Hailstorm Satara News : सातारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट
Hailstorm Satara News : सातारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट
खंडाळा तालुक्यातील पाडळी व बोरी परिसराला रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जोराचा वारा आणि गारपिटीने झोडपले.
Satara News जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. १६) वादळी वाऱ्यासह गारपीट व पाऊस झाला आहे. महाबळेश्वर, वाई, खंडाळा, माण तालुक्यांत काही ठिकाणी वादळी वारे, गारपिटीसह (Hailstorm) जोरदार पाऊस झाला आहे.
डाळिंब, टोमॅटो, मका, केळी, आंबा, घास, भेंडी, कांदा, गवार, ऊस आदी उन्हाळी पिकांना या गारपिटीने अक्षरशः झोडपल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत.
खंडाळा तालुक्यातील पाडळी व बोरी परिसराला रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जोराचा वारा आणि गारपिटीने झोडपले.
शेतात व डोंगर परिसरात सर्वत्र सहा ते सात इंचांपर्यंत, तर सखल भागात गुडघ्यापर्यंत गारांचा खच पडल्याने येथे जणू मिनी काश्मीरच अवतरल्याचा प्रत्यय येथील नागरिकांना आला.
दरम्यान, उन्हाळी पिकांना या गारपिटीने अक्षरशः झोडपल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत.
रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तालुक्यातील पाडळी, बोरी, सुखेड, कोपर्डे, हरळी, घाटदरे, भोसलेवाडी, धावडवाडी, अहिरे परिसरांत जोरदार वाऱ्यासह ढगांचा गडगडाट व विजांच्या लखलखाटात जोरदार पाऊस झाला.
पाडळी व बोरी येथे तर गारांचा मोठा पाऊस झाला. पाडळी गाव गारांच्या पावसाचा केंद्रबिंदू होते.
शेतात व डोंगर परिसरात गारांचा खच पडल्याने येथील शिवारात जणू पांढरी शाल पांघरल्याचे चित्र निर्माण झाले होते. वाई शहर व परिसरात विजेच्या कडकडाटात व वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले.
काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वाई तालुक्याच्या पश्चिम भागातही जोरदार पाऊस झाला. चिखली परिसरात गारांचा सडा पडला. ठिकठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले. पाचगणी शहर व परिसराला आज बेफाम पावसाने झोडपून काढले.
गारांचा वर्षाव, विजांचा कडकडाट, पाण्याचे लोट, ठिकठिकाणी झाडे पडणे यामुळे अक्षरशः नागरिकांची दाणादाण उडाली. या पावसाने आज स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान झाले. पावसाने ग्रामीण भागातील स्ट्रॉबेरी पिकाचा शेवट झाला. स्ट्रॉबेरी शेतात गारांचा खच पडल्याने हे पीक संपले आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏