अवकाळीने जनावरांच्या चाऱ्याचे उभे केले नवे संकट; ज्वारीची धसकटाला फुटली विषारी पालवी
अवकाळीने जनावरांच्या चाऱ्याचे उभे केले नवे संकट; ज्वारीची धसकटाला फुटली विषारी पालवी
जालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उन्हाळी ज्वारीची लागवड केली होती. नुकतीच या पिकांची काढणी शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या महिनाभरापासून सातत्याने अवकाळी पाऊस होत आहे. या पावसाच्या पाण्यामुळे ज्वारीच्या धसकटाला हिरवीगार पालवी फुटली आहे. ही पालवी जनावरांना आकर्षित करत आहे. परंतु, या पालवीमध्ये विषारी घटक निर्माण झाल्याने ते खाल्ल्यास जनावरांना किराळ लागून मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना ज्वारीच्या बाटुकापासून दूर ठेवण्याचे आवाहन पशुवैद्यकीय डॉक्टरांनी केले आहे.
रब्बी हंगामात पाण्याची उपलब्धता मुबलक होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उन्हाळी ज्वारीची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. उशिरा लागवड झालेल्या ज्वारीचे पीक काही ठिकाणी उभे आहे. तर काही ठिकाणचे पीक अवकाळी पावसामुळे आडवे झाले आहे. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या ज्वारीची काढणी करून शेत मोकळे केले नाही. अशा शेतातील ज्वारीच्या धसकटाला अवकाळी पावसामुळे उन्हाळ्यात पालवी फुटली आहे. परंतु, ही पालवी विषारी असून, जनावरांनी ती खाल्ल्यास विषबाधा म्हणजे किराळ लागून मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने शेतकरी व पशुपालकांना आपल्या जनावरांना या ज्वारीच्या पालवीपासून दूर ठेवण्याचे आवाहन केले आहे.
जनावरे सोडू नयेत विषारी ज्वारीची पालवी खाल्ल्याने जनावरांना विषबाधा होऊन मृत्यू होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जनावरे पालवी फुटलेल्या ज्वारीच्या शेतात चरण्यासाठी सोडू नयेत.डॉ. एम.डी , कामटे, पशुवैद्यकीय अधिकारी, वाटूर
धन्यवाद
🙏🙏🙏