कांद्यावरील फूल किडीच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक व्यवस्थापन योजना

0

 🧅कांद्यावरील फूल किडीच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक व्यवस्थापन योजना🧅

Source:

राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम

A) कांदा पिकावरील फुल किडीची ओळख व नुकसानीचा प्रकार :

शेतकरी बंधुंनो फुलकिडी ही कांदा पिकाची नुकसान करणारी प्रमुख कीड आहे रब्बी हंगामात कांदा पिकावर या किडीचे प्रादुर्भावाचे प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या अधिक आढळून येते, तिव्र प्रादुर्भाव झाल्यास या किडीमुळे कांदा पिकाचे ३० ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होऊ शकते. कोरडी हवा आणि २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान या किडीच्या वाढीसाठी पोषक असते. कांद्यावरील फुलकिडी ही किड पिवळसर तपकिरी रंगाची असून तिच्या शरीरावर फुलीच्या आकाराचे गडद चट्टे असतात कांद्यावरील फुल किडीचे प्रौढ आकाराने अत्यंत लहान असून त्यांचा आकार साधारणता १ ते १.५ मी.मी. असतो कांद्यावरील फुलकिडीचे प्रौढ फिक्कट तपकिरी रंगाचे असतात कांद्यावरील या फुलकिडीच्या प्रौढ अवस्थेला पंखांच्या दोन जोड्या असतात. समोरील पंख दोन्ही बाजूस दाते असलेल्या कंगवा सारखे दिसतात कांद्यावरील हे प्रौढ फुलकिडे एका शेतातून दुसऱ्या शेतात उडून जाऊ शकतात. साधारणता कांद्यावरील फुलकिडे कांद्याच्या पानाचे आवरण व खोड यामध्ये म्हणजेच पातीच्या बेचक्यात लपलेले असतात. या किडीची मादी पानाच्या कोवळ्या उतीमध्ये पांढऱ्या रंगाची ५० ते ६० अंडी घालते. साधारणतः चार ते सात दिवसात अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात पिलाचा कालावधी साधारणपणे ६ ते ७ दिवसांचा असतो परंतु डिसेंबर सारख्या महिन्यातील थंड हवामानात हा कालावधी तेवीस दिवसापर्यंत सुद्धा वाढू शकतो. या कीडीच्या अंड्यातून निघालेली पिल्ले व प्रौढ कीटक कांद्याची पाने खरडून पानातून येणारा रस शोषण करतात. त्यामुळे कांद्याच्या पानावर पांढरे ठिपके पडतात त्याला बरेच शेतकरी बंधू टाके या नावाने ओळखतात. असे असंख्य पांढरे ठिपके जोडल्या गेल्याने  कालांतराने कांद्याची पाने तपकिरी बनवून वाकडी होतात व वाळतात. फुल किडीमुळे कांद्याच्या पानाला झालेल्या जखमांमधून विविध प्रकारच्या करपा रोगाच्या हानीकारक बुरशीस कांद्याच्या पानात शिरकाव करण्यास पोषक वातावरण तयार होते कांदा पिकाच्या सर्व अवस्थेत फुलकिडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो परंतु रोपावस्थेत फुलकिडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास कांद्याची पाने वाळून कांदे चागली पोसल्या जात नाहीत व कांद्याच्या उत्पादनात लक्षणीय घट होऊ शकते.

B) कांदा पिकावरील फुलकिडी करिता एकात्मिक व्यवस्थापन योजना_

१) कांदा पिकाची लागवड करण्यापूर्वी साधारणता पंधरा दिवस अगोदर शेताच्या कडेने मका या पिकाच्या दोन ओळीची लागवड करावी त्यामुळे फुलकिडीचा बऱ्याच अंशी प्रतिबंध मिळतो._

२)कांदा पिकाची सतत त्याच  त्या शेतात लागवड करणे टाळून कांदा पिकाची तृणधान्य किंवा गळित धान्य पिकासोबत फेरपालट करावी._

३)क्रायसोपा सारख्या मित्र किडीचे कांदा शेतामध्ये संवर्धन व जतन होईल याची काळजी घ्यावी._

४)सुरुवातीपासून साधारणतः ८ ते १० दिवसांच्या अंतराने वेळोवेळी ५ टक्के निंबोळी अर्क या वनस्पतिजन्य कीटकनाशकाची कांद्यावरील फुल किडीच्या प्रतिबंध, व्यवस्थापनाकरिता फवारणी करावी_

५) कांदा पिकावर फुल किडीचा तीव्र प्रादुर्भाव असल्यास वर निर्देशीत उपाय योजने बरोबर तिव्र प्रादुर्भावात Lambda Cyhalothrin 5 EC 10 मिली अधिक १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन सुरक्षित कीटकनाशक वापर तंत्राचा वापर करून फवारणी करावी. कांद्यावर फवारणी करताना प्रति लिटर पाण्यामध्ये एक मिली या प्रमाणात उत्तम दर्जाचे चिकट द्रव्य मिसळावे.

टीप : १)कांदा पिकात रसायने फवारताना लेबल क्लेम शिफारशीची शहानिशा करून लेबल क्लेम शिफारशीप्रमाणेच रसायने फवारावी तसेच अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी.

२) कांदा बिजोत्पादन पिकाकरिता रसायनाचा वापर करताना मधमाशी या बीजोत्पादनासाठी मदत करणाऱ्या मित्र कीटकाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी तसेच किडीच्या व्यवस्थापनासाठी इतर अरासायनिक एकात्मिक कीड व्यवस्थापन घटकाचा सुरुवातीपासून अंगीकार करावा_

३) रसायनाची फवारणी करताना सुरक्षित कीडनाशक वापर तंत्राचा अंगीकार करावा.

source:

राजेश डवरे कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »