Sugar Production : साखरनिर्मिती १०४ लाख टनापर्यंतच रखडली
Sugar Production : साखरनिर्मिती १०४ लाख टनापर्यंतच रखडली
राज्यातील यंदाचा साखर हंगाम जवळजवळ संपल्यात जमा आहे. १४ एप्रिल अखेर राज्यात केवळ तीन साखर कारखाने सुरू आहेत.
Kolhapur News राज्यातील यंदाचा साखर हंगाम (Sugar Season) जवळजवळ संपल्यात जमा आहे. १४ एप्रिल अखेर राज्यात केवळ तीन साखर कारखाने सुरू आहेत. जादा साखर उत्पादनाचे अंदाज पूर्णतः: कोलमडले आहेत.
केवळ १०४ लाख टन साखरेची निर्मिती (Sugar Production) झाली आहे. सद्यःस्थिती पाहता १०५ लाख टनांवर साखर निर्मिती होणार नाही, हे निश्चित झाले आहे. या पंधरा दिवसांत तर साखर निर्मिती अतिशय हळू झाली आहे.
पंधरा एप्रिलनंतर एखादा- दुसरा कारखाना सुरू राहील, अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी या कालावधीत केवळ ४० साखर कारखाने बंद झाले होते. यंदा बंद झालेल्या कारखान्यांची संख्या २०४ वर पोहोचली आहे.
गेल्या वर्षी दैनंदिन गाळप क्षमता ८ लाख २८ हजार ६५० टन प्रतिदिन इतकी होती. यंदा यात वाढ होत गाळप क्षमता ८ लाख ८४ हजार ९५० टन प्रति दिन इतकी झाली. याचाही परिणाम जलद गाळपावर झाला. अनेक कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक गतीने गाळप झाले.
उसाच्या उत्पादनात झालेली घट ही हंगाम लवकर संपविण्यास कारणीभूत ठरली आहे. यंदा सरासरी दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या उसाच्या उत्पादनात घट आली आहे.
याचा साहजिकच परिणाम कारखान्यांच्या गाळप क्षमतेवरही झाला. शेवटच्या पंधरा दिवसांत केवळ एक लाख टन साखरेची निर्मिती झाली.
धन्यवाद
🙏🙏🙏