीफेक्ट कार्यालयाने दिली. व्हॅट्री विमानतळावरील रिसेप्शन सभागृहाचे प्रतिक्षालयात रुपांतर करण्यात आले असून तिथे प्रवाशांची काळजी घेतली जात आहे, असेही प्रीफेक्ट कार्यालयाने सांगितले.

पत्रकार -

Translate »