Onion Seed : रब्बी कांदा बियाणे महाग! कांदा लागवडावर परिणाम होईल का?
रब्बी कांद्याची बाजारपेठेत कमतरता असल्याने आणि मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यावर्षीच्या चांगल्या पावसामुळे शेतकरी रब्बी कांदा लागवडीकडे आकर्षित होत आहेत. मात्र, कांदा बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून विक्रेते शेतकऱ्यांकडून जादा पैसे उकळत आहेत,अशी गंभीर बाब समोर आली आहे.
राज्यात सिंचनाच्या सुविधा असल्याने दरवर्षी ४.५ ते ६ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी कांदा पिकवला जातो. यंदा या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे कांदा बियाणे उत्पादन घटले. त्यामुळे बाजारात बियाण्यांचा तुटवडा जाणवत आहे. सुरुवातीला बियाण्यांचे दर कंपन्यांकडून प्रति किलो १,८०० ते २,३०० रुपये निश्चित करण्यात आले होते. पण आता बाजारात बियाणे उपलब्ध नसल्याची बहाणा करून विक्रेते जादा पैसे घेत आहेत.
बाजारात जवळपास २० ते २२ कंपन्यांच्या माध्यमातून कांदा बियाणे उपलब्ध करून दिले जात आहे. त्याची विक्री १,८०० ते २,३०० दरम्यान होती. मात्र कृत्रिम टंचाई करून पहिल्या पासूनच काही विक्रेते २,५०० ते ३,००० रुपयांपर्यंत विक्री करत आहेत.
शेतकऱ्यांना बिल मात्र २,२०० ते २,३०० रुपयांचे दिले जाते, तर खरेदी केलेली रक्कम अधिक असते. याबाबत कृषी विभागाकडे तक्रार केली असता, ते फक्त कारवाई करण्याचे आश्वासन देऊन टाकतात. पण प्रत्यक्षात काळाबाजार कुणाच्या संरक्षणात चालू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांचे असे शोषण होत असल्याने शेतकरी संतप्त आहेत.