MPSC Result : राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर; महेश घाटुळे अव्वल तर वैष्णवी बावस्करची मुलींमध्ये बाजी
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 चा सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. या यादीत महेश अरविंद घाटुळे यांनी प्रथम, प्रितम मधुकर सानप यांनी द्वितीय आणि वैष्णवी हरिभाऊ बावस्कर यांनी मुलींमध्ये प्रथम स्थान प्राप्त केले आहे.आता या सर्वसाधारण गुणवत्ता यादीत असलेल्या उमेदवारांना आपले पसंतीचे पद निवडण्याची संधी मिळणार आहे. यानंतर आयोग अंतिम निकाल जाहीर करेल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट अ आणि गट बच्या 303 पदांसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. पालघरच्या अमित मोतीराम भोये यांनी अनुसूचित जमाती प्रवर्गातून चौथा क्रमांक पटकावला आहे. ही गुणवत्ता यादी तात्पुरती असून, उमेदवारांना लवकरच आपले पसंतीचे पद निवडण्याची संधी मिळेल.
अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेल्या माहितीची पडताळणी केली जाते. या पडताळणीत काही उमेदवारांची माहिती चुकीची आढळून आल्यास त्यांचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो किंवा त्यांना परीक्षेपासून अपात्र ठरवले जाऊ शकते. प्रशासकीय कारणांमुळे बैठक क्रमांक PN005080 चा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे.ही गुणवत्ता यादी कोर्टात चालू असलेल्या काही प्रकरणांच्या निकालावर अवलंबून आहे. उमेदवारांना लवकरच आपले पसंतीचे पद निवडण्याची संधी मिळेल. त्यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवालही विचारात घेतला जाईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा आता 1 डिसेंबर रोजी होणार आहे. ही परीक्षा दोन वेळा पुढे ढकलली गेली होती. यावेळी कृषी सेवेतील 258 नवीन पदांचा समावेश करण्यात आला आहे.