प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अल्पवयीन मुलीला साडेतीन लाखांना लुबाडले …

0

अनेकदा मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्यानंतर मुलींची शारिरीक आणि आर्थिक फसवणूक केली जाते. मीरा रोडमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. या घटनेत प्रियकराने त्याच्या मित्रांच्या साथीने एक अजब योजना बनवली. मुलीचा प्रियकर नशामुक्ती केंद्रात असून त्याला सोडविण्यासाठी चक्क साडेतीन लाख उकळले. या मुलीने २१ हजार रोख आणि दागिने देऊन टाकले होते.

मीरा रोड येथे राहणार्‍या मुलीला रोहीत कावा या तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला. मुलगी पूर्णपणे जाळ्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर कावा आणि त्याचा मित्र विपुल सिंग तसेच एका तरुणीने योजना बनवली. रोहीत नशा मुक्ती केंद्रात असून त्याला सोडविण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. आपला प्रियकर अडकल्याचे तिला खरे वाटले. ती पीडित मुलगी या दोघांना भेटायला बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (नॅशनल पार्क) गेली. आरोपींनी तिला भावनिक आवाहन करून तिच्याकडून ३ लाख ९ हजारांचे दागिने काढून घेतले. त्यात सोन्याचे ब्रेसलेट, कानातील झुमके, सोनसाखळी, चांदीचे पायल आदींचा समावेश होता. याशिवाय तिच्या फोनमधून २१ हजार रुपये फोन पे करण्यास सांगितले, तसचे १२ हजार रोख रक्मकही घेतली. आरोपींनी पीडित मुलीकडून एकूण ३ लाख ३८ हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम उकळली.

नंतर हा प्रकार बनावट असल्याचे पीडितेच्या लक्षात आले. तिने याप्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिने दाखल केलेल्या तक्रारीवरून रविवारी रात्री रोहीत कावा, विपुल सिंग आणि एका तरुणीविरोधात फसवणुकीच्या कलम ४२०, ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी पीडितेच्या परिचयाचे आहेत. रात्रीच गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास केल्यानंतर नेमकी किती फसवणूक केली, अन्य कुणा मुलींची फसवणूक झाली आहे का ते स्पष्ट होईल, असे या प्रकरणाचा तपास करणारे मीरा रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल साळुंखे यांनी सांगितले.

Story img Loader

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »