Nashik Rain : पुढील तीन दिवस नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट, वाचा सविस्तर
आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी दुपारी तीननंतर नाशिकमध्ये अचानक मुसळधार पाऊस झाल्याने शहरात खळबळ उडाली. सुट्टीचा दिवस असल्याने घराबाहेर पडलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. सिडको, सातपूर, नाशिकरोड आणि पंचवटी परिसरात पाणी साचून रस्ते बुडाले. हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ आणि गुरुवारी ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे, याचा अर्थ जिल्ह्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास लवकरच सुरू होणार आहे. त्याआधी, अंदमान समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. नाशिकमध्ये सोमवार ते बुधवार या कालावधीत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता असून, हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे. परतीचा पाऊस २६ सप्टेंबरनंतर सुरू होईल आणि सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात ऊन व ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या आहेत. नाशिकमधील विंचूर येथे ३८ मिलिमीटर, तर देवगाव, नांदूर, रानवड, लासलगाव, वडाळी, नगरमधील पारनेर, निघोज, कुंभळी, मिरजगाव, पुण्यातील माळेगाव, पणदरे, उंडवडी येथे हलका पाऊस झाला. सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. सोलापूरमधील हातीद येथे ५० मिमी, सातारातील मायणी येथे ५७ मिमी, तर सांगलीतील वायफळे आणि करंजे येथे ७९ मिमी पाऊस नोंदवला गेला. या पावसामुळे शेतकऱ्यांना शेतमाल झाकण्यासाठी धावपळ करावी लागली.
हवामान विभागाने आज, ता. २३ रोजी राज्यात विजांसह मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी केला आहे.आज, ता. २३ रोजी राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित राज्यातही विजांसह पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस पुढील तीन ते चार दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे.