तंत्र नाचणी/नागली लागवडीचे

Nagali
नाचणीचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित जातींची लागवड करावी. पाभरीने पेरणी केल्यास हेक्टरी दहा किलो, तर पुनर्लागवड पद्धतीने पाच किलो बियाणे लागते. रासायनिक खतांची बचत करण्यासाठी युरिया, डीएपी ब्रिकेटचा वापर करावा. नाचणी लागवडीसाठी हलक्या ते मध्यम प्रतीची, चांगले सेंद्रिय पदार्थ असणारी, ५.५ ते ८.५ सामू असणारी जमीन योग्य असते. जमिनीची नांगरट करून पुरेसे शेणखत मिसळावे. हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास शेणखत किंवा कंपोस्ट खत देण्याची गरज नाही. जमिनीतील पूर्वीच्या पिकाची धसकटे, पालापाचोळा गोळा करून जाळून टाकावा, त्यामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव होत नाही.
🙋♂️लागवड तंत्र
३० x १० सें.मी. अंतरावर पाभरीने पेरणी केल्यास हेक्टरी दहा किलो बियाणे लागते.
पुनर्लागवड पद्धतीने बियाणे पेरणी केल्यास पाच किलो प्रतिहेक्टरी बियाणे लागते. जास्त पर्जन्यमान असलेल्या भागात बियाणे गादी वाफ्यावर पेरून शेतात त्याची पुनर्लागवड करावी.
▪️बीजप्रक्रिया : तीन ग्रॅम थायरम प्रतिकिलो बियाणे. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास २५ ग्रॅम ॲझोस्पिरिलम ब्रासीलेन्स आणि २५ ग्रॅम ॲस्परजीलस ओवोमोरी या जिवाणूसंवर्धकांची प्रक्रिया करावी.
गादीवाफे तयार करण्यासाठी रोपवाटिका तयार करावी. ५ x १ मी. आकाराचे गादी वाफे तयार करून बियाणे पेरण्याच्या रेषेत क्लोरपायरिफॉस (१.५ डब्लूपी) १२ ग्रॅम भुकटी (उपलब्ध असल्यास) बारीक वाळूत मिसळून पेरावी. म्हणजे पेरलेल्या बियाण्यास किडी, मुंग्यांचा प्रादुर्भाव होणार नाही.
हळव्या जातीची रोपे २१ दिवसांची झाल्यानंतर २२.५ सें.मी. बाय १० सें.मी. अंतरावर पुनर्लागवड करावी. गरव्या व निमगरव्या जातीची लागवडीसाठी रोपे २५ ते ३० दिवसांची वापरावीत.
खतमात्रा
▪️रोपवाटिका : एक हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी पाच गुंठे रोपवाटिका पुरेशी होते. पाच गुंठे क्षेत्र रोपवाटिकेसाठी पाच क्विंटल शेणखत गादी वाफ्यावर मिसळावे. बियाणे गादी वाफ्यावर पेरणी केल्यानंतर १० ते १२ दिवसांनी प्रतिगुंठा ५०० ग्रॅम युरिया द्यावा.
पुनर्लागवड : पुनर्लागवडीपूर्वी प्रतिहेक्टरी पाच टन शेणखत जमिनीत मिसळावे. हेक्टरी २५ किलो नत्र, ४० किलो स्फुरद, २५ किलो पालाश पुनर्लागवडीच्या वेळी द्यावे. राहिलेले २५ किलो नत्र प्रतिहेक्टर पुनर्लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे.
आंतरमशागत लागवडीनंतर साधारणपणे दोन वेळा खुरपणी करावी. पेरणी दाट झाली असल्यास पहिल्या २० ते २५ दिवसांपर्यंत विरळणी करून एका जागी एकच जोमदार रोप ठेवावे. कारण दाट पेरणी झाल्यास फुटवा कमी होऊन उत्पादन घटते. युरिया, डीएपी ब्रिकेटचा वापर
गादी वाफ्यावर रोपे २५ ते ३० दिवसांची झाल्यानंतर शेतामध्ये रोपांची पुनर्लागवड २० x ४० सें.मी. जोडओळ पद्धतीने करावी.
दोन ओळींतील अंतर २० सें.मी. ठेवून शिफारशीत खतमात्रेच्या ७५ टक्के खतमात्रा (नत्र ४५ किलो अधिक स्फुरद २२.५ किलो प्रतिहेक्टर) ब्रिकेट स्वरूपात द्यावी.
ब्रिकेट देताना २० सें.मी.च्या जोडओळीत ३५ सें.मी. अंतरावर ५ ते ७ सें.मी. खोलीवर २.७ ग्रॅमची एक ब्रिकेट खोचावी.
रोग नियंत्रण करपा रोगकारक बुरशी : पायरिक्युलारिया इल्युसिनी लक्षणे
रोपवाटिकेत रोप उगवल्यानंतर दोन आठवड्यांनी रोगाचा प्रादुर्भाव होऊन लगेचच त्याचा प्रसार रोपवाटिका आणि संपूर्ण शेतात होतो.
पानावर लहान, गोलाकार ते लंबगोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. नंतर ठिपके दंडाकृती होतात.
रोपाची नवीन पाने पूर्णतः वाळून जातात. पुनर्लागवडीनंतर मुख्य शेतातदेखील असे दंडगोलाकार ठिपके पानांवर दिसतात. त्यानंतर ते वाढत जाऊन एकमेकांत मिसळतात. संपूर्ण रोप वाळलेले दिसते.
उपाय मशागत पद्धतीने नियंत्रण
▪️रोगविरहित बियाणे पेरणीकरिता वापरावे.
फुले नाचणी, सी.ओ.आर.ए. (१४), आर.ए.- २, जी.पी.यू.- २८, जी.पी.यू,- ४५, जी.पी.यू.- ४८ व एल- ५ यांसारख्या रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी.
पुनर्लागवडीवेळी दोन रोपांतील अंतर योग्य ठेवावे.
पेरणी लवकर करावी.
▪️जैविक रोगनियंत्रण
सुडोमोनस फ्लुरोसन्स या जैविक बुरशीनाशकाची ६ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे प्रक्रिया.
सुडोमोनस फ्लुरोसन्स या जैविक बुरशीनाशकाच्या २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी
या प्रमाणात तीन फवारण्या. पहिली फवारणी रोगाची लक्षणे दिसून
आल्यानंतर लगेच करावी. दुसरी व तिसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.
▪️रासायनिक रोगनियंत्रण
▪️कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास प्रक्रिया.
रोपवाटिकेत पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी. पुनर्लागवडीनंतर २० ते २५ आणि ४० ते ४५ दिवसांनी वरील फवारणी पुन्हा करावी.
पर्णकोष करपा रोगकारक बुरशी : ड्रेचस्लेरा नोड्युलोसम लक्षणे
▪️कोवळ्या तसेच जुन्या रोपांवर प्रादुर्भाव. रोपांवर लहान, अंडाकृती, फिकट तपकिरी रंगाचे ठिपके तयार होऊन कालांतराने ते गडद तपकिरी होतात. अनेक ठिपके एकत्र येऊन पानावर मोठा ठिपका तयार होतो. अशी पाने परिपक्व होण्यापूर्वी गळून पडतात. रोपाची मर होते.
मोठ्या, पूर्ण वाढलेल्या पानावर गडद आयताकृती ठिपके तयार होतात. मानेचा भाग फिकट तपकिरी ते गडद तपकिरी होऊन मानेतील पेशी ठिसूळ बनतात. लोंब्या मानेभोवती मोडून लटकलेल्या दिसतात.
▪️उपाय
रोगट रोपे उपटून नष्ट करावीत.
थायरम ४ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास प्रक्रिया. मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी.
🙋♂️सुधारित जाती
अ) हळवी जात – –
▪️व्ही.आर. ७०८
९० ते १०० १२ ते १५ हलक्या जमिनीस योग्य करपा रोगास प्रतिबंधक
पीईएस ४०० ९० ते १०० १२ ते १५ हलक्या जमिनीस योग्य करपा रोगास प्रतिबंधक
ब) निमगरवी जात
▪️आरएयू-८
१०० ते ११० २५ ते ३०
मध्यम खोल जमिनीस योग्य व उत्पादनक्षम जात, रासायनिक खतास व व्यवस्थापनास प्रतिसाद देणारी जात.
▪️एच.आर. ३७४
१०० ते ११० १० ते १२ मध्यम खोल जमिनीस योग्य व उत्पादनक्षम जात, रासायनिक खतास व व्यवस्थापनास प्रतिसाद देणारी जात.
▪️दापोली १
१०० ते ११० १५ ते २० मध्यम खोल जमिनीस योग्य व उत्पादनक्षम जात, रासायनिक खतास व व्यवस्थापनास प्रतिसाद देणारी जात.
क) गरवी जात
▪️पीआर २०२
१२० ते १३० २७ ते ३० उशिरा पक्व होणारी जात.दीर्घकाळ व जास्त पाऊस प्रदेशास योग्य. कोरडवाहू व बागायतीस योग्य.
▪️पीईएस ११०
११५ ते १२५ २४ ते ३६ उशिरा पक्व होणारी जात.दीर्घकाळ व जास्त पाऊस प्रदेशास योग्य. कोरडवाहू व बागायतीस योग्य.
▪️इंडाफ-८
११५ ते १२५ २२ ते २५ उशिरा पक्व होणारी जात.दीर्घकाळ व जास्त पाऊस प्रदेशास योग्य. कोरडवाहू व बागायतीस योग्य.
Source:
विनोद धोंगडे 'नैनपुर
ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर
📞९९२३१३२२३३