पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार समोरसमोर आले आणि….

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार देण्यात आल्याबद्दल शरद पवार यांनी आनंदही व्यक्त केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकमान्य टिळक यांची महती सांगणारं एक भाषण केलं. या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा लोकमान्य टिळक स्मारक समितीचे सदस्य, मंचावर उपस्थित असलेले शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अजित पवार आणि पंतप्रधान मोदी जेव्हा समोरा समोर आले तेव्हा घडलेला प्रसंग चर्चेत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार समोर आले तेव्हा काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटले. त्यांच्याशीही त्यांनी हात मिळवला. पुढे गेल्यानंतर जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी समोरासमोर आले तेव्हा त्यांनी अजित पवारांशी हात तर मिळवलाच शिवाय त्यांच्या हातावर हलकेच थोपटलं. त्यानंतर अजित पवार यांनी सूचक हास्यही केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यानंतर वळले आणि पुढच्या कार्यक्रमाला निघून गेले.

अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून २ जुलै रोजी शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची महाराष्ट्रात ही पहिलीच भेट झाली. जाहीर कार्यक्रमात हे दोघं पहिल्यांदाच समोर आल्याचं दिसलं. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांना अशा प्रकारे थोपटणं आणि त्यानंतर अजित पवार यांनी स्मित हास्य करणं याचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात. व्हिडीओत आणि फोटोत ही बाब कैद झाली आहे. विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरही स्मित हास्य आहे हे दिसून येतं आहे. ही पुढे येणाऱ्या नव्या समीकरणांची नांदी तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरु झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळी ११ वाजता पुण्यात पोहचले. त्यानंतर त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा केली. त्यानंतर अभिषेक आणि आरतीही केली. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुरस्कार कार्यक्रमासाठी गेले होते. या कार्यक्रमातलं भाषण केल्यानंतर सगळ्यांना जाताना जे अभिवादन केलं त्यात अजित पवारांना केलेलं अभिवादन काहीसं वेगळं होतं ज्याची चर्चा होते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »