1 ट्रिलियन डॉलर व्यापारी मालाच्या निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एमएसएमईंसाठी वाढीव आणि माफक दरात कर्ज उपलब्धता सुनिश्चित करण्याचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे बँकर्सना आवाहन
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी, 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सच्या व्यापारी मालाच्या निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) वाढीव आणि माफक दरात कर्ज उपलब्धता सुनिश्चित करण्यास भारतीय बँकांना सांगितले. एमएसएमई निर्यातदारांच्या निर्यात कर्जाची उपलब्धता वाढवण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत पियुष गोयल बोलत होते.
काल नवी दिल्ली येथे केंद्रीय वाणिज्य विभाग आणि एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन लिमिटेड च्या समन्वयाने ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया अशा 21 बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ईसीजीसीचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक, श्री एम. सेंथिलनाथन यांनी ‘एक्सपोर्ट क्रेडिट आणि एक्सपोर्ट क्रेडिट इन्शुरन्स फॉर बँक्स’ या विषयावर एक सादरीकरण केले.
या बैठकीत पीयूष गोयल म्हणाले, की ईसीजीसी सर्व नऊ बँकांसाठी प्रस्तावित केलेल्या योजनेच्या विस्ताराचे परीक्षण करू शकते, जेणेकरून एमएसएमई निर्यातदारांसाठी असलेल्या निर्यात कर्जाची मागणी वाढवता येईल.
बँकर्सनी सुचवले, की ईसीजीसीने क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायझेस (CGTMSE) प्रमाणेच दावा प्रक्रिया पद्धतीचे अवलंबन करावे, ज्यासाठी ईसीजीसीला त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी समान धर्तीवर एक पद्धत अनुसरण्याचा सल्ला वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी दिला.
बँकांनी प्रस्तावित योजनेचा लाभ घ्यावा आणि एमएसएमई निर्यातदारांना पुरेसे आणि परवडणारे निर्यात कर्ज द्यावे असा सल्ला गोयल यांनी यावेळी दिला. यामुळे देशाला 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्स व्यापारी निर्यातीचे लक्ष्य गाठणे शक्य होईल. पुढील चार महिन्यांत सर्व ईसीजीसी सेवा डिजिटल केल्या जातील, अशी माहिती देखील गोयल यांनी दिली.