नांदेड : खासदार हेमंत पाटलांवर अस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
नांदेड : खासदार हेमंत पाटलांवर अस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर, शिवसेनेचे खासदार हेमंत पाटलांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या हेमंत पाटलांनी थेट रुग्णालयाच्या डीनलाच स्वच्छतागृह साफ करायला लावले. या प्रकरणानंतर विरोधकांनी टीका करत थेट राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर खासदार हेमंत पाटलांवर नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डीनने केली तक्रार
रुग्णालयाच्या डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांनी खासदार हेमंत पाटलांवर अस्ट्रॉसिटीचाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक जगदीश भांडारवाड यांनी ही माहिती दिली.
हेमंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया
घडलेल्या प्रकारानंतर खासदार हेमंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, रुग्णालयातील अनास्थेपोटी त्यांनी हे कृत्य केले. रुग्णालयात 260 कर्मचारी स्वच्छतेसाठी आहेत. 36 रुग्ण दगावल्यानंतरही अधिकारी स्वतः चेंबरमधून बाहेर येत नाहीत. यामुळे प्रचंड अनास्था या रुग्णालयात पाहायला मिळत आहे.
मंगळवारी घडले काय?
नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय आणि रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर रुग्णालयाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. यावेळी रुग्णालयातील स्वच्छतागृह हे अतिशय घाणेरड्या स्थितीत होते. अनेक शौचालय हे ब्लॉक होते. काही ठिकाणी तर स्वच्छतागृहात पाणी देखील नव्हते. त्यानंतर रुग्णालयाच्या डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांना हेमंत पाटलांनी स्वच्छतागृह साफ करायला लावले.
प्रतिक्रिया
या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुप्रिया सुळे यांनी हेमंत पाटलांवर टीका केली आहे. त्यांनी सरकारने हेमंत पाटलांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
सेंट्रल मार्डने दिला इशारा
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेडच्या अधिष्ठातांबरोबर खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या गैरवर्तवणुकीसंदर्भात सेंट्रल मार्ड आक्रमक झाले आहे. सेंट्रल मार्डने खासदार हेमंत पाटलांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागावी, अन्यथा डॉक्टर्स महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.