Kabuli Chana Rate : खानदेशात मोठ्या काबुली हरभऱ्यास ११ हजार रुपये
Kabuli Chana Rate : खानदेशात मोठ्या काबुली हरभऱ्यास ११ हजार रुपये
खानदेशात मोठ्या पांढऱ्या काबुली हरभऱ्यास प्रतिक्विंटल ११ हजार रुपयांचा कमाल दर मिळत आहे
Chana Market Update जळगाव ः खानदेशात मोठ्या पांढऱ्या काबुली हरभऱ्यास प्रतिक्विंटल ११ हजार रुपयांचा कमाल दर मिळत आहे. त्याची आवक जळगावमधील अमळनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर व नंदुरबारमधील शहादा बाजार समितीतही अत्यल्प आहे.
मोठ्या पांढऱ्या काबुली हरभऱ्यास खानदेशात मेक्सिकन किंवा डॉलर हरभरादेखील म्हटले जाते. त्याचे दर यंदा सुरुवातीपासून बरे आहेत. सुरुवातीला साडेआठ हजार ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल असे दर होते.
मार्चअखेरीस त्याची आवक बाजारात सुरू झाली. आता दरात सुधारणा झाली आहे. चोपडा, अमळनेर, शिरपूर व शहादा या बाजार समित्या मोठ्या पांढऱ्या काबुली हरभऱ्यासाठी प्रसिद्ध आहेत. कारण याच भागात त्याची लागवडदेखील केली जाते.
मोठ्या पांढऱ्या काबुली हरभऱ्याची अमळनेर येथील बाजारात या आठवड्यात प्रतिदिन सरासरी ७०० क्विंटल आवक झाली आहे. त्यास किमान १०५०० व कमाल ११ हजार ५०० रुपये आणि सरासरी ११ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मागील महिन्यात खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांत सरासरी १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
प्रतिएकर सात ते नऊ क्विंटल उत्पादन
जळगाव जिल्ह्यात तापी, अनेर नदीकाठी धुळ्यातही अनेर व सातपुडा लगतच्या गावांत त्याची लागवड केली जाते. तर शहादा तालुक्यात गोमाई, सुसरी नदीच्या क्षेत्रात या हरभऱ्याची लागवड जानेवारीत केली जाते.
अनेक शेतकरी काढणी ९० ते ९५ टक्के पूर्ण झालेल्या केळीच्या बागांमध्ये लागवड करतात. टोकन पद्धतीने त्याची लागवड करून ठिबकद्वारे सिंचन केले जाते. यंदा प्रतिएकर सात ते नऊ क्विंटल एवढे उत्पादन हाती आले आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏