Maharashtra Rain Alert : राज्यात वाढणार पावसाचा जोर; कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊसाची शक्यता
राज्यात आता परत पावसाचे दिवस सुरू झाले आहेत. आज (ता. ११) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने दिला आहे.
ऑक्टोबरच्या सुरुवातीला उन्हाची तीव्रता वाढून तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी हवामानामुळे तापमान घटले असून आता ३५ अंशांच्या खाली आले आहे. गुरुवारी (ता. १०) अकोला येथे सर्वाधिक ३५.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यातील इतर भागांमध्ये तापमान कमी झाले आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने आज (ता. ११) कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या काही भागांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका जाणवू शकतो.
२३ सप्टेंबरला मॉन्सूनने उत्तर भारताकडून परतीचा प्रवास सुरू केला, पण त्याची गती मंदावली. शनिवारी (ता. ५) नंदुरबारला मॉन्सूनने निरोप दिला, पण त्यानंतर पाच दिवस त्याची वाटचाल थांबली. हवामान विभागाच्या मते, महाराष्ट्राच्या इतर भागांतून मॉन्सून परतण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार होत आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाबरोबर वीज चमकण्याची आणि वादळी वाऱ्यांची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून नागरिकांनी सतर्क रहावे.