कैलास सोनवणे (दिघवद वार्ताहर): दिघवद येथे ‘माझी शाळा – माझा अभिमान’ कार्यक्रम संपन्न
चांदवड तालुक्यातील जि.प. आदर्श प्राथमिक शाळा, दिघवद येथे ‘माझी शाळा-माझा अभिमान’ उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थी व शिक्षण प्रेमी नागरिकांचा स्नेहमेळावा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ नागरिक कचरू धोंडीराम गांगुर्डे यांनी भूषविले. सर्व प्रथम मुख्याध्यापक श्री केशव वाकचौरे यांनी उपस्थितांचे शब्दसुमनानी स्वागत केले. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्व माजी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या तर्फे शाल व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच सर्व शिक्षकांचा स्वागत सत्कार माजी विद्यार्थ्यांनी केला . आपल्या प्रास्ताविकातून शाळेचे मुख्याध्यापक केशव वाकचौरे यांनी जि.प. नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करणे का गरजेचे आहे याचे महत्व पटवून दिले. अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शाळा विकासासाठी पालकांचे सहकार्य खूप मोलाची भूमिका बजावतात असे स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक सदाशिव गांगुर्डे यांनी विषद केले. शाळेचे माजी शिक्षक शांताराम हांडगे यांनी शाळा मुलांच्या सुसंस्काराचे केंद्र असून शाळेकडे आईच्या नात्याने सर्वांनी पहावे व प्रत्येकाने शाळेचा अभिमान बाळगावा तसेच जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम विदयार्थी घडविणे हे आजच्या शिक्षणाचे ध्येय आहे. त्यामुळे पालकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे ते आपण करावे असे आवाहन केले. तसेच मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम लक्षात घेता प्रत्येक घराघरात पुस्तक बँक सुरू करावी व वाचन संसकृती विकसित करावी असे प्रतिपादन केले. सेवानिवृत्त शिक्षक आर. व्ही पाटील यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने नवनवीन उपक्रम हाती घेऊन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी सरपंच रावसाहेब गांगुर्डे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोविंद गाढे, उपाध्यक्ष राहुल मापारी, माजी सरपंच अमर मापारी, दिघवद सोसायटीचे संचालक सोमनाथ गांगुर्डे , राजेंद्र पाटील, किरण मापारी प्रा. योगेश मापारी, घनश्याम गांगुर्डे, सुनिल गांगुर्डे, बाळासाहेब रसाळ, सदाशिव गागरे, नारायण गाढे, भूषण मापारी, माजी सैनिक किशोर मापारी, नारायण गांगुर्डे, बंडू वडनेरे, मच्छिंद्र पवार, प्रा. पंकज गांगुर्डे , गावकरीचे वार्ताहर कैलास सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक चंद्रकांत वारुळे, जयश्री जाधव, प्रिया शिंदे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन मुख्याध्यापक केशव वाकचौरे यांनी केले. आभार चंद्रकांत वारुळे यांनी मानले.

पत्रकार -

By admin

Translate »