Maharashtra News : कांद्याचे भाव टिकून राहतील का? कांद्याची रेल्वेने वाहतूक नोव्हेंबरला सुरू होण्याची शक्यता..
सध्या कांद्याचे भाव काहीसे टिकून होते. बाजारातील कांद्याची आवक मर्यादीत होत आहे. मात्र तरीही वाढलेल्या भावात पुढे मागणी कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. परिणामी कांद्याचे भाव स्थिरावले आहेत. आजही बहुतांशी बाजारात कांद्याला सरासरी ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कांद्याच्या भावात पुढील काळात चांगली तेजी येऊ शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशभरात कांद्याचे भाव वाढल्याने आणि बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक कमी झाल्याने, गेल्या तीन महिन्यांपासून रेल्वेने कांदा वाहतूक बंद झाली आहे. रेल्वे विभागाने याबाबत व्यापारी आणि कार्डिंग एजंट यांच्याशी चर्चा केली असून, नोव्हेंबरपासून कांद्याची वाहतूक पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
लासलगाव, मनमाड आणि अंकाई किल्ला परिसरातील कांदा व्यापारी आणि कार्टिंग एजंट यांनी कांद्याच्या लोडिंगबाबत एक बैठक घेतली. सध्या रब्बी उन्हाळ कांद्याची आवक कमी झाल्यामुळे कांद्याचे लोडिंग कमी झाले आहे. नवीन खरीप कांदा नोव्हेंबरच्या मध्यापासून बाजारात येण्याची शक्यता असल्याने, व्यापारी आणि कार्टिंग एजंट यांनी नोव्हेंबरपासून कांद्याचे लोडिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत कांदा वाहतुकीदरम्यान येणाऱ्या अडचणी आणि रेल्वे प्रशासनाकडून कोणत्या अपेक्षा आहेत याबाबतही चर्चा झाली.
लासलगाव आणि कसबे सुकेणे येथील कांद्याच्या लोडिंगची पाहणी करून, रेल्वे प्रशासनाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, दिल्ली, पंजाब, हरियाणा, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्ये कांदा पाठवण्याची व्यवस्था केली आहे.रेल्वे प्रशासनाने यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.