Sarpanch Salary: ग्रामपंचायतींचे नेतृत्व करणारे सरपंच व उपसरपंच यांना किती मानधन मिळतं? जाणून घ्या सविस्तर…
गावातील लोकसंख्येनुसार सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन ठरवले जाते. ग्रामपंचायतीचा प्रमुख म्हणून सरपंच सर्व प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा भार सांभाळतो. ग्रामसेवक त्यांना या कामात मदत करतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार, सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन वाढवण्यात आले आहे.
सोमवारी (२३ सप्टेंबर) मुख्यमंत्र्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करून मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. यापैकी एक निर्णय राज्यातील सर्व सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्याबाबतचा होता. या वाढीमुळे आता सरपंच आणि उपसरपंचांना किती मानधन मिळते हे जाणून घेऊया.
आतापर्यंत ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या दोन हजार होती, त्यांच्या सरपंचांचे मानधन तीन हजार रुपयांवरून वाढवून सहा हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच,उपसरंपचाचे मानधन १००० रुपये होते आता मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.२ हजार ते ८ हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे मानधन आता ४ हजार रुपयांवरून वाढवून ८ हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच, उपसरपंचांचे मानधन १५०० रुपयांवरून वाढवून ३ हजार रुपये करण्यात आले आहे. ८ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे मानधन ५ हजार रुपयांवरून १० हजार रुपये आणि उपसरपंचांचे मानधन २ हजार रुपयांवरून ४ हजार रुपये करण्यात आले आहे.
सरपंचाची कामे व जबाबदाऱ्या काय असतात?
ग्रामपंचायतीचे नेतृत्व:
सभा: ग्रामपंचायतीच्या सभा बोलावणे आणि त्यांचे अध्यक्षपद भूषविणे.
ग्रामसभा: ग्रामसभा आयोजित करणे आणि त्यांचे अध्यक्षपद भूषविणे. सभेत घेतलेले निर्णय अंमलात आणणे.
ग्रामविकास समिती: महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांतर्गत स्थापन केलेल्या ग्रामविकास समितीचे अध्यक्ष म्हणून काम करणे.
ग्रामपंचायतीचे प्रशासन:
मालमत्ता: ग्रामपंचायतीच्या मालमत्तेची देखभाल आणि सुरक्षा सुनिश्चित करणे.
अंदाजपत्रक: ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे आणि ते मंजूर करण्यासाठी सादर करणे.
लेखासंहिता: महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नुसार आर्थिक व्यवहार करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे.
ग्रामसूची: महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ४५ नुसार सर्व कामे करणे.
गावाचा विकास:
विकास आराखडा: गावचा विकास आराखडा तयार करणे.
योजनांची अंमलबजावणी: ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीच्या मदतीने सर्व योजनांची अंमलबजावणी करणे.
वंचित घटकांसाठी योजना: शासकीय योजनांचा लाभ वंचित घटकांना मिळवून देणे.
कार्यकारी अधिकार:
कर्मचारी आणि सदस्य: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे व सदस्यांचे प्रवास भत्ता व देयके मंजूर करणे.
नोट: ही माहिती सर्वसाधारण स्वरूपाची आहे. प्रत्यक्षात सरपंचाच्या जबाबदाऱ्या त्यांच्या कार्यक्षेत्र आणि राज्य सरकारच्या नियमावलीनुसार बदलू शकतात.