Nano Urea Technology : शाश्वत शेतीसाठी ‘नॅनो युरिया’ तंत्रज्ञान ठरेल उपयुक्त
Nano Urea Technology : शाश्वत शेतीसाठी ‘नॅनो युरिया’ तंत्रज्ञान ठरेल उपयुक्त
शेती क्षेत्रामध्ये आमूलाग्र संशोधने आणि बदल घडताना दिसत आहेत. शेतकरीही या नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करत चालले असून, त्यातून पीक उत्पादन आणि उत्पादकतेच्या बाबतीमध्ये एक प्रकारची क्रांती घडून येत आहे. पर्यायाने हे तंत्र शेतकऱ्यांसाठीही फायद्याचे ठरत आहे. शेतकऱ्यांसाठी उपयोगी अशा नॅनो युरिया तंत्रज्ञानाविषयी माहिती घेऊ.
त्यातून पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांकडून त्याचा स्वीकारही मोठ्या प्रमाणात झाला. त्यातही शेतकऱ्यांना अन्य खते माहिती असली किंवा नसली तरी त्यांना युरिया हे नत्रयुक्त खत नक्कीच माहिती असते.
कारण पिकांच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांमध्ये नत्र पहिल्या क्रमांकावर येते. त्याचा वापरही बहुतांश सर्व शेतकरी करत असतात.
नॅनो युरिया म्हणजे काय?
या शब्दातील ‘नॅनो’चा अर्थ आपण जाणून घेतला तर बहुतांश सर्व बाबी समजतील. एक नॅनो म्हणजे एक मीटरचा एक अब्जावा भाग. त्यामुळे नॅनो टेक्नोलॉजी या साठी मराठीमध्ये अब्जांशी तंत्रज्ञान असा शब्दही वापरला जातो.
युरिया म्हणजेच नत्राचे इतक्या सूक्ष्म आकाराचे कण तयार करून त्याचे द्रवरूप असे खत शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. युरियाची तीव्रता तेवढीच ठेवलेली असली तरी त्याचे नॅनो स्वरूप तयार केल्यामुळे त्याची कार्यक्षमता प्रचंड वाढते.
म्हणजेच सोप्या भाषेमध्ये सांगायचे तर ४५ किलो वजनाच्या पोत्यात सामावले जाणारे युरिया इथे केवळ ५०० मिलिलीटर ‘नॅनो युरिया’ बाटलीतून मिळू शकते. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये युरिया खतांचा वापर ५० टक्क्यांने कमी करता येईल.
या द्रवरूप खताची फवारणी पिकांच्या पानावर करावी लागते. त्याचे कण अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्यांचे शोषण पानांकडून त्वरित केले जाते. पिकामध्ये शोषले जाऊन त्याचा संपूर्ण उपयोग पिकांकडून केला जाईल.
हे खत जमिनीमध्ये टाकले जात नसल्यामुळे जमिनीवर होणारे रासायनिक खतांचा अन्य विपरीत परिणाम अजिबात होणार नाही. त्याच प्रमाणे निचरा होऊन भूजल किंवा पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषणही होणार नाही. म्हणजेच एकूणच पर्यावरणासाठी ते अजिबात हानिकारक नाही.
फायदे
– सर्व पिकांसाठी फवारणीद्वारे वापरणे शक्य.
– पारंपरिक दाणेदार युरिया खताला उत्तम पर्याय ठरू शकतो.
-शेतामध्ये जमिनीत खत देण्याच्या तुलनेमध्ये खतांमध्ये व त्यासाठी लागणाऱ्या खर्चामध्ये मोठी बचत शक्य.
– पिकाच्या उत्पादकतेत वाढ होते.
-पर्यावरणावरील विशेषतः माती, हवा आणि पाण्याची गुणवत्ता
यावरील विपरीत परिणाम कमी होतात.
– पारंपरिक युरियाच्या तुलनेत ‘नॅनो युरिया’ कमी लागतो. साठवणूक व वाहतूक यावरील खर्चही कमी होतो.
…असा करता येईल वापर
-नॅनो युरिया २ ते ४ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणीद्वारे वापरण्याची शिफारस केली गेली आहे. (ज्या पिकांना नायट्रोजन कमी प्रमाणात लागतो, तिथे २ मिलि, तर ज्या पिकांना नायट्रोजन अधिक लागतो, त्या पिकांसाठी ४ मिलि असे प्रमाण ठेवता येते.)
-भाजीपाला, तेलबिया पिके, अन्नधान्य, कापूस इ. पिकांसाठी दोनदा युरियाची फवारणी करण्याची शिफारस केली जाते. पेरणी अथवा लागवड झाल्यानंतर ३० ते ३५ दिवसांनी पहिली फवारणी करावी. दुसरी फवारणी फुलोरा येण्याच्या एक आठवड्याआधी म्हणजेच पहिल्या फवारणीच्या २५ दिवसानंतर करावी.
– कडधान्य पिकासाठी एकदा फवारणीची शिफारस आहे.
– एक एकर क्षेत्रासाठी फवारणीला दीडशे लिटर पाणी वापरण्याची शिफारस आहे.
वापरताना घ्यावयाची काळजी
-नॅनो युरियाची बाटली वापरण्यापूर्वी चांगली हलवून घ्यावी.
– फ्लॅट फॅन नोझलचा वापर करावा.
– ही फवारणी सकाळी किंवा संध्याकाळीच करावी. या वेळी पिकांच्या पानांची शोषण क्षमता चांगली असते.
– तीव्र सूर्यप्रकाश, जोरदार वारा आणि जास्त दव असेल तेव्हा फवारणी करणे टाळावे.
– नॅनो युरियाची फवारणी केल्यानंतर १२ तासांच्या आत पाऊस पडल्यास फवारणी पुन्हा करावी.
– जैव उत्प्रेरक, १००% विरघळणारी खते आणि कृषी रसायने यांच्यासोबत मिसळून फवारणी करणे शक्य आहे. मात्र त्याची कॉम्पॅटॅबिलिटी तपासून घ्यावी. अथवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
-यामध्ये कोणतेही विषारी घटक नाहीत. मात्र स्वतःच्या सुरक्षिततेसाठी पिकावर फवारणी करताना फेस मास्क आणि मोजे वापरावेत.
-मुलाच्या आणि पाळीव प्राण्यांच्या आवाक्याबाहेर, थंड आणि कोरड्या जागी नॅनो युरिया ठेवावा.
धन्यवाद
🙏🙏🙏