हिंगोलीत कृषी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी उधळल्या नोटा

0

हिंगोलीत कृषी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी उधळल्या नोटा


हिंगोली : अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट अशा एकापाठोपाठ येणाऱ्या संकटांना तोंड देताना शेतकरी हैराण झाला आहे. असे असताना खरिपाच्या तोंडावर बोगस कीटकनाशक विक्रेत्या कंपन्यांचा शिरकाव झाला असून, ही कीटकनाशके फवारताना शेतकऱ्यांना विषबाधा होत आहे; परंतु त्या कंपन्यांवर कृषी विभाग कारवाई करीत नसल्याचा आरोप करीत २२ मे रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर नोटा उधळल्या. पैसे घ्या; पण बोगस कंपन्यांवर कारवाई करा, अशी मागणी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुपारी १२ च्या सुमारास हिंगोली येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय गाठले. बोगस कीटकनाशक कंपन्यांची चौकशी करून कारवाई का केली जात नाही? असे विचारण्यात आले. जवळपास सातशेहून अधिक बोगस कंपन्या पिकांवर फवारणीसाठी कीटकनाशक विक्री करीत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. ही कीटकनाशके फवारताना शेतकऱ्यांना विषबाधा होत आहे. त्यामुळे त्या कंपन्यांवर कारवाई करावी यासाठी वारंवार निवेदने देऊनही अभय का? देण्यात येते असा जाब विचारला. पैसे हवे असतील तर शेतकरी देतील; पण त्या कंपन्यांवर कारवाई करा असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, गजानन कावरखे यांनी पैसे उधळले. या प्रकारामुळे कृषी अधीक्षक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कक्ष सोडून बाहेर आले होते. तर शेतकरीही मोठ्या संख्येने जमले होते. दोन दिवसांत कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
महिन्यापूर्वी दिले होते निवेदन…हिंगोली जिल्ह्यात आंध्र प्रदेशातून काही कंपन्यांचे बनावट कीटकनाशक बाजारात विक्रीसाठी आल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. जिल्ह्यात आलेल्या कीटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी घेऊन प्रयोगशाळेत पाठवावेत त्यानंतर अप्रमाणित नमुने असलेल्या कंपन्यांकडे कारवाई करावी अशी मागणी केली. यासंदर्भात सुमारे एक महिन्यापूर्वी निवेदन दिले होते.
दागिने मोडून पैसे आणले…जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात नोटा उधळताना हे पैसे दागिने मोडून आणल्याचे आंदोलकांनी सांगितले. अतिवृष्टी, अवकाळीमुळे पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे; परंतु कृषी विभागाकडून कारवाईसाठी वेळकाढू धोरण अवलंबिले जात असल्याचा आरोप केला.
माझोड येथील शेतकऱ्याला झाली होती विषबाधा…सेनगाव तालुक्यातील माझोड येथील शेतकरी दशरथ गजानन मुळे यांनी १६ मे रोजी फवारणी करताना सर्व सुरक्षा कवच वापरले; परंतु त्यांना विषबाधा झाली होती. मळमळ, भोवळ येत असल्याने त्यांच्यावर गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. यासंदर्भात त्यांनी १८ मे रोजी गोरेगाव पोलिस ठाण्यात संबंधित कंपनी व कीटकनाशक विक्रेत्यावर कारवाईची मागणी केली आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »