उन्हाळी भुईमूग
उन्हाळी भुईमूग भाग 1
उन्हाळी भुईमूग पिकासाठी जमिनीची निवड व पेरणीपूर्व करावयाची मशागत
उन्हाळी भुईमुगाचे अधिकात अधिक उत्पादन घेण्यासाठी मध्यम प्रकारची, चांगली निचरा होणारी, मऊ, भुसभुशीत, वाळूमिश्रित चिकन मातीची, सेंद्रिय पदार्थाने परिपूर्ण असलेली व साधारण त्या जमिनीचा सामू 6 ते 7.5 च्या दरम्यान असणारी ( त्यातही सामू 6.5 असल्यास उत्तम समजावा) जमीन आदर्श मानल्या जाते. भुईमूग पिकाच्या मुळाचे जाळे साधारणत पंधरा सेंटीमीटर खोल जमिनीत असते व भुईमूग पिकाच्या मुळांवर गाठी असतात या गाठीच्या योग्य वाढीसाठी हवा खेळती राहणारी योग्य निचरा होणारी जमीन केव्हाही योग्य असते याऊलट अतिशय भारी चिकन माती युक्त, चिकट व कडक होणाऱ्या तसेच ज्या जमिनीमध्ये निचरा चांगला होत नाही अशा जमिनी उन्हाळी भुईमूग लागवड करण्यासाठी टाळणे केव्हाही योग्य अशा जमिनीत भुईमुगाच्या शेंगाची वाढ फार चांगली होत नाही. पेरणीपूर्व माती परीक्षण करून माती परीक्षणाच्या अहवालाच्या आधारावर तसेच जमिनीचे भौतिक जैविक व रासायनिक गुणधर्म लक्षात घेऊन प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन उन्हाळी भुईमूग लागवड करण्यासाठी जमीन निवडणे केव्हाही हिताचे असते.
उन्हाळी भुईमूग ज्या जमिनीत लागवड करायचा आहे ती जमीन किमान तीन वर्षातून एकदा पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल नागरणी करून नागणी नंतर दोन-तीन वखराच्या पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी. शेवटच्या वखर पाळीपूर्वी हेक्टरी पाच टन म्हणजेच एकरी दोन टन म्हणजेच किमान एकरी दहा ते बारा गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत टाकून शेवटची व खत वखराची पाळी देऊन जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. शेणखत वापरताना चांगले कुजलेले शेणखत वापरावे म्हणजे पुढे होणाऱ्या हुमणी किडीचा प्रादुर्भावास प्रतिबंध मिळेल. पूर्वमशागत करताना ज्या लागवडीच्या पद्धतीचा अंगीकार करावयाचा आहे त्या शिफारशीत पद्धतीप्रमाणे उदाहरणार्थ सपाट वाफा पद्धत, अरुंद सरी-वरंबा पद्धत किंवा रुंद सरी वरंबा पद्धत यापैकी योग्य पद्धतीची तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निवड करून आपले गरजे नुसार संबंधित उन्हाळी भुईमूग लागवड पद्धतीप्रमाणे पूर्वमशागत करून जमीन तयार करावी.
source : राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.
—————-
उन्हाळी भुईमूग भाग 2
उन्हाळी भुईमूग या पिकासाठी लागणारे आदर्श हवामान व पेरणीची वेळ
शेतकरी बंधूंनो भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामानाची भुईमूग पिकाच्या वाढीस गरज असते व हे समशीतोष्ण हवामान भुईमूग पिकाला उन्हाळ्यात प्राप्त होते. पाण्याची पुरेशी उपलब्धता असल्यामुळेच हे पीक उन्हाळी हंगामात घेतले जात असल्यामुळे पिकाची वाढ चांगली होते व अधिक उत्पादन मिळते. उन्हाळी भुईमुगाच्या जोमदार वाढीसाठी साधारणतः 24 ते 27 डिग्री से. ग्रे. तापमानाची गरज असते व तापमान 20 डिग्री से. ग्रे. पेक्षा कमी झाल्यास शेंगा धरण्याचे प्रमाण कमी होते.
उन्हाळी हंगामात भुईमूग पिकाच्या पेरणीची वेळ साधने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याकरता काही बाबी समजून घेणे गरजेचे आहे. उन्हाळी भुईमूग हे दिवस लहान व रात्र मोठी अशा वातावरणात फुलणारे पिक आहे. उन्हाळी भुईमूग पिकाला जास्त फुलोरा येण्याकरता दिवस फार मोठा नको. दिवस लाबला तर मी भुईमुगाची नुसती शाकीय वाढ होत राहते. उन्हाळी भुईमूग पिकाला फुले लागण्याचा उत्तम काळ म्हणजे फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा किंवा मार्च महिन्याचा पहिला पंधरवडा होय. साधारणता उन्हाळी भुईमूग उगवणीनंतर 30 ते 32 दिवसांनी फुलोऱ्यावर येतो व साधारणत पाच ते सात दिवस चागली उगवन होण्याकरता लागतात. मंगेश साधारणता उन्हाळी भुईमूग पेरणीनंतर 35 ते 37 दिवसानंतर फुलोऱ्यावर येतो व फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून 35 दिवस वजा केले तर 15 ते 20 जानेवारी हा कालावधी उन्हाळी भुईमुगाच्या पेरणी साठी उत्तम आहे परंतु उन्हाळी भुईमुगाची पेरणी करण्यापूर्वी थंडी (तापमान) हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हे जो लक्षात घेतला पाहिजे. साधारणत 15 ते 20 जानेवारीच्या दरम्यान थंडी नसेल तर पेरणी करावी परंतु अतिशय जास्त थंडी असल्यास अशा थंडीत भुईमूग पेरणी थोडी पुढे ढकलता येते कारण उन्हाळी भुईमुगाची उगवन चागली होण्याकरता जमिनीचे तापमान 18 डिग्री से. ग्रे. ते 27 डिग्री से. ग्रे. च्या दरम्यान असणे अत्यंत आवश्यक आहे. वातावरणातील तापमानात वाढ झाली झाली तरी जमीन हळूहळू उबदार होते याची नोंद घ्यावी. अतिशय थंडीत भुईमुगाची पेरणी झाल्यास त्याचा भुईमुगाच्या बियाण्यांच्या उगवण शक्तीवर विपरीत परिणाम होऊन उगवणशक्ती कमी होते. टी. ए. जी.24 सारखा 110 ते 115 दिवसांत परिपक्व होणारा उन्हाळी भुईमूग पिकाचा वान 10 फेब्रुवारी पर्यंत पेरून सुद्धा उत्पादन घेता येते परंतु उशिरा पेरणी केल्यास उन्हाळी भुईमुगाचे पीक मान्सूनपूर्व पावसात सापडून नुकसान होणार नाही याची काळजी घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे. साधारणता 15 जानेवारी उशिरात उशिरा 10 फेब्रुवारीपर्यंत उन्हाळी भुईमूग पेरणी करण्याची शिफारस आहे परंतु हवामानातील सर्व घटक लक्षात घेऊन स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन गरजेनुसार योग्य पेरणीची वेळ साधल्यास उन्हाळी भुईमुगाचे अधिक उत्पादन मिळू शकते.
source: राजेश डवरे कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.
————
उन्हाळी भुईमूग भाग-3
उन्हाळी भुईमूग लागवडीकरिता काही महत्त्वाच्या शिफारशीत वाणांची गुणवैशिष्ट्ये
शेतकरी बंधूंनो उन्हाळी भुईमूग लागवड करण्याकरिता काही महत्त्वाच्या शिफारशीत वानाची गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत. आपले स्थानिक गरजेनुसार या वाणाची गुणवैशिष्ट्ये लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार तज्ञांचा प्रत्यक्ष सल्ला घेऊनच योग्य त्या उन्हाळी भुईमुगाच्या वानाची लागवडीसाठी निवड करावी. या या वाणाची गुणवैशिष्ट्ये याठिकाणी दिली असली तरी एकाच वानात सर्व गुणधर्म आपल्याला प्राप्त होतील असे नाही त्यामुळे जमीन प्रकार, हवामान, आपल्याकडे असणाऱ्या व्यवस्थापन सुविधा व बाजारपेठ या सर्व बाबींचा विचार करून प्रत्यक्ष तज्ञाचा सल्ला घेऊनच उन्हाळी भुईमुगाच्या वाणाची निवड करावी. सर्वसाधारण उन्हाळी भुईमुगाच्या वनाची गुणवैशिष्ट्ये लक्षात यावी याकरिता या वाणाची वैशिष्ट्ये या ठिकाणी विशद केली आहे.
(1) टीएजी – 24 : हे उन्हाळी भुईमूग पिकाचे वाण वाढीच्या प्रकारानुसार उपट्या भुईमूग या प्रकारात मोडते. या वानाचा परिपक्वता कालावधी उन्हाळी हंगामात साधारणता 110 ते 115 दिवस असून शेंगातील दाण्याचा उतारा जवळजवळ 70 ते 72 टक्के आहे. या वानात भुईमुगाच्या 100 दाण्याचे वजन 35 ते 45 ग्रॅम व तेलाचा उतारा 50 ते 51 टक्के असतो. या वाणाची सरासरी हेक्टरी उत्पादकता 24 ते 26 क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे. हा वान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आला आहे.
(2) टीजी – 26 : उन्हाळी भुईमुगाचा हा वान वाढीच्या प्रकारच्या नुसार उपट्या भुईमूग या प्रकारात मोडतो. या वानाचा परिपक्वता कालावधी साधारणतः 110 ते 115 दिवस आहे. या वानात शेंगातील दाण्याचा उतारा 72 ते 76 टक्के एवढा आहे. या वानाची सरासरी उत्पादकता 25 ते 32 क्विंटल प्रति हेक्टर एवढी दिली आहे. या वाहनात 100 दाण्याचे वजन 35 ते 45 ग्रॅम तर तेलाचा उतारा 50 ते 51 टक्के एवढा दिला आहे. हा उन्हाळी भुईमूग पिकाचा वाण संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात लागवडीसाठी शिफारस करण्यात आला आहे.
(3) फुले उन्नती (आर. एच आर .जी 60 83) : हा उन्हाळी भुईमुगाचा वान वाढीच्या प्रकारानुसार उपट्या भुईमूग या प्रकारात मोडतो. या वानाचा परिपक्वता कालावधी साधारणता 120 ते 125 दिवस एवढा असून सरासरी उत्पादकता हेक्टरी 30 ते 35 क्विंटल एवढी दिली आहे. हा वाण संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आला आहे.
(4) फुले भारती (जे. एल. 776) : हा उन्हाळी भुईमुगाच्या शिफारशीत वाण वाढीच्या प्रकारानुसार उपट्या भुईमूग या प्रकारात मोडतो. या वानाचा परिपक्वता कालावधी 115 ते 120 दिवस तर हेक्टरी उत्पादकता 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टर एवढी दिली आहे. हा वाण उत्तर महाराष्ट्रासाठी शिफारशीत केला आहे.
(5) एस. बी. 11: शेतकरी बंधूंनो हा उन्हाळी भुईमूग पिकाचा वान फार जुना म्हणजे 1965 यावर्षी शिफारशीत केलेला वान आहे. हा वान वाढीच्या प्रकारानुसार उपट्या भुईमूग या प्रकारात मोडतो. हा वान साधारणतः 115 ते 120 दिवसांत परिपक्व होतो व या वाणाचीसरासरी हेक्टरी उत्पादकता फार कमी म्हणजे 15 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर एवढी दिली आहे सर्वसाधारणपणे अलीकडील काळात अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा वाण तेवढा उत्पादन देत नसल्यामुळे पसंतीस उतरत नाही त्यामुळे या वाणाची फक्त माहिती असावी या अनुषंगाने ही बाब नमूद केली आहे. शक्यतो या या वाणाची लागवड टाळून उन्हाळी हंगामात अधिकात अधिक उत्पादन देणार्या तसेच इतर गुणवैशिष्ट्ये लक्षात घेऊन तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या वाणाची निवड करावी.
टीप : (१) वर निर्देशित वाणाची गुणवैशिष्ट्ये लक्षात घेऊन आपले गरजे नुसार प्रत्यक्ष तज्ञांशी सल्लामसलत करून आपले स्थानिक परिस्थितीनुसार सर्व बाबीचा सर्वांगीण विचार करून योग्य त्या वाणाची निवड करावी.
(२) वर निर्देशित वाणाचे बियाण्याच्या संदर्भात संबंधित कृषी विद्यापीठ, शेतकऱ्यांच्या बीज उत्पादक कंपन्या, महाबीज, शासन मान्यता प्राप्त इतर बियाणे कंपनी यांच्याकडे बियाणे संदर्भात विचारपूस करावी तसेच त्यांच्या कडे उपलब्धतेनुसार दर्जेदार प्रमाणित बियाण्याचा लागवडीसाठी वापर करा.
source: राजेश डवरे कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.
—————-
उन्हाळी भुईमूग भाग-4
आगामी उन्हाळी हंगामात उन्हाळी भुईमूग पिकात बीजप्रक्रिया करूनच पेरणी करा
शेतकरी बंधूंनो बीज प्रक्रिया किड व रोग प्रतिबंधक करिता तसेच अन्नद्रव्य उपलब्धते करता रामबाण उपाय आहे. म्हणून बीज प्रक्रियेला कमी लेखून टाळू नका तसेच पूर्वनियोजन करून आगामी उन्हाळी हंगामात उन्हाळी भुईमूग पिकात खाली निर्देशित बीजप्रक्रिया करूनच पेरणी करा. या बीज प्रक्रियेविषयी विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
(A) बीज प्रक्रिया म्हणजे काय?
शेतकरी बंधूंनो पेरणीपूर्वी एक विशिष्ट उद्दिष्ट ठेवून विशेषता अन्नद्रव्य उपलब्धतेत वाढ करणे, पिकामध्ये कीड व रोग प्रतिबंध करणे यासारखा महत्त्वाचा उद्देश ठेवून केलेली जैविक खताची, जैविक बुरशीनाशकाची किंवा रासायनिक बुरशीनाशकाची किंवा किटकनाशकाची बियाण्याला शिफारशीप्रमाणे पेरणीपूर्वी केलेली प्रक्रिया म्हणजे बीजप्रक्रिया होय.
(B) पिकात बीज प्रक्रिया केल्यामुळे कोणते महत्त्वाचे फायदे होतात?
(१) उन्हाळी भुईमूग सारख्या पिकात संबंधित पिकात शिफारशीत रायझोबियम या जैविक खताची बीजप्रक्रिया केल्यास हवेतील नत्र स्थिर होतो व नत्राची उपलब्धता होते व रासायनिक खतातून द्यावयाच्या नत्राच्या मात्रेत कपात करता येते.
(२) शेतकरी बंधूंनो पीएसबी या जिवाणू संवर्धकाच्या बीजप्रक्रियेमुळे उन्हाळी भुईमूग यासारख्या पिकात जमिनीतील रासायनिक खताच्या रूपात दिलेला स्फुरद विरघळून पिकाला मिळवून देण्याचे काम केलं जातं.
(३) शेतकरी बंधुंनो शिफारशीप्रमाणे व लेबल क्लेम प्रमाणे प्रत्येक पिकात संबंधितत् रासायनिक बुरशीनाशक व कीटकनाशक यांची प्रक्रिया केली तर शिफारशीप्रमाणे संबंधित पिकातील संबंधित कीड रोगाचा प्रतिबंध मिळतो व नंतर होणारा रासायनिक कीडनाशकाचा वापर कमी होऊन उत्पादनखर्चात कपात होते व पर्यावरण निष्ठ पीक संरक्षण करता येते. बऱ्याच रोगात बऱ्याच पिकात जमिनीतून प्रादुर्भाव करणाऱ्या बुरशीजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी केव्हाही बीजप्रक्रिया हाच रामबाण उपाय असतो व नंतर रासायनिक बुरशीनाशकाच्या फवारण्या म्हणजे साप गेल्यानंतर काठी मारणे होय.
(४) याव्यतिरिक्त काही पिकात उगवण चांगली करणे पेरणी सुलभ करणे किंवा बियाण्याची सुप्तावस्था कमी करणे या व इतर कारणासाठी बीजप्रक्रिया केली जाते.
(C) उन्हाळी भुईमूग पिकात आगामी उन्हाळी हंगामात कोणत्या जैविक खताची व किती प्रमाणात बीजप्रक्रिया करावी?
(१) उन्हाळी भुईमूग या पिकात रायझोबियम हे जिवाणू खत व पीएसबी हे जिवाणू खत प्रत्येकी अडीचशे ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यास या प्रमाणात किंवा या खताची उपलब्धता द्रवरूप स्वरूपात असेल तर रायझोबियम व पीएसबी प्रत्येकी 250 ते 300 मिली द्रवरूप प्रति 50 किलो बियाण्यास म्हणजेच 5 ते 6 मिली प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात प्रक्रिया करून घ्यावी. ही बीजप्रक्रिया केली तरच हवेतील नत्राचे स्थिरीकरण होते व स्फुरदाची उपलब्धता वाढते. ही खत बीज प्रक्रियेच्या रुपात आगामी उन्हाळी हंगामात आपण वापरली नाही तर वेळ निघून गेल्यावर इतर कोणत्याही रासायनिक खतातून किंवा द्रवरूप फवारणीच्या खतातून या जैविक खताचे मिळणारे फायदे हे संबंधित पिकात मिळणार नाहीत.
(D) आगामी उन्हाळी हंगामात उन्हाळी भुईमूग या पिकात कोणत्या रासायनिक बुरशीनाशकाची, जैविक बुरशीनाशकाची व कशा प्रमाणात बीजप्रक्रिया करावी?
(१) शेतकरी बंधूंनो उन्हाळी भुईमूग या पिकावरील मर मूळकूज , खोडकुज , या रोगाचा प्रतिबंध करण्याकरिता प्रथम Carboxin 37.5 % + Thiram 37.5 % या संयुक्त रासायनिक बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात व ही बीज प्रक्रिया झाल्यानंतर अर्ध्या तासाने ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
(2) उन्हाळी भुईमूग या पिकात रोपातील मर या रोगाचा प्रतिबंध करण्याकरिता ट्रायकोडर्मा व्हेरीडी या जैविक बुरशीनाशकाचा साधारणता अडीच किलो प्रति हेक्टर चांगल्या कुजलेल्या 100 किलो शेणखतात मिश्रण करून जमिनीत ओल असताना पेरणीपूर्व वापर जमिनीत वापर करून चांगले जमिनीत मिसळून पेरणी केल्यास केल्यास भुईमूग पिकातील रोपातील मर रोगाचा प्रतिबंध मिळण्यास मदत होते.
(E) उन्हाळी भुईमूग या पिकात बीज प्रक्रिया करताना कोणती पद्धत अवलंबावी व कोणती काळजी घ्यावी?
(१) शेतकरी बंधूंनी बीज प्रक्रिया करताना रासायनिक बुरशीनाशके कीटकनाशक यांची बीज प्रक्रिया प्रथम करावी व नंतर अर्ध्या तासानंतर जैविक खत व जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. रासायनिक निविष्ठा व जैविक निविष्ठा यांच्या बीजप्रक्रिया एकत्र मिश्रण करून करू नये व त्यांचा क्रम प्रथम रासायनिक बीजप्रक्रिया व नंतर जैविक निविष्ठांची बीज प्रक्रिया असाच ठेवावा.
(२) शेतकरी बंधूंनो भुईमूग या पिकात रासायनिक व जैविक या दोन्ही निविष्ठा ची बीज प्रक्रिया करतांना भुईमूग बियाण्याची साल निघणार नाही याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. याकरिता शेतकरी बांधवांनी भुईमुगाचे साधारणता पाच किलो बियाणे पॉलीथीन बॅग मध्ये टाकून प्रथम निर्देशीत प्रमाणात म्हणजे साधारणत पाच किलो बियाण्यास 15 ग्रॅम वर निर्देशित शिफारशीत रासायनिक बुरशीनाशक या पॉलिथिन बॅगमध्ये टाकून नंतर हलक्या हाताने बॅग उलट-सुलट करावी म्हणजे सर्व बियाण्यास हे रासायनिक बुरशीनाशक बियाला लागेल. या पद्धतीने संपूर्ण रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया झाल्यानंतर याच पद्धतीने अर्ध्या तासानंतर जैविक खते व बुरशीनाशक म्हणजे ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची वर निर्देशित प्रमाणात स्वतंत्र बीज प्रक्रिया करावी. जैविक खते, रासायनिक बुरशीनाशके व जैविक बुरशीनाशके यांची बीज प्रक्रिया करताना कोणत्याही परिस्थितीत भुईमूग बियाण्याची साल निघणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.
(२) शेतकरी बंधूंनो घरचे घरी बीज प्रक्रिया करताना हातात हॅन्ड ग्लोज किंवा पॉलिथिन पिशवी हॅन्ड ग्लोज म्हणून वापरावी बीज प्रक्रिया करताना 100 ग्राम गूळ एक लिटर पाणी या प्रमाणात पाणी कोमट करून थंड होऊ द्यावे व बीज प्रक्रिया करताना या गुळाच्या पाण्याचा हवा तेवढाच किंचित शिडकावा या बियाण्यावर निष्ठा चिटकून ठेवाव्या म्हणून देऊ शकता तू कोणत्याही परिस्थितीत भुईमूग बियाणे ओलेगच होणार नाही तसेच त्याची साल निघणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.
(३) भुईमूग पिकात बीज प्रक्रिया करताना विशेष काळजी घ्यावी व बियाला हाताने चोळू नये व ओले गच करू नये तसेच बियाण्याची टरफले निघणार नाहीत याची काळजी घ्यावी.
(४) शेतकरी बंधूंनो बीज प्रक्रिया करण्यापूर्वी कृषी विद्यापीठ यांच्या शिफारशी यांच्या शिफारशी तसेच लेबल क्लेम शिफारशी याची शहानिशा करून लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तसेच लेबल क्लेम शिफारशीत असलेल्या निविष्ठांचा वापर बीजप्रक्रियेसाठी करावा.
(E) जैविक खते जैविक बुरशीनाशके कुठे उपलब्ध होतात?
शेतकरी बंधूंनो जैविक खत,जैविक बुरशीनाशक व जैविक कीटकनाशक यांच्या उपलब्धतेसाठी सर्वप्रथम कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र यांच्या प्रयोग शाळेत संपर्क साधावा त्यांच्याकडे उपलब्धतेनुसार खरेदी करताना अशा प्रकारच्या निविष्ठा खरेदी करताना प्राधान्य द्यावे. शेतकरी बंधूंनो याव्यतिरिक्त भारत सरकारने व महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या इतर मान्यताप्राप्त कंपन्या किंवा अधिकृत विक्रेते व अधिकृत उत्पादक यांच्याकडूनच जैविक निविष्ठा खरेदी कराव्यात.
शेतकरी बंधूंनो आगामी उन्हाळी हंगामात उन्हाळी भुईमूग पिकात शिफारशीत बीजप्रक्रिया करूनच पेरणी करा व पुढे रासायनिक निविष्ठावर होणारा अनावश्यक खर्च टाळा व पर्यावरणनिष्ट अन्नद्रव्य व रसायनाचे व्यवस्थापन करून उत्पादन खर्चात कपात करा
धन्यवाद
source: राजेश डवरे कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.
—————
उन्हाळी भुईमूग भाग-5
उन्हाळी भुईमूग पेरणीच्या/ लागवडीच्या महत्वाच्या पद्धती
(1) उन्हाळी भुईमूग लागवडीची रुंद वाफा सरी पद्धत किंवा गादीवाफा पद्धत : या पद्धतीत गादी वाफ्याची जमिनीलगत रुंदी 150 सेंटीमीटर ( ५ फूट) तर वरची म्हणजे माथ्याची रुंदी 120 सेंटीमीटर ( ४ फूट) ठेवून तसेच या वाफ्याची जमिनीपासून उंची साधारणता पंधरा सेंटीमीटर (अर्धा फूट) ठेवून गादीवाफे तयार केल्या जातात. याप्रकारे तयार केलेल्या वाफ्याची लांबी जमिनीच्या उतारानुसार 40 ते 50 मीटर ठेवता येते. अशा गादीवाफ्यावर दोन ओळीतील अंतर तीस सेंटीमीटर व दोन झाडांतील अंतर दहा सेंटीमीटर ठेवून उन्हाळी भुईमुगाची टोकण पद्धतीने लागवड करावी. बियाण्याची टोकण करताना जमिनीत गादीवाफ्यावर असणारी ओल बियाण्याची उगवणशक्ती तसेच टोकण करताना बियाणे पाच ते सहा सेंटीमीटर पेक्षा खोल पडणार नाही याची काळजी घेऊन टोकन करणे गरजेचे असते. गादीवाफा पद्धतीने पेरणी केल्यास जमीन भुसभुशीत राहत असल्याने मुळांची कार्यक्षमता वाढून पिकाची वाढ जोमदार होते व उत्पादनात वाढ होते. गादीवाफा पद्धतीमध्ये जमिनीत पाणी व हवा याचे प्रमाण संतुलित ठेवता येते त्यामुळे पिकाची कार्यक्षमता वाढते व पिकास पाण्याचा ताण बसत नाही तसेच जास्त पाणी दिल्या गेल्यास सरीतून पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. गादीवाफा पद्धती मध्ये तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे सोयीस्कर होते. या पद्धतीत पाटाने पाणी सुद्धा देता येते त्यासाठी वेगळी रानबांधणी करावी लागत नाही तसेच या पद्धतीत संतुलित अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन उन्हाळी भुईमूग पिकाला करणे शक्य होते.
(२) सर्वसाधारण टोकण पद्धत किंवा सपाट वाफा पद्धत : सपाट वाफा पद्धतीने भुईमुगाची पेरणी करावयाची झाल्यास पेरणी यंत्राच्या साह्याने किंवा टोकण पद्धतीने किंवा तिफणीच्या मागे सरते बांधून पेरणी करता येते.पेरणी यंत्र नसल्यास पेरणी शक्यतोवर टोकण पद्धतीने करावी. सपाट वाफा पद्धतीने पेरणी करावयाची झाल्यास पेरणी यंत्राच्या साह्याने दोन ओळीतील अंतर तीस सेंटिमीटर व दोन झाडांतील अंतर दहा सेंटीमीटर ठेवून टोकण करता येईल. पेरणी यंत्र नसल्यास पेरणी टोकण पद्धतीने करावी. एका ठिकाणी एक बी टोकावे. बियाण्याची उगवणशक्ती कमी असल्यास एका ठिकाणी दोन बि टोकणयास हरकत नाही किंवा त्यापेक्षा दोन बियाणे मधील अंतर कमी करून एका ठिकाणी एकच बी टोकन करणे सुद्धा चांगले. टोकण पद्धतीने पेरणी केल्यास बियाणे कमी लागते व हेक्टरी झाडांची संख्या योग्य राखता येते. तिफणीने सऱ्या पाडून ठराविक अंतरावर मजुरांच्या साह्याने बी टोकण करता येते. पेरणी झाल्यानंतर बी चांगले झाकले जाईल तसेच पक्षी बी खाणार नाहीत याची काळजी घ्यावी व बियाणे टोकन किंवा लागवड करताना साधारणतः दोन ते अडीच इंच यापेक्षा जास्त ( ५ ते ६ सेंटीमीटर पेक्षा जास्त ) खोल पडणार नाही तसेच अति उथळ सुद्धा राहणार नाही याची काळजी घ्यावी. बी जास्त खोल पेरल्यास बिया ची ताकद अंकुर जमिनी बाहेर निघण्यामध्येच खर्च होईल आणि मूळ लहान राहून त्याची वाढ आणि विस्तार बरोबर होणार नाही. जमिनीच्या मगदुरानुसार उन्हाळी भुईमूगसाठी तयार केलेल्या जमिनीस पेरणीपूर्व ओलीत करून वाफसा आल्यावर पेरणी करणे योग्य ठरते.पेरणी झाल्यानंतर उगवन होईपर्यंत शेताची राखण करावी.
शेतकरी बंधूंनो सर्वसाधारणपणे साध्या सपाट वाफा दोन ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर व दोन झाडांतील अंतर दहा सेंटीमीटर ठेवून पेरणी केल्यास टीएजी 24 यासारख्या वानात बियाण्याची आदर्श उगवणक्षमता गृहीत धरून एकरी 55 ते 60 किलो बी पेरणीसाठी लागते. साधारणता हेक्टरी 3.33 लाख उन्हाळी भुईमुगाची झाडे या प्रमाणात झाडाची संख्या शेतात राहील याची काळजी घ्यावी.
भुईमुगाचे चांगले उत्पादन येण्याकरता उगवण झाल्यावर खांडन्या आढळल्यास त्या भरून घ्याव्यात व मुख्यतः खांडन्या पडणारच नाहीत याची काळजी घ्यावी.
टीप: (१) पेरणीपूर्वी योग्य शिफारशीत व प्रमाणित बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणशक्ती तपासून घ्यावी
(२) निर्देशीत पद्धतीचा वापर करण्यापूर्वी प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन आपले स्थानिक परिस्थितीनुसार आपले स्वतःचे अनुभव आवश्यकतेनुसार वापरून योग्य लागवड पद्धती द्वारे प्रत्यक्ष तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच लागवड पद्धतीचा वापर करणे केव्हाही चांगले. वर निर्देशित पद्धती एक सर्वसाधारण कल्पना शेतकरी बंधूंना यावी याकरता दिल्या आहेत. प्रत्यक्ष तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा वापर करणे केव्हाही हितावह असते.
source: राजेश डवरे कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.
—————-
उन्हाळी भुईमूग भाग-6
उन्हाळी भुईमूग पिकातील अन्नद्रव्याचे (खताचे व्यवस्थापन)
शेतकरी बंधूंनो उन्हाळी भुईमूग पिकातील अन्नद्रव्याच्या किंवा खताच्या व्यवस्थापना संदर्भात आपण काही बाबी जाणून घेणार आहोत.
(A) नेमकी उन्हाळी भुईमूग पिकात विदर्भासाठी खताची किंवा प्राथमिक अन्नद्रव्याची काय शिफारस आहे?
उन्हाळी भुईमूग पिकाकरिता माती परीक्षणाच्या आधारावर अन्नद्रव्याचे किंवा खताचे व्यवस्थापन करावे. साधारणपणे उन्हाळी भुईमूग पिकात 25 किलो नत्र अधिक 50 किलो स्फुरद अधिक आवश्यकता असल्यास 30 किलो पालाश प्रति हेक्टर पेरणी सोबत देण्याची शिफारस डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी केली आहे.
(B) उन्हाळी भुईमूग या पिकामध्ये एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करून खते द्यावी म्हणजे नेमके काय?
(१) सर्वप्रथम माती परीक्षण करून घ्या आणि आपल्या जमिनीसंदर्भात सामू, चुनखडी चे प्रमाण, उपलब्ध नत्र स्फुरद पालाश तसेच उपलब्ध सूक्ष्म अन्नद्रव्य व इतर बाबीची माहिती घ्या व माती परीक्षणाच्या आधारावर शिफारशीप्रमाणे उन्हाळी भुईमूग पिकात पिकात अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करा हा एकिकृत अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा पाया आहे.
(२) उन्हाळी भुईमूग पिकाला शिफारशीप्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खत द्या
(३) उन्हाळी भुईमूग पिकाला रायझोबियम आणि पीएसबी या जिवाणू खताची बीजप्रक्रिया करा
(४) उन्हाळी भुईमूग पिकात माती परीक्षणाच्या आधारावर आपल्या जमिनीमध्ये कमतरता असलेले सूक्ष्म अन्नद्रव्य शिफारशीप्रमाणे जमिनीत व फवारणीद्वारे द्या.
(४) शिफारशीप्रमाणे रासायनिक खताची मात्रा माती परीक्षणाच्या आधारावर योग्य खताची निवड करून निर्देशित शिफारशीत वेळी योग्य प्रमाणातच द्या.
(५) शिफारशीप्रमाणे जिप्सम या खताचा उन्हाळी भुईमूग या पिकात निर्देशित वेळी निर्देशित प्रमाणात वापर करा.
(६) विद्राव्य व सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त फवारणीच्या खताची शिफारशीप्रमाणे योग्य कालावधीत माती परीक्षणाच्या आधारावर अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार फवारणी करा.
शेतकरी बंधूंनो वर निर्देशित घटक सुयोग रित्या वापरून रासायनिक खताचा माती परीक्षणाच्या आधारावर योग्य तेवढाच वापर करणे म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन होय.
(C) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा घटक म्हणून एक एकर उन्हाळी भुईमूग पिकाला कोणते सेंद्रिय खत किती प्रमाणात व कधी वापरावे?
शेतकरी बंधूंनो उन्हाळी भुईमूग पिकात जमिनीची पूर्वमशागत करताना शेवटच्या कुळवाच्या अगोदर प्रति हेक्टर पाच ते दहा टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे म्हणजेच जवळजवळ प्रति एकर आठ ते दहा गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमीन तयार करताना जमिनीत चांगले मिसळून द्यावे व नंतर शेवटची वखराची पाळी द्यावी.
(D) उन्हाळी भुईमूग पिकात सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा प्रति एकर वापर कसा , कधी व किती प्रमाणात करावा?
शेतकरी बंधूंनो पूर्वी सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम सूक्ष्म अन्नद्रव्य करता माती परीक्षण करून घ्या आणि माती परीक्षणाच्या आधारावर सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा वापर उन्हाळी भुईमूग पिकात करावा. सर्वसाधारणपणे विदर्भाच्या जमिनीत झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जाणवते. माती परीक्षणाच्या अहवालात झिंक या अन्नद्रव्याची कमतरता आढळल्यास एकरी चार ते सहा किलो झिंक सल्फेट तसेच माती परीक्षणाच्या आधारावर तीन वर्षातून एकदा दोन किलो बोरॅक्स प्रति एकर या प्रमाणात पेरताना माती परीक्षणाच्या आधारावर जमिनीतून द्यावे. याव्यतिरिक्त झिंक या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे उभ्या भुईमूग पिकात आढळून आल्यास तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य निदान करून झिंक या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे आढळून चिलेटेड झिंक सल्फेट 50 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन गरजेनुसार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करावी. या व्यतिरिक्त बोरॉन व लोह यांच्या कमतरतेची लक्षणे आढळल्यास तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य निदान करून योग्य त्या उपाययोजना अमलात आणाव्यात.
(E) उन्हाळी भुईमूग पिकात जिप्समचा वापर : शेतकरी बंधुंनो जिप्सम या खतात किंवा भूसुधारक आत 24 टक्के कॅल्शिअम व 18 टक्के गंधक असते. या अन्नद्रव्याची सुद्धा उन्हाळी भुईमुगाच्या अधिक उत्पादनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या शिफारशी प्रमाणे उन्हाळी भुईमुगाचे पीक 50% फुलोरा अवस्थेत असताना प्रति हेक्टर तीनशे ते पाचशे किलो जिप्सम उपलब्धतेनुसार झाडाच्या दोन्ही बाजूला साधारणता झाडाच्या लगत पाच सेंटीमीटर अंतरावर सरळ ओळींमध्ये टाकून देणे त्यानंतर डवऱ्याचा फेर देऊन ओलित करणे फायदेशीर आढळून आलेले आहे. या बाबींमुळे भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत सुलभरित्या जाण्याकरिता तसेच शेंगा चांगल्या पोसण्यास मदत होते व उत्पादनात वाढ होते. याव्यतिरिक्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या सुधारित 2013 च्या शिफारशीप्रमाणे 400 किलो जिप्सम प्रति हेक्टर विभागून म्हणजे 200 किलो जिप्सम प्रति हेक्टर पेरणीच्या वेळेस व उर्वरित दोनशे किलो जिप्सम प्रति हेक्टर आर्या सुटताना अशीसुद्धा जिप्सम वापरण्याची एक शिफारस आहे
(G) उन्हाळी भुईमूग पिकात जैविक खताचा वापर कसा, कधी, व किती प्रमाणात करावा?
शेतकरी बंधूंनो उन्हाळी भुईमूग बियाण्याला पिकाला 250 ग्रॅम रायझोबियम व 250 ग्रॅम पीएसबी या जिवाणू खताची प्रति 10 किलो बियाण्यास या प्रमाणात बीज प्रक्रिया करून घ्यावी. भुईमुगाचे बियाणे नाजूक असल्यामुळे हे बियाणे ओले गच करणे टाळावे, हाताने चोळणे टाळावे तसेच बीज प्रक्रिया करताना प्रत्यक्ष तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य ते कौशल्य अवगत करून भुईमूग बियाण्याची साल किंवा टरफल निघणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी. आवश्यक असल्यास तज्ञाचा सल्ला घेऊनच बीजप्रक्रिया करावी. जिवाणू खताची बीजप्रक्रिया रासायनिक बुरशीनाशके किंवा रासायनिक कीटकनाशके यांच्याबरोबर करू नये तसेच रासायनिक निविष्ठांची बीजप्रक्रिया करावयाची झाल्यास ती प्रथम करावी व नंतर 15 ते 20 मिनिटानंतर जैविक खताची किंवा जैविक निविष्ठा ची बीज प्रक्रिया करावी व रासायनिक निविष्ठांची बीजप्रक्रिया केली असल्यास जीवाणू खत वापराचे प्रमाण शिफारशीपेक्षा दीडपट किंवा दुप्पट ठेवावे.
(H) उन्हाळी भुईमूग पिकात प्रती एकर रासायनिक खताची मात्रा कोणत्या रूपात, कधी, व किती प्रमाणात द्यावी?
शेतकरी बंधुंनो उन्हाळी भुईमूग पिकात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करून माती परीक्षणाच्या आधारावर शेणखत दिले असेल जिवाणू खताची बीजप्रक्रिया केली असेल तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये याच्या कमतरते प्रमाणे जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केला असेल व इतर शिफारशीत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीच्या घटकाचा वापर केला असेल तर सर्वसाधारण शिफारशीप्रमाणे उन्हाळी भुईमूग पिकात एक एकर उन्हाळी भुईमूग पिकाकरिता पेरणीच्या वेळेस डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे शिफारशीप्रमाणे माती परीक्षणाच्या आधारावर प्रती एकर 50 किलो अमोनियम सल्फेट किंवा 22 किलो युरिया , 124 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि आवश्यकता असल्यास माती परीक्षणाच्या आधारावर 20 किलो म्युरेट ऑफ पोटॅश या सरळ खताच्या रूपात खते जमिनीत पेरणीच्या वेळेस द्यावी. शेतकरी बंधूंनो उन्हाळी भुईमूग पिकाला रासायनिक खते देताना अमोनियम सल्फेट च्या रूपात खत दिल्यास मधून 20.5 टक्के नत्र व्यतिरिक्त 24 टक्के गंधक सुद्धा उन्हाळी भुईमूग पिकास मिळतो तसेच सिंगल सुपर फॉस्फेट मधून सोळा टक्के स्फुरद व्यतिरिक्त बारा टक्के गंधक आणि 21 टक्के कॅल्शिअम पिकास मिळते म्हणून ही खते तेलबिया पिकाला परिणामकारक आढळून येतात. डाय अमोनिअम फॉस्फेट भुईमूग पिकास द्यावयाचे असल्यास प्रति हेक्टर 110 किलो डीएपी या प्रमाणात द्यावे परंतु डीएपी चा वापर केला असल्यास जिप्समचा वापर जरूर करणे आवश्यक आहे. शक्यतोवर वर निर्देशित सरळ खतातून खते देणे केव्हाही चांगले
अधिक उत्पादन घेण्याकरिता उन्हाळी भुईमूग पिकात अन्नद्रव्याचे किंवा खताचे व्यवस्थापन करताना घ्यावयाच्या सर्वसाधारण काळजा.
(१) उन्हाळी भुईमूग पिकात माती परीक्षणाच्या आधारावर एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करूनच खताची किंवा अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करा.
(२) असंतुलित अविवेकी व अतिरेकी खताचा वापर टाळा विशेषता उभ्या पिकात नत्रयुक्त खताचा अवाजवी वापर टाळा.
(३) आवश्यकतेनुसार तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य खताची निवड करून शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा त्या खतातून शिफारशीप्रमाणे जाते का तसेच ते आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे आहे का व जमिनीच्या आरोग्यासंदर्भात सुद्धा ते हितावह आहे का या सर्व बाबीची शहानिशा करून शास्त्रोक्त शिफारशीप्रमाणे उन्हाळी भुईमूग पिकात अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन किंवा खताचे व्यवस्थापन करा.
धन्यवाद
source: राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम