Manmad : वागदर्डी धरणाने गाठला तळ, केवळ मृतसाठा शिल्लक..
मनमाड : मनमाडची पाणीटंचाईचे शहर अशी ओळख आहे.मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ गाठला असून, केवळ मृतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुन्हा पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.यंदा मार्चच्या अखेरीस मनमाडकरांना पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.पाणीच नसल्याने पालिकेतर्फे महिन्यातून एकदा पाणीपुरवठा केला जात असून, मनमाड शहरावरील घोंगवणारे पाणी संकट पाहता पालखेड धरणातून हंगामाचे शेवटचे आवर्तन सोडण्यात आले आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
सुमारे ११० दशलक्ष घनफूट साठवणूक क्षमतेच्या मनमाड येथील वागदर्डी धरणात व त्याच्याशी संलग्न १६ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या पालखेड साठवणूक तलावात सध्या मृत जलसाठा शिल्लक असून अनेकदा मनमाडकरांना गढूळ पाणी नळाद्वारे येत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचे रुग्ण सध्या शासकीय व खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
शहराला सध्या २२ ते २४ दिवसाआड एक वेळ अनियमित आणि अशुध्द असा पाणी पुरवठा सुरू आहे. त्यातच वागदर्डी धरणांतून शुध्दीकरण केंद्रात पाणी उचलणारे आठपैकी निम्मे वीज पंप बंद ठेवण्यात आले आहेत.पालखेडचे आवर्तन सोडण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार सोमवारी पालखेडचे पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.
सदर पाणी तीन दिवसांनी अर्थात ७२ तासांनी पाटोदा तलावात पोहचणार आहे.पालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचे पाणी गढूळ येत आहे. सदर पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, यासाठी पाण्याचे नमुने तपासले असून, पिण्याच्या पाण्याची कुठलीही गुणवत्ता कमी झालेली नसल्याचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी सांगितले. मात्र, दुषित पाण्याच्या भितीने अनेकांनी जारला पसंती दिली आहे.