मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज..⛈️
मागील चार दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात काही भागांमध्ये पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाली. हवामान विभागाने आज आणि उद्या मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज दिला. तर विदर्भात आज काही ठिकाणी गारपीट होऊ शकते, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज दिला.
हवामान विभागाने वर्तवलल्या अंदाजात पुढच्या पाच दिवसांसाठी तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. हा इशारा देतानाच पुढच्या एक ते दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील काही ठिकाणी मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
नांदेड, लातूर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ आदी ठिकाणी पुढचे एक ते दोन दिवस सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.यातील काही ठिकाणी प्रति तास ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात, असेही आयएमडीने म्हटले आहे.
20 ते 26 मार्च या कालावधीत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या पूर्वोत्तर आणि पूर्व भारतीय राज्यांमध्ये गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.