नाशिकला डाळींब तर बीडमध्ये सीताफळ इस्टेटला मंजुरी ; उत्पादन वाढवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय..
नाशिक जिल्ह्यात डाळींब व बीड जिल्ह्यात सिताफळ इस्टेट स्थापन करण्याचा निर्णय सोमवारी (दिनांक ३०) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
मालेगाव येथील तालुका फळरोपवाटीका निळगव्हाण येथे डाळींब इस्टेट स्थापन करण्यात येईल. यासाठी ३९ कोटी ४२ लाख ७५ हजार रुपयांची तरतूद केली जाईल.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी सरकारने ९८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, नांदगाव आणि देवळा परिसर हा डाळिंब पिकास अनुकूल असल्याने, येथे 30 हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंब लागवड केली जाते. या पिकाला अधिक गती देण्यासाठी, डाळिंब इस्टेट उभारून डाळिंब ज्यूस उत्पादन, दाणे प्रक्रिया आणि निर्यात यावर भर दिला जाणार आहे. यासाठी 53 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शिवाय, डाळिंब प्रक्रिया, साठवण, पॅकेजिंग आणि मार्केटिंग याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एक केंद्र उभारण्याचाही प्रस्ताव आहे.
बीड जिल्ह्यात मौजे वडखेल (ता. परळी) थे सिताफळ इस्टेट स्थापन करण्यात येईल. त्यासाठी ५३ कोटी ६० लाख २५ हजार रुपयांची तरतूद केली जाईल. या दोन्ही ठिकाणी आवश्यक असे मनुष्यबळ प्रतिनियुक्ती व बाह्य स्त्रोताव्दारे कंत्राटी पध्दतीने भरण्यास मान्यता देण्यात आली.या इस्टेटमुळे सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे सिताफळ उत्पादन वाढेल, साठवणूक आणि प्रक्रिया सुविधा उभारल्या जातील आणि उच्च दर्जाची कलमे तयार केली जातील. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल, असा विश्वास कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानत, मुंडे यांनी त्यांचे आभार मानले.