Maharashtra Rain: मॉन्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा सुरु; राज्यातील या भागात पावसाची शक्यता..
राज्यात पुढील ५ दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर, मॉन्सूनने पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आहे. उत्तर भारतातून प्रवास सुरू करून, मॉन्सून आता राज्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हवामान विभागाच्या मते, पुढच्या पाच दिवसांत राज्यात पावसाची शक्यता आहे.
मॉन्सूनने आज जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा यासारख्या उत्तरेकडील राज्यांमधून पूर्णपणे निघून जाण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागांमधूनही मॉन्सून माघारी फिरत आहे. सध्या मॉन्सूनची सीमा लखिमपूर खेरी, शिवपुरी, कोटा, उदयपूर, दिसा, सुरेंद्रनगर आणि जुनागड या ठिकाणांपर्यंत पोहोचली आहे.
हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, नगर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्या आणि शुक्रवारी राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता कमी आहे. मात्र, शनिवारी आणि रविवारी पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे. विशेषतः नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नगर, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.