अजून किती दिवस आम्हाला वेड्यात काढणार? मनोज जरांगेंचा अजित पवारांना प्रश्न

0

काजी सांगवी (उत्तम आवारे ): मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं आहे. राज्य सरकारने २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, गुरुवारी (२१ डिसेंबर) कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतर काही नेत्यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि मुदत वाढवून देण्याची मागणी केली. परंतु, मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले, कोणीही कुठलीही मागणी केली तरी सरकारला कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावं लागेल. कायद्याच्या चोकटीत टिकणारं आरक्षण द्यावं लागेल.

अजित पवार यांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील म्हणाले, आम्ही कायद्याच्या चौकटीबाहेरचं काही मागितलेलं नाही. ५४ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. इतर कुठल्याही समाजातील लोकांच्या इतक्या नोंदी सापडल्या नाहीत. याआधी ज्यांना आरक्षण दिलं आहे त्यापैकी अनेक समाजांच्या नोंदी नाहीत, अनेक समाज मागास सिद्ध झालेले नाहीत, तरीदेखील त्यांना आरक्षण दिलं आहे. परंतु, मराठ्यांकडे नोंदी आहेत, ते मागास आहेत हे सिद्ध झालं आहे, तरीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. सरकारच्या नजरेत कायद्याची चौकट उलटी आहे का? ज्या समाजांच्या नोंदी नाहीत, जे मागास सिद्ध झालेले नाहीत त्यांना आरक्षण द्यायचं आणि जे मागास सिद्ध झालेत किंवा ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण द्यायचं नाही, अशी सरकाची उलटी चौकट आहे का? अजून किती दिवस आम्हाला वेड्यात काढणार?

मराठा आरक्षणासाठी लढणारे जरांगे पाटील म्हणाले, जनता आता हुशार झाली आहे. तुम्ही स्वतःला हुशार समजत होता आणि लोकांना वेड्यात काढत होता. परंतु, ते आता चालणार नाही. मराठा समाजाने अजून किती दिवस अन्याय सहन करायचा? आम्हाला आरक्षण हवं आहे. मराठा समाजाला ओबीसीतच आरक्षण मिळू शकतं आणि आम्ही ते घेणार.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी परभणीतल्या सेलू येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी राज्य सरकारला कठोर इशारा दिला आहे. पाटील म्हणाले, सरकारने आता तरी भानावर यावं, पुन्हा एकदा लाठीमार करण्याचा प्रयोग करू नये. अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं कठीण होईल. आता आम्ही मागे हटणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »