दिघवद येथे 20 ट्रॉली चारा जळून खाक. .

दिघवद (कैलास सोनवणे, पत्रकार)
दिघवद येथील शेतकरी सदाशिव देवराम गागरे यांच्या गट नंबर 350/1 मधील शेतात अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या आगीमध्ये 20 ट्रॉल्या मक्याचा चारा व शेंगा काढलेली तुरीची गंची जळून खाक झाली.
आज दुपारच्या सुमारास सदाशिव गागरे यांच्या आई बनुबाई देवराम गागरे यांनी शेतात लागलेली आग पाहून आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजाने शेजारील शेतकरी व सदाशिव गागरे धावत आले. त्यांनी तातडीने शेजारी बांधलेले बैल व गायींचे दोर सोडवले, त्यामुळे कोणतीही जीवितहानी टळली.
आगीची माहिती मिळताच चांदवड नगरपरिषदेच्या अग्निशमन वाहनाला पाचारण करण्यात आले. मात्र, आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने ती विझवण्यासाठी तब्बल तीन ते चार तास लागले. शेजारी जाळण्यासाठी ठेवलेले लाकडेही पेटल्यामुळे आगीचा भडका उडाला. त्यात गाजर गवताने वेगाने पेट घेतला आणि जोरदार वाऱ्यामुळे आग सर्वत्र पसरली. यामुळे विद्युत वितरणाच्या तारा तुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आग विझवण्यासाठी शेजारील शेतकरी व गावातील ग्रामस्थांनी अथक प्रयत्न केले, मात्र तरीही संपूर्ण चारा व तुरीचे पीक जळून खाक झाले. सुटीचा दिवस असल्याने तलाठी व इतर अधिकारी ऑनलाईन मिटिंगमध्ये होते, असे गागरे यांनी सांगितले. त्यामुळे उद्या पंचनामे करण्यात येणार आहेत.
या आगीत संपूर्ण एक एकरातील काढणीला आलेले तुरीचे पीक, लाकडे व पशुखाद्य जळून खाक झाले. परिणामी जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे माझे मोठे नुकसान झाले असून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी सदाशिव गागरे यांनी केली आहे.





