सूक्ष्म अन्नद्रव्य व त्यांचा पिकासाठी उपयोग

0

 सूक्ष्म अन्नद्रव्य व त्यांचा पिकासाठी कसा उपयोग होतो हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.

पिकाच्या परिपूर्ण वाढीसाठी 50 पीपीएम पेक्षा कमी प्रमाणात लागणाऱ्या या अन्नद्रव्यांना सूक्ष्म अन्नद्रव्ये असे म्हंटले जाते. या अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखावी याबद्द्ल पुढे माहिती देण्यात आली आहे.

1.मॉलिब्डेनियम :

मॉलिब्डेनियमचे पिकातील कार्य :

∙मॉलिब्डेनियम पिकामध्ये नायट्रेटचे रूपांतर अमिनो ॲसिड मध्ये होण्यात कार्य करते.

∙सहजीवी नत्र स्थिरीकरणामध्ये गरजेचे आहे.

मॉलिब्डेनियम च्या उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक :

∙जमिनीचा सामू : मॉलिब्डेनियम हे एकमेव सूक्ष्म अन्‍नद्रव्य आहे जे की जास्त सामु असलेल्या मातीत सहज   उपलब्ध होते.

∙जास्त प्रमाणात पाणी वाहून जाणाऱ्या जमिनीत मॉलिब्डेनियमची कमतरता जाणवते.

मॉलिब्डेनियमचे विविध स्त्रोत आणि त्यांचे प्रमाण :

1.सोडीयम मॉलिब्डेट : 396-

2.मॉलिब्डेनियम ट्रायऑक्साईड :- 66%

3.अमोनियम मॉलिब्डेनियम :- 54%

2.फेरस (लोह) :

फेरस (लोह) चे पिकातील कार्य :-

∙हरित लवक निर्मितीत आणि हरीतलवकाच्या कार्यात गरजेचे असते.

∙पिकातंर्गत उर्जेच्या वहनासाठी गरजेचे.

∙काही एन्झाईम्स व प्रोटीन्सचा घटक आहे.

∙पिकातंर्गत अन्ननिर्मितीसाठी आणि चयापचयाच्या क्रियेत गरजेचे आहे.

∙सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या क्रियेत गरजेचे आहे.

फेरस (लोह) उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक :

∙जमिनीचा सामू : जास्त सामू असलेल्या जमिनीतील कार्बोनेटस् मुळे देखील फेरसची उपलब्धता कमी होते.

∙फेरस स्फुरद संबंध : जास्त प्रमाणातील स्फुरदामुळे फेरसची उपलब्धता कमी होते.

∙नायट्रेट नत्राच्या वापरामुळे पिकातील धन -ऋण भार (अनायन-कॅटायन) असंतुलन निर्माण होऊन फेरसची कमतरता निर्माण होते.

∙फेरस मँगनीज संबंध : दोन्ही मुलद्रव्य विरोधात असल्याने एकाची जास्त उपलब्धता दुसऱ्याची उपल्बधता कमी करते.

∙फेरस मॉलिब्डेनियम : जास्त प्रमाणातील मॉलिब्डेनम मुळे पिकाच्य मुळांवर आयर्न मॉल्बडेट चा थर तयार होतो.

फेरस चे विविध स्त्रोत व प्रमाण :

1.फेरस सल्फेट :- 20%

2.फेरस अमोनियम सल्फेट :- 14%

3.आयर्न डीटीपीए चिलेट :-10%

4.आयर्न एचईडीटीए चिलेट :- 5-12%

3.मँगनीज :

मँगनीज चे पिकातील कार्य :

∙प्रकाश संश्लेषण क्रियेत कार्बन डाय ऑक्साईडचे रुपांतर शर्करेमध्ये होण्यात कार्य करते.

∙हरीत लवक निर्मितीत आणि नायट्रेट ॲसिमिलेशन मध्ये कार्य करते.

∙मॅगनीज स्निग्ध पदार्थ तयार करण्याच्या प्रक्रियेत गरजेच्या एन्झाईम्स च्या ॲक्टिवेशनसाठी गरजेचे आहे.

∙राबोफ्लॅविन, ॲस्कोर्बीक ॲसिड आणि कॅरोटीन तयार करण्यात गरजेचे आहे.

∙प्रकाश संश्लेषण क्रियेत इलेक्ट्रॉन ची देवाणघेवाण करण्यात गरजेचे आहे. तसेच पाण्याचे विघटन करण्यात गरजेचे आहे.

मँगनीज पिकाला मिळाले की परिणाम करणारे घटक :

∙जमिनीचा सामू : मातीचा सामू जास्त असल्यास मँगनीजची उपलब्धता कमी करते, तर कमी सामू उपलब्धता   वाढवते.

∙सेंद्रीय पदार्थ : जास्त प्रमाणात सेंद्रीय पदार्थ असलेल्या जमिनीत मँगनीज त्या पदार्थासोबत स्थिर होते व त्याची कमतरता जाणवते.

∙मँगनीज फेरस संबंध : जास्त प्रमाणातील फेरस मँगनीजची उपलब्धता कमी करते.

∙मँगनीज सिलीकॉन संबंध : सिलिकॉनच्या वापराने मँगनीजची विषबाधा कमी करता येते.

∙नत्राच्या कमतरतेमुळे मँगनीजची उपलब्धता कमी होते.

मँगनीजचे विविध स्त्रोत व त्यातील मँगनीजचे प्रमाण :

1.मँगनीज सल्फेट :- 23-28%

2.मँगनीज ऑक्साईड :- 41-68%

3.चिलेटेड मँगनीज :- 5-12%

4.बोरॉन :

∙बोरॉन पिकास शर्करा आणि स्टार्च यात संतुलन साधते.

∙पिकातील शर्केरेच्या आणि कर्बोदकांच्या वहनात गरजेचे आहे.

∙परागीभवन आणि बीज निर्मितीत गरजेचे आहे.

∙नियमित पेशी विभाजन नत्राच्या चयापचयाच्या आणि प्रथिनांच्या चयापचयात गरजेचे आहे.

∙नियमित पेशीभित्तीका तयार होण्यात गरजेचे आहे.

∙पिकांतर्गत जल व्यवस्थापनात गरजेचे आहे.

बोरॅानच्या कमतरतेवर परिणाम करणारे घटक :

∙सामु : जास्त सामु बोरॉन ची कमतरता निर्माण करते.

∙जास्त प्रमाणात जमिनीत पाणी झाल्यास बोरॉन वाहून जाते व बोरॉन ची कमतरता जाणवते.

बोरॉनचे विविध स्त्रोत व त्याचे प्रमाण :

1.बोरॅक्स :- 11%

2.बोरीक ॲसिड :- 17%

3.सोडीयम टेट्राबोरेट :- 10-20%

4.सोल्युबोर :- 20%

5.कॉपर :

कॉपरचे पिकातील कार्य :

∙कॉपर पिकामधील प्रकाश संश्लेषण क्रियेत आणि श्वसनाच्या क्रियेत उत्तेजक म्हणून कार्य करते.

∙अमिनो ॲसिडचे रूपांतर प्रोटीन्स मध्ये करणाऱ्या काही एन्झाईम्स चा घटक आहे.

∙कॉपर कर्बोदके आणि प्रथिनांच्या पचनात गरजेचे आहे.

∙पिकाच्या पेशीला ताकद आणि सुरक्षा प्रदान करणाऱ्या लिग्निनच्या निर्मितीसाठी कॉपर अत्यंत गरजेचे आहे.

∙कॉपर पिकांच्या टिकाऊ क्षमतेवर चव आणि शर्करेच्या प्रमाणांवर देखील नियंत्रण करते.

∙पिकांवर कॉपर युक्त बुरशीनाशकाची सतत फवारणी होत असते त्यामुळे देखील कॉपर ची गरज भागुन निघते.

कॉपरचे विविध स्त्रोत आणि त्यातील कॉपरचे प्रमाण :

1.कॉपर सल्फेट मोनो हायड्रेट :- 35%

2.कॉपर सल्फेट 

पेटाहायड्रेट :- 25%

3.क्युप्रिक ऑक्साईड :- 75%

4.कॉपर क्लोराईड :- 17%

5.कॉपर चिलेटस :- 8-13%

6.झिंक :

झिंकचे पिकामधील कार्य :

1.ऑक्झिन्सच्या निर्मितीमध्ये गरजेचे अन्नद्रव्य प्रामुख्याने इंडॉल ॲसेटिक असिडच्या निर्मितीत सहकार्य करते. ज्यामुळे पिकाची शेंड्याची वाढ जोमदार होण्यात मदत मिळते.

2.प्रथिनांच्या निर्मितीसाठी गरजेच्या एन्झाईम्सची निर्मिती करते तसेच पिकामधील शर्करेच्या वापरासाठी गरजेचे आहे.

3.झिंक पिकामध्ये स्टार्च तयार करणे आणि मुळांच्या वाढीसाठी गरजेचे आहे.

4.झिंक बिज आणि खोडाच्या पक्वतेवर परिणाम करते.

5.झिंक हरीतलवक आणि कर्बोदकांच्या निर्मितीत गरजेचे आहे.

6.पिकाच्या पेशीमधील योग्य प्रमाणातील झिंकच्या उपस्थितीमुळे पिक कमी तापमानात देखील तग धरुन राहते.

झिंकच्या उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक :

∙जमिनीचा सामू : मातीचा सामू जास्त असल्यास झिंकची कमतरता जाणवते. मात्र हा नियम सर्वच ठिकाणी लागु होत नाही. अतिरिक्त ॲसिडीक स्वरूपातील झिंकचा वापर करुन ही कमतरता दुर करता येते.

∙झिंक आणि स्फुरद चे गुणोत्तर : जास्त प्रमाणातील स्फुरद मुळे झिंक ची कमतरता जाणवते.

∙नत्राची कमी प्रमाणातील उपलब्धता पिकाच्या वाढीवर करीत असलेल्या दुष्परिणामामुळे इतर अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते. हाच परिणाम झिंक वर देखील लागु पडतो.

∙सेंद्रीय पदार्थ : जमिनीतील सेंद्रीय पदार्थ झिंक चा पुरवठा करीत असतात. तसेच जमिनीतील सेंद्रीय पदार्थामुळे इन ऑरगॅनिक स्वरूपातील जस्ताचे चिलेशन होऊन त्याची पिकास उपलब्धता वाढते.

∙जमिनीतील जास्त प्रमाणातील पाण्यामुळे झिंकची उपलब्धता कमी होते.

∙झिंक व कॉपर चे गुणोत्तर : पिक झिंक व कॉपर एकाच पध्दतीने शोषून घेत असल्याकारणाने जर एकाचे प्रमाण वाढले तर दुसऱ्याची कमतरता जाणवते.

∙झिंक व मॅग्नेशियमचे गुणोत्तर : मॅग्नेशियमच्या वापराने झिंक चे पिकांद्वारा शोषण वाढते.

झिंकचे विविध स्त्रोत व त्यातील झिंकचे सर्वसाधारण प्रमाण :

1.झिंक सल्फेट :- 36%

2.झिंक ऑक्झिसल्फेट :- 38-50%

3.झिंक ऑक्साईड :- 50-80%

4.झिंक क्लोराईड :-50%

5.झिंक चिलेट :- 6 ते 14%

द्राक्ष पिकांतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्ये व कमतरता लक्षणे

द्राक्षबागेत अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे द्राक्षाच्या दर्जेदार व शाश्वत उत्पादनात अडचणी निर्माण होत आहे. याबाबत शेतकर्‍यांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी द्राक्ष पिकांकरिता सूक्ष्म प्रमाणात लागणारी अन्नद्रव्ये, त्यांची कार्य आणि कमरतेची लक्षणे याबाबत सदर लेखात विवेचन केले आहे.

द्राक्षबागेत योग्य प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे गरजेचे ठरत आहे, कारण विशिष्ट सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे द्राक्षाच्या दर्जेदार व शाश्वत उत्पादनात अडचणी निर्माण होत आहे. याबाबत शेतकर्‍यांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी द्राक्ष पिकांकरिता सूक्ष्म प्रमाणात लागणारी अन्नद्रव्ये, त्यांची कार्य आणि कमरतेची लक्षणे याबाबत सदर लेखात विवेचन केले आहे.

आयर्न (लोह) अन्नद्रव्यांचे प्रमुख कार्य :

1)वनस्पतीच्या पानांमध्ये हरितद्रव्ये तयार होण्याच्या प्रक्रियेसाठी लोहाची आवश्यकता असते. हरितद्रव्ये तयार करण्याच्या कार्यात लोह प्रत्यक्ष भाग घेत नाही, परंतु ते विकराचे काम करते. 

2)लोह वनस्पतीच्या शरीरात अप्रवाही स्वरूपात असल्यामुळे खालच्या भागातून वरच्या भागाकडे ते स्थलांतरित होत नाही.

3)लोहाच्या प्रमाणावर नत्राची आणि स्फुरदाची उपलब्धता, तसेच शोषणक्षमता अवलंबून असते.

आयर्न (लोह कमतरतेची लक्षणे)

1)ज्या जमिनीत चुनखडीचे (कॅल्शियम कार्बोनेटचे) प्रमाण असते, अशा जमिनीचा सामूदेखील नेहमी जास्तच (8च्या पुढे) असतो. त्यामुळे अशाप्रकारच्या जमिनीत लोह अविद्राव्य बनते आणि हे अविद्राव्य लोह वनस्पतीची मुळे शोषण करू शकत नाहीत.

2)लोहाच्या कमतरतेची लक्षणे प्रथम द्राक्षवेलीच्या नवीन पानांवर व शेंड्यावर दिसून येतात. पानांचा हिरवा रंग जाऊन ती पांढरट दिसतात, कमतरता जास्तच जाणवल्यास शेंडा, तर कधीकधी नवीन फूटदेखील पूर्णपणे मरते. यात अगोदर पाने फिकट पिवळी पडतात. नंतर पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो, परंतु शिरा मात्र हिरव्याच राहतात. यानंतर शिरांसह संपूर्ण पानेच पिवळी पडतात. 

3)बर्‍याचवेळा लोह जमिनीत असूनही वनस्पतीस मात्र उपलब्ध होत नाही. यामुळे कर्बसंश्लेषण क्रियेत अडथळा येतो व लोहाच्या कमतरतेची लक्षणे दिसू लागतात. 

4)लोहाच्या कमतरतेची लक्षणे ऋतुमानाप्रमाणे कमी जास्त होतात. कोरड्या आणि उष्ण हवामानात लोहाच्या कमतरतेची लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. द्राक्षवेलीची खरड छाटणी होऊन नेहमी उन्हाळ्यात नवीन फूट येते. अशा नवीन फुटीवर विशेषत: चुनखडीमिश्रित जमिनीतील वेलीवर ही लक्षणे जास्त प्रमाणात दिसतात.

5)फलधारणेच्या छाटणीनंतर येणार्‍या कोवळ्या फुटीवर लोहाच्या कमतरतेची लक्षणे उन्हाळ्यातील लक्षणांपेक्षा थोडी कमी तीव्र असतात. कारण या छाटणीनंतर तापमान जरी थोड्या प्रमाणात वाढत असले तरी हवा मात्र आर्द्र असते.

6)लोहाची कमतरता फार दिवसांपर्यंत पडल्यास वेलींवरील पाने पांढरट तपकिरी रंगाची बनून क्षमता कमी होते. द्राक्षवेलीच्या नवीन फुटीवर सूक्ष्म अवस्थेत घड तयार होण्याच्या कालावधीत जर लोहाच्या कमतरतेमुळे पाने पिवळी झाल्यामुळे अन्न कमी प्रमाणात तयार झाल्यामुळे व काडी व्यवस्थित पक्व न झाल्यामुळे अशा वेलींवर घड कमी प्रमाणात लागतात. जे काही घड लागलेले असतात त्यातील द्राक्षमण्यांच्या वाढीवर विपरित परिणाम होऊन ते आकाराने लहान राहतात. 

मंगल (मँगनीज) अन्नद्रव्याचे प्रमुख कार्य

1)पानाच्या श्वसनक्रियेत, तसेच नत्राच्या वितरणात जडण-घडण क्रियेत मँगनीज मदत करते. 

2)हरितद्रव्ये तयार करण्यासाठी आणि जमिनीतील हवेचे संवहन सुयोग्य नसल्यास वेलीवर जे दुष्परिणाम होतात ते नाहीसे करण्यासाठी याची मदत होते.

3)वनस्पतीच्या जैविकदृष्ट्या कार्यप्रवण असलेल्या पेशीजालामध्ये मँगनीजचे प्रमाण जास्त असते. 

4)मँगनीजचे वाजवीपेक्षा जास्त शोषण झाल्यास लोहाची कमतरता भासते.

मंगल (मँगनीज) कमतरतेची लक्षणे

1)मँगनीजच्या कमतरतेची लक्षणे प्रथम शेंड्याकडील पानांवर दिसू लागतात. जी पाने कार्यक्षम असून मँगनीजच्या कमतरतेमुळे व्यवस्थित कार्य करू शकत नाहीत. अशाच पानांवर कमतरतेची लक्षणे दिसू लागतात. 

2)हंगामानुसार कमतरतेची लक्षणे कमी-जास्त प्रमाणात दिसतात. जून महिन्यात ज्यावेळी फलधारक डोळ्यांचा भेद दिसून येतो त्यावेळी मँगनीजची आवश्यकता असल्याचे दिसून आले.

3)थंडीच्या काळात मुळाचे कार्य मंदावते. त्याचबरोबर जमिनीचा सामू 7 पेक्षा जास्त असेल तर अशावेळी कोवळ्या पानांवर मँगनीजच्या कमतरतेची लक्षणे दिसू लागतात. यामुळे पानांचा हिरवा रंग जाऊन ती पांढरट दिसतात. नवीन येणारी फूट फिकट पांढरी दिसते. 

4)पानांच्या शिरांमधील भाग पांढरट पिवळा पडतो. पाने पांढरी किंवा पिवळी पडणे हे बर्‍याच वेळा लोहाच्या कमतरतेसारखे असते, तसेच थंडीमुळे पानांचे होणारे नुकसान, विषाणूजन्य रोग आणि मँगनीजची कमतरता या सर्वांची लक्षणे प्रथमदर्शनी 

सारखीच वाटतात.

जस्त (झिंक) अन्नद्रव्यांची प्रमुख कार्य

1)या अन्नद्रव्यांचा आणि संजीवकांचा अतिशय जवळचा संबंध आहे. कारण कार्बोनिक आम्लाचे रूपांतर कर्बवायू आणि पाणी यामध्ये होण्यासाठी याचा उपयोग होतो.

2)स्फुरदाचे वितरण आणि प्रथिने तयार होण्यासाठी जी विकरे लागतात त्यासाठी जस्ताची मदत होते.

3)फुले उमलण्यास, फळधारणा होण्यास आणि सर्व द्राक्षमण्यांची एकसारखी वाढ होण्यास नैसर्गिक संजीवकांचा सहभाग असतो, परंतु जस्ताची जर कमतरता भासली, तर त्याचा संजीवकांच्या कार्यावर विपरित परिणाम होऊन त्याचे दुष्परिणाम फुले आणि द्राक्षमण्यांच्या वाढीवर होतो.

4)जस्तामुळे जिबरेलिक आम्लाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. याकरिता ज्यावेळेस जिबरेलिक आम्लाचा वापर करावयाचा असतो, अशा ठिकाणी जिबरेलिक आम्ल वापरण्यापूर्वीच्या फवारण्या ताम्रयुक्त बुरशीनाशकाऐवजी जस्तयुक्त बुरशीनाशकाच्या केल्यास चांगले परिणाम घडून येण्याची शक्यता असते. 

5)जमिनीत जस्ताचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त झाले, तर त्याचे वनस्पतीवर दुष्परिणाम होतात. 

6)हलक्या आणि रेताड जमिनीत जस्ताची कमतरता जास्त प्रमाणात दिसते.

7)जस्ताचे प्रमाण वाढल्यास लोहाची कमतरता भासते. 

8)जस्त (झिंक) कमतरतेची लक्षणे

1)द्राक्षवेलीच्या शेंड्यांची वाढ खुंटते. शेंड्याकडील आणि बगल फुटीची पाने नेहमीपेक्षा लहान राहतात.

2)बगल फुटीची पाने पिवळी पडतात. त्यांच्या देठाचा शेंडा पसरट होते. हा पिवळेपणा शेंड्याकडून बुडाकडे वाढत जातो, तसेच काड्याची लांबी कमी होते.

3)जस्ताप्रमाणेच मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणेही दिसतात, परंतु फरक असा की मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणे फुटीच्या बुडाकडील पानावर प्रथम दिसतात तर जस्ताच्या कमतरतेची लक्षणे बगलफुटीच्या शेंड्याकडील पानांवर प्रथम दिसतात.

तांबे (ताम्र) अन्नद्रव्याचे प्रमुख कार्य

1.द्राक्षवेलीमध्ये प्रथिने तयार होण्यासाठी, हरितद्रव्ये तयार होण्यासाठी आणि लोहाचा योग्य प्रकारे वापर घडवून आणण्यासाठी ताम्राची मदत होते. 

2.तांबे (ताम्र) अन्नद्रव्य श्वसनक्रियेचे नियमन करते.

3.वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी ताम्राचा चांगला उपयोग होतो. 

4.ताम्राचे प्रमाण जर जमिनीत जास्त झाल्यास वेलीची वाढ खुंटते, पाने पिवळी पडून शेवटी पांढरी होतात, फांद्याची संख्या कमी होते.

तांबे (ताम्र) कमतरतेची लक्षणे

1)ताम्राची कमतरता भासल्यास वेलीवरील कोवळ्या पानांचा शेंडा वाळतो व नंतर पानांच्या कडा वाळतात. पानं सुरकुतल्यासारखी दिसून काही वेळेस संपूर्ण पानेच कोमेजल्यासारखी दिसतात. 

2)द्राक्षमण्यांचा रंग बदलून वाढ व्यवस्थित होत नाही, त्याचप्रमाणे द्राक्षमण्यांची प्रतही खालावते.

3)कोरडे हवामान, प्रखर सूर्यप्रकाश, जमिनीचा सामू 8 पेक्षा जास्त झाल्यास ताम्राची कमतरता जाणवते. 

4)नत्रखताचा वाजवीपेक्षा जास्त वापर झाल्यास ताम्राची कमतरता जाणवते. 

बोरान अन्नद्रव्याचे प्रमुख कार्य 

1)बोरान एक अधातू सूक्ष्म द्रव्यांपैकी असून त्याची द्राक्ष पिकास अत्यंत आवश्यकता असते.

2)द्राक्षवेलींत कॅल्शियम विद्राव्य स्थितीत राहण्यास व त्याचे स्थलांतर होण्यास मदत होते.

3)पाण्याचे शोषण आणि वहन यासारख्या क्रियेत बोरानची मदत होते.

4)बोरान वनस्पती पेशी आवरणाचा घटक असून पेशी विभाजनास मदत करते.

5)बोरान हे चयापचयाच्या क्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नसले, तरी पानांत तयार झालेली साखर फळात नेण्याचे कार्य बोरानमुळे होते.

6)पुंकेसराचे कार्य व्यवस्थित पार पडण्यासाठी बोरानची मदत होते.

7)नत्राचे शोषण, तसेच साखरेचे स्थलांतर घडवून आणण्यास बोरानची मदत होते.

8)बोरानमुळे शेंड्याकडील वाढ होण्यास आणि तेथे असलेल्या संजीवकांचे कार्य व्यवस्थित होण्यास मदत होते.

9)बोरान कमतरतेमुळे पेशींची वाढ होण्यास व त्यांची लांबी वाढण्यास कारणीभूत असलेली संजीवके कार्य करत नाहीत. त्यामुळे शेंड्यांची वाढ खुंटणे, फांद्याची लांबी कमी होणे यासारखे प्रकार उद्भवतात.

बोरान कमतरतेची लक्षणे

1)बोरानच्या कमतरतेची लक्षणे प्रथम कोवळ्या फुटीवरील शेंड्याकडील पानांवर दिसतात. पाने एकमेकांत दुमडल्यासारखी दिसतात, त्यांची वाढ खुंटते, शेवटी शेंडा मरतो आणि त्यामुळे बगल फूट जास्त प्रमाणात वाढते. 

2)बोरानच्या कमतरतेमुळे पाने प्रथम पांढरट दिसतात आणि नंतर लालसर विटकरी रंगाची होतात.

3)बोरानच्या कमतरतेमुळे मुळांची वाढ खुंटते. पेशींचा लांबटपणा आणि त्यांची वाढ खुंटते.

4)द्राक्षवेलींवर फळधारणेच्या वेळी बोरानची कमतरता भासल्यास फळधारणा कमी होते.

5)फळवाढीच्या काळात बोरानची कमतरता भासल्यास फळांची वाढ मंदावते व त्यामुळे द्राक्षमण्यांचा आकार नेहमीप्रमाणे मोठा होत नाही.

6)कधीकधी जिबरेलिक आम्लाचा योग्य प्रमाणात वापर करूनदेखील द्राक्षमण्याची लांबी आणि आकार यामध्ये वाढ होत नाही. अशावेळी बोरानची कमतरता असण्याची शक्यता जास्त जाणवते. 

7)जमिनीत ओल जर कम

ी असेल तर त्याचादेखील बोरानची कमतरता वाढवण्यास मदत होते. 

8)अतिपावसाच्या भागातील जमिनी त्याचप्रमाणे वाजवीपेक्षा जास्त आणि लवकर निचरा होणार्‍या व हलक्या जमिनीत बोरानच्या कमतरतेची लक्षणे आढळतात.

9)ज्या जमिनीत चुना घातलेला आहे आणि सामू 7 पेक्षा जास्त आहे अशा जमिनीत बोरानची कमतरता आढळून येते.

मॉलिब्डेनम (मोलाब्द) अन्नद्रव्यांचे प्रमुख कार्य

1)द्राक्षवेलीस मोलाब्दची आवश्यकता ताम्र आणि जस्तापेक्षा कमी असून त्यांचे प्रमाण जर आवश्यकतेपेक्षा जास्त झाले तर वनस्पतीवर प्रतिकूल परिणामही होतो.

2)नत्राचा पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी आणि लोह जास्त प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी मॉलिब्डेनमची मदत होते.

3)तसेच ताम्र, बोरान, मँगनीज, जस्त इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल मॉलिब्डेनममुळे राखला जातो.

4)यामुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी मदत होते.

5)वनस्पतीमध्ये अ‍ॅस्कॉर्बिक आम्ल तयार होण्यासाठी मॉलिब्डेन आवश्यक असते.

मॉलिब्डेनम (मोलाब्द) कमतरतेची लक्षणे

1)द्राक्षवेलीवरील जुनी पक्व पाने हिरवट पिवळसर दिसतात. पानाच्या कडा गुंडाळल्या जाऊन त्या गुलाबी, नारंगी रंगाच्या दिसतात.

2)जुनी पक्व पाने नंतर सुरकुतल्यासारखी होऊन त्यांच्या कडा चुरगळतात आणि शेवटी ती वाळतात.

3)कमतरतेची अशी लक्षणे पक्व पानांवरून हळूहळू कोवळ्या पानांवरही दिसू लागतात. अशा कोवळ्या फुटीचा शेंडा वाळतो आणि नंतर त्यावरील पाने वाळून जातात. 

4)फुलांची व द्राक्षमण्यांची गळ जास्त प्रमाणात होऊन त्याचा फळांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो.

5)जमिनीचा सामू कमी असल्यास (आम्लयुक्त) आणि ज्या जमिनीत लोह जास्त प्रमाणात असते अशा ठिकाणी मॉलिब्डेनमची कमतरता जास्त भासते आणि उपलब्धता कमी होते. 

विविध अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे द्राक्षबागेत होणार्‍या अनेक प्रकारच्या समस्या

मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी नत्र, स्फुरद, पालाश, मॉलिब्डेनम, जस्त आणि मँगनीज यांच्या कमतरतेची लक्षणे सर्वसाधारणपणे जुन्या पानांवर व फुटीवर आढळतात. लोह, ताम्र, गंधक आणि मॅग्नेशियम यांच्या कमतरतेची लक्षणे फुटीच्या मधील पानांवर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची लक्षणे शेंड्याकडील पानांवर आढळतात.

वरील सर्व प्रकारच्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे द्राक्षबागेत अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. या समस्यांकरता कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता कारणीभूत असते याबद्दल खालील तक्त्यात माहिती दिली आहे.

क्र. 1) द्राक्षबागेत आढळणार्‍या समस्या 

1)मुख्य ओलांड्यावरील डोळे अयोग्य प्रकारे आणि उशिरा फुटणे

2)दुय्यम आणि त्रितीय ओलांड्यावरील डोळे उशिरा आणि अयोग्य प्रकारे फुटणे.

3)काड्या एकसारख्या पक्व न होणे.

4)केवडा व भुरी रोग पडणे.

5)एकसारखे द्राक्षमणी लागत नाहीत व डोळे योग्य प्रकारे न फुटणे.

6)मण्यांची गळ होणे.

7)मणी लागत नाहीत, ते पानचट होणे व शेवटी सुकू लागणे.

8)मण्याची एकसारखी पक्वता न होणे व त्याचा अयोग्य रंग बदल होतो.

9)निकृष्ट दर्जा, आंबट रुची, जाड साल होणे.

10)काडी लवकर पक्व न होणे.

कारणीभूत घटक : अन्नद्रव्याची कमतरता

1)कॅल्शियम, बोरान व नत्र

2)नत्र, बोरान न कॅल्शियम

3)ताम्र, बोरान व कॅल्शियम

4)मॉलेब्डेनम, मॅग्नेशियम व बोरान

5)बोरान, जस्त, स्फुरद व ताम्र

6)बोरान व ताम्र

7)जस्त, मँगनीज, कॅल्शियम व बोरान

8)लोह, मँगनीज, कॅल्शियम व मॅग्नेशियम 

9)मँगनीज, बोरान व पालाश

10)पालाश 

द्राक्षबागेत अन्नद्रव्याच्या उपलब्धतेबाबत काही विशिष्ट बाबी

1)जमिनीचा सामू 7 पेक्षा जास्त असतो अशावेळी लोह, जस्त मँगनीज व बोरान या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासते.

2)ज्यावेळेस सामू 7 पेक्षा कमी असतो तेव्हा नत्र, स्फुरद आणि पालाश ही अन्नद्रव्ये उपलब्ध होत नाही, तर मँगनीज याची उपलब्धता वाढते.

3)जमिनीचा सामू 7च्या आसपास असल्यास अन्नद्रव्याचा योग्य तो समतोल राखला जाऊन त्यांची उपलब्धता व्यवस्थित होण्यास मदत होते.

4)नत्राचा वापर वाढल्यास इतर अन्नद्रव्याचादेखील वापर वाढतो. हलक्या रेताड जमिनीतून नत्राचा पुरवठा कमी होतो. नत्रपुरवठा वाढला तर पालाशचा वापर वाढतो. 

5)जमिनीत कॅल्शियम जास्त असले तर स्फुरदाची उपलब्धता कमी होते. कॅल्शियमचे प्रमाण वाढल्यास लोह, मँगनीज व जस्ताची उपलब्धता कमी होते.

6)स्फुरदाच्या जास्त वापराबरोबर मॅग्नेशियमची गरज वाढत जाते.

7)गंधकाचा वापर कॅल्शियम आणि पालाश यांच्याबरोबर त्याच्या सहगमनामार्फत होत असतो आणि म्हणूनच गंधकाची उपलब्धता वरील दोन्ही अन्नद्रव्यांवर अवलंबून असते.

8)जेथे कॅल्शियम, मँगनीज जस्त आणि ताम्र जास्त प्रमाणात असते तेथे लोहाची कमतरता भासते.

9)तापमानात घट झाल्यास किंवा स्फुरदाचा वापर वाढल्यासही लोहाची कमतरता भासते.

10) स्फुरद आणि कॅल्शियम यांचे प्रमाण वाढल्यास जस्ताची कमतरता भासते.

11)उष्ण व कोरड्या हवामानात, तसेच हलक्या जमिनीत बोरानची कमतरता भासतो 

12

)चोपण व चुनखडीयुक्त जमिनीत मॉलिब्डेनमची कमतरता भासते, तेथे इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य व्यवस्थित होण्यास अडथळे येतात. 

Source:

डॉ. हरिहर कौसडीकर संशोधन संचालक, महाराष्ट्र

कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »