Maharashtra Rain Update: कधी परतणार मान्सून? पावसाचा जोर कधीपर्यंत राहणार?
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस चांगलाच सक्रीय झाला असून दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात यंदा दमदार पाऊल झाला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी हे धरण भरलं आहे. जयकवाडीसह मराठवाड्यातील अनेक लहान-मोठी धरणं आणि बंधारे भरले आहेत. मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना बुधवारी (२४ सप्टेंबर) पावसाने जोरदार झोडपले आहे.
कोकणात अतिवृष्टी
ज्याला दुष्काळी क्षेत्र म्हणून ओळखले जाते, त्या भागात यंदा पावसाने चांगलाच हजेरी लावली आहे. जयकवाडी धरण तर ओव्हरफ्लो होण्याच्या स्थितीत आहे. याशिवाय इतर लहान-मोठी धरणं आणि बंधारेही पाण्याने भरली आहेत. नद्यांनाही भरपूर पाणी मिळाल्याने ओला दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होईल का, अशी भीती व्यक्त होत आहे. दुसरीकडे, मुंबई आणि पुणे या शहरांवर बुधवारी पावसाचा जोरदार वर्षाव झाला.
कोकणात बुधवारी संध्याकाळी जोरदार पाऊस झाला, तर मुंबई आणि परिसरात तर मुसळधार पाऊस कोसळला. मुंबई आणि उपनगरात अंदाजे १७० मिलिमीटर पाऊस झाला. इतर भागांत पाऊस कमी प्रमाणात होता. ठाणे जिल्ह्यात पावसाने नद्यांना पूर आला. रत्नागिरीतील जगबुडी नदी इशारा पातळीवर पोहोचली. रायगडमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे भात पिके खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. सिंधुदुर्गमध्ये गेल्या काही दिवसांच्या तुलनेत पाऊस कमी झाला असला तरी, अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. या अतिवृष्टीमुळे शेकडो एकर भात पिके धोक्यात आल्याने शेतकरी चिंतित आहेत. बुधवारी दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला होता, पण गुरुवारी पहाटेपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला.
मध्य महाराष्ट्रात जोर वाढला
सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण आणि खंडाळा या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये बुधवारी जोरदार पाऊस झाला. पश्चिम भागात तर सतत पाऊस कोसळत होता. जिल्ह्यात सरासरी २०.८ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्यामुळे उरमोडी आणि कण्हेर धरणांमधून गुरुवारी पाणी सोडण्यात आले. विशेषत: दुष्काळग्रस्त तालुक्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. माण, खटाव आणि फलटण तालुक्यांत अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला. खटाव तालुक्यातील मायणी येथे घरांमध्ये पाणी शिरले. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा येथे सर्वाधिक १२३ मिलिमीटर पाऊस पडला. पुणे जिल्ह्यातील जवळपास १६ धरणांमधून पाणी सोडण्यात आले.
नगर जिल्ह्यातही काही भागांत जोरदार पाऊस पडत आहे. नाशिकमध्ये पावसामुळे फळपिकांचे नुकसान होत आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत पाऊस कमी आहे. सोलापूरातही थोडाफार पाऊस पडत आहे. खानदेशात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असून, पिकांना याचा फायदा होत आहे.
पुण्यात पावसाने रेकॉर्ड मोडला
पुण्यात गेल्या 86 वर्षांचा पावसाचा विक्रम मोडला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, शिवाजीनगरमध्ये 24 तासांत 133 मिमी पाऊस पडला. यातील सर्वात जास्त पाऊस म्हणजे 124 मिमी, हा केवळ 3 तासांत पडला. बुधवारी सकाळपासून गुरुवारी सकाळपर्यंत शिवाजीनगरमध्ये 133 मिमी पाऊस पडला. सप्टेंबर महिन्यात इतका पाऊस 1938 पासून पडला नाही. त्यावेळी 132.3 मिमी पाऊस पडला होता.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागांत कमीअधिक पाऊस पडत आहे. या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे.आज (शुक्रवार) पुणे जिल्ह्यासाठी तसंच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन दिवसांपासून सध्या सुरु असलेल्या पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.आज, (ता.२७) कोकणातील पालघर, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने गंभीर इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे. उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार वारे आणि विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उद्या, २८ तारखेला राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.