kharif Sowing : पेरणीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना पावसाची आशा

kharif Sowing : पेरणीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना पावसाची आशा

Kharif Season Update : नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाच्या नेहमीच घसरणाऱ्या दरामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे.
Amravati News : रब्बी हंगामातील शेतमालाला देखील अपेक्षित भाव मिळाला नाही. परिणामी याची भर काढण्याकरीता बळीराजा पुन्हा जोमाने खरिपाच्या तयारीला लागल्याचे चित्र भातकुली तालुक्यात पाहावयास मिळत आहे. खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना आशा लागून आहे.
नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाच्या नेहमीच घसरणाऱ्या दरामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. पूर्वी जमिनीची मशागत बैलजोडीने केली जात होती. त्यामुळे शिवारामध्ये या महिन्यात बैलाच्या गळ्यातील गोंघर-घंटीचा मंजूळ आवाज ऐकावयास मिळत असे.
परंतु बदलत्या काळानुसार व विज्ञान युगामध्ये शेतीची मशागत ट्रॅक्टरच्या साह्याने केली जाऊ लागल्यामुळे आता बैलांची संख्या कमी झाली. अगदी मोजक्या शेतकऱ्याकडे बैलजोडी दिसून येते.
विज्ञान युगामध्ये अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने शेती केली जात असली तरी ठरावीक कामे बैलांच्या साह्याने केली जातात. आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहे. त्यामुळे जमिनीची मशागत ट्रॅक्टरने होत आहे. परंतु डिझेलवाढीचा देखील त्यांना फटका सहन करावा लागला.
चालूवर्षी डिझेलचे भाव वाढल्यामुळे जमीन नांगरणीच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षापर्यंत एकरी पंधराशे भाव होता. चालूवर्षी त्यात वाढ होऊन दोन हजारांवर पोहोचला. सर्वसामान्य शेतकऱ्यांना हा दर परवडणार नाही. मालाला भाव मिळत नाही. अशाही परिस्थतीत तो संघर्ष करीत पुन्हा जोमाने कामाला लागल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे.
उन्हाळी कांद्याची काढणी होऊन भावाअभावी कांदा शेतकऱ्यांनी फेकून दिला. ही सर्व संकटे पचवित शेतकऱ्यांनी शेती मशागतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. नांगरणी झाल्यावर त्याची वखरणी करून त्यात शेणखत मिळवण्याची कामे करीत आहे.
पुन्हा जमीन बैलजोडीच्या साह्याने किंवा ट्रॅक्टरने कामे सुरू आहेत. चालू वर्षी शेतीत पिकविलेल्या कोणत्याही मालाला भाव नसल्याने आता खरिपात कोणते पीक घ्यावे याची चिंता काही शेतकऱ्याला सतावत आहे.
हवामानाच्या लहरीपणामुळे आर्थिक नियोजन बिघडले
हवामानाच्या लहरीपणामुळे दोन-तीन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हाती पिके न आल्यामुळे तो आर्थिक संकटात आहे.
शेतीमालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, शेतकऱ्याने लागवड केलेला भाजीपाल्याला भाव नाही, कांदा विकून आलेल्या अल्पशा पैशातून बी-बियाणे, खते, मजुरीचे पैसे कोठून देणार याचे आर्थिक नियोजन पूर्णपणे बिघडले आहे. कुणाकडे उसनवार पैसे मिळतील व त्यातून बियाणे खरेदी करता येईल म्हणून शेतकरी फिरताना दिसत आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

Translate »