तुळजाभवानी मंदिराच्या खजिन्यातून चांदीचा मुकूट गहाळ, वाचा अजून काय झाले आहे गहाळ…

0

छत्रपती संभाजीनगर : तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातून ६३ भार वजन असलेला चांदीचा रेशमासह मुकूट गहाळ झाला असल्याचे समोर आले आहे. मंदिर संस्थानाच्या वतीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत तसा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. सन २०११  पूर्वी चांदीचा मुकूट मंदिरातून गायब झाला असल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर चांदीची प्रभावळ, चांदीचे त्रिशूळ, मोत्याचे आणि सोन्याचे तुकडे असा दुर्मीळ आणि पुरातन अलंकाराचा मोठा ऐवज तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातून गायब करण्यात आला आहे.

तुळजाभवानी देवीचा सोन्याचा सुमारे एक किलो वजनाचा मुकूट गहाळ झाल्याच्या वृत्ताने सगळीकडेच खळबळ माजली होती. ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम ही बाब अहवालाच्या आधारे चव्हाटय़ावर आणली. त्यानंतर मंदिर प्रशासनाने सारवासारव करीत सोन्याचा मुकूट सापडल्याचा दावा केला आहे. पोलीस आता वस्तुस्थिती नक्की काय, याचा तपास करीत आहेत. दरम्यान, तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तहसीलदार सोमनाथ माळी यांना तक्रार देण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केले. माळी यांनी दिलेल्या तक्रारीत डबा क्र. ७ मधील रेशमासह ४३ भार वजन असलेल्या चांदीच्या मुकुटाचा अपहार झाला असल्याचे म्हटले आहे. हा चांदीचा मुकूट महंत चिलोजीबुवा यांच्या ताब्यात होता.

तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील एक ते सात डब्यात असलेल्या पुरातन, दुर्मीळ आणि मौल्यवान अलंकारांपैकी १७ अलंकार खजिन्यातून गायब झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांपैकी चार तुळजाभवानी देवीचे महंत आहेत. या चार महंतांपैकी तीन महंत मृत असून, महंत चिलोजीबुवा हे एकमेव आरोपी सध्या हयात आहेत. तत्कालीन सहायक धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तेही आजघडीला हयात नाहीत. तर पलंगे, असे अडनाव असल्यामुळे नेमके कोणते पलंगे आरोपी, असा संभ्रम सध्या तुळजापूर शहरात निर्माण झाला आहे. एक अज्ञात आरोपी असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्या वेळी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या आढाव्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महंत चिलोजीबुवा हेही उपस्थित होते.

गहाळ झालेले अलंकार

*डबा क्र. १: मंगळसूत्र, जडावी मोत्यासह, कानजोड जडावी मोत्यासह, छत्रजडावी मोत्यासह त्यात एक छोटा माणिक, चार लहान मोती, तीन लाल मोती असलेली पट्टी जडावी, सहा माणिक खडे असलेली नेत्रजोड जडावी.

*डबा क्र. २ : सहा माणिक खडे असलेली नेत्रजडावी १९७५ पूर्वी गायब असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

* डबा क्र. ३ : एक माणिक असलेली नेत्र जडावी, मंगळसूत्र वाटीतील एक माणिक, एक मोती आणि मंगळसूत्र जडावी सन २०११ पूर्वी गहाळ झाली आहे.

*डबा क्र. ४ : २२ भार वजन असलेले चांदीचे खडाव जोड ऑगस्ट २००० च्या आसपास मंदिरातून गायब झाले आहेत.

* डबा क्र. ५ : ३४ भार वजन असलेले चांदीचे खडावजोड हा पुरातन अलंकार १९८१ ते २००० या कालावधीत महंत चिलोजीबुवा यांच्या ताब्यातून अपहृत झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

*डबा क्र. ६ : मोत्याची नथ (तिचे वजन उपलब्ध नाही) २०११पूर्वी तीही अपहृत झाली आहे. ३१ भार वजनाचा चांदीचा खडावजोड याच कालावधीत लुबाडण्यात आला आहे. १२  पदर व ११ पुतळय़ा साखळीसह असलेले ६३ भार वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चिलोजीबुवा यांच्या ताब्यात होते. 

*  डबा क्र. ७ : चांदीचे शेवंतीचे फूल, सहा मोती, सोन्याचे तुकडे, तीन खडय़ांसह सोन्याची जडावी असलेले तानवटे जोड, तीन हिरवे पाचू असलेला माचपट्टा आणि ४३ भार वजन असलेला चांदीचा मुकूट तुळजाभवानीच्या खजिन्यातून २०११ पूर्वी गायब झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »