राजदेरवाडी गावातून निवासी बस सुरु करा – चांदवड तालुका भाजपायुवा मोर्चा उपतालुकाध्यक्ष आगार प्रमुखांकडे मागणी
राजदेरवाडी गावातून निवासी बस सुरु करा
चांदवड तालुका भाजपायुवा मोर्चा उपतालुकाध्यक्ष दीपक जाधव यांची आगार प्रमुखांकडे मागणी
कांजीसांगवी: उत्तम आवारे चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी गावात राज्यपरिवहन महामंडळाची बस सकाळच्या वेळी उशिरा येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत आहे. यासाठी राज्य परिवहन महामंडळाने राजदेरवाडी गावात पूर्वीप्रमाणेच मुक्कामी निवासी बस करण्याची मागणी चांदवड तालुका भाजपा युवा मोर्चा उपतालुकाध्यक्ष तथा सोसायटी संचालक दीपक जाधव यांनी मनमाड बस आगार प्रमुख लाडवंजारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील राजदेरवाडी, वडबारे, नादुरटेक, चिंचबारी या ठिकाणचे जवळपास ६० ते ७० विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी चांदवडला दररोज ये – जा करीत असतात. या विद्यार्थ्यांना सकाळी ७ वाजता महाविद्यालयात शैक्षणीक अभ्यासक्रमासाठी जावे लागते. कोरोना महामारी सुरु होण्यापूर्वी राजदेरवाडी गावात राज्य परिवहन महामंडळाची बस मुक्कामी निवासी सुरु होती. त्यामुळे सकाळच्या सुमारास बस ७ वाजताच चांदवडला जात असल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहचणे सहज शक्य होते. मात्र कोरोना महामारीपासून राजदेरवाडी येथील निवासी बस राज्यपरिवहन महामंडळाने बंद केली असून ती अद्यापपर्यंत सुरु केली नाही आहे. यामुळे राजदेरवाडी, वडबारे, नांदूरटेक, चिंचबारी परिसरातील विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळेस महाविद्यालयात पोहचण्यास विलंब होतो. यामुळे विद्यार्थ्यांना सुरुवातीचे १ ते २ तासिकांना मुक्कावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत आहे. या गोष्टीची दखल घेत चांदवड तालुका भाजपा युवा मोर्चाचे उपतालुकाध्यक्ष दीपक जाधव, समाधान पवार, भुषण जाधव, लखन जाधव, धनंजय जाधव, सुकदेव केदारे, पंडीत जाधव, नंदु जाधव, ज्ञानेश्वर जाधव, सुनिल शिदे, सुनिल पवार, गोकुळ जाधव आदींनी मनमाड आगार प्रमुखांची भेट घेत त्यांना विद्यार्थ्यांच्या अडचणीबाबत माहिती दिली. यावेळी आगार प्रमुख लाडवंजारी यांनी वरिष्ठांना कळवून तत्काळ बसच्या वेळेत बदल करण्याचे आश्वासन दीपक जाधव व त्यांच्या सहकार्यांना दिले आहे.