पुढील दोन महिन्यांसाठी हवामानाचा अंदाज काय? -हवामान विभाग

0

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा हवामानाचा अंदाज सोमवारी जाहीर केला.

यंदाच्या उन्हाळ्यात कोकण किनारपट्टीचा अपवादवगळता राज्यभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहून उष्णतेच्या झळा वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतेक भागांत उष्णतेच्या लाटा येऊ शकतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा हवामानाचा अंदाज सोमवारी जाहीर केला. त्यानुसार एल-निनोचे वर्ष असल्यामुळे मार्च महिना सरासरीपेक्षा उष्ण ठरला. देशाचे कमाल तापमान सरासरी ३४ ते ३८ अंश सेल्सिअस राहिले. एप्रिल आणि मे महिन्यांतही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टीवगळता राज्याच्या अन्य भागाला तापमानवाढ आणि उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सिअसने वाढू शकते. उष्णतेच्या लाटेचा काळ दोन दिवसांपासून आठ दिवसांपर्यंत असू शकतो. देशाच्या मध्य भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता अधिक असून, राज्यात प्रामुख्याने विदर्भाला उष्णतेच्या लाटांचा सर्वाधिक सामना करावा लागू शकतो. या काळात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असल्यामुळे विशेष काळजी घेण्याचे दिशानिर्देश निवडणूक आयोग, केंद्रीय जलसंपदा आणि आरोग्य मंत्रालयाला दिले आहेत. उष्णतेच्या लाटांचा इशारा दिलेल्या ठिकाणी संबंधित राज्य सरकारने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असेही महापात्रा म्हणाले.

ला-निना मोसमी पावसासाठी पोषक

प्रशांत महासागरात एल-निनोची स्थिती कायम आहे. एप्रिल-मे महिन्यात एल-निनोची तीव्रता हळूहळू कमी होऊन जून महिन्याच्या सुरुवातीस एल-निनो तटस्थ अवस्थेत जाईल. जूनच्या मध्यात ला-निनाची स्थिती तयार होण्याचा अंदाज आहे. ला-निना मोसमी पावसासाठी पोषक आहे. आता तटस्थ असलेली हिंद महासागरीय द्विध्रुविता (आयओडी) जून महिन्यात सक्रिय होण्याचा अंदाज आहे. सक्रिय ला-निना आणि आयओडी, मोसमी पावसाला पोषक ठरणारे घटक यामुळे जूनच्या सुरुवातीस मोसमी पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होईल, असेही महापात्रा म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »