Fruit Orchard Water Management : सध्याच्या वातावरणात फळबागांचे पाणी व्यवस्थापन कसे करावे?

0

Fruit Orchard Water Management : सध्याच्या वातावरणात फळबागांचे पाणी व्यवस्थापन कसे करावे?

कडक सूर्यप्रकाश, गरम वारे, कोरडी हवा याचा विपरीत परिणाम नवीन लावलेल्या फळझाडांवर तसेच फळे देणाऱ्या झाडांवर होत असतो.आच्छादनामुळे उन्हाळ्यात दोन पाण्याच्या पाळ्यातील कालावधी वाढविता येतो.
मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे. सकाळी व सायंकाळी थोडासा गारवा, तर दिवसाचे सर्वसाधारण तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले आहे. दिवसागणिक तापमानात वाढ होताना दिसत आहे.
कडक सूर्यप्रकाश, गरम वारे, कोरडी हवा याचा विपरीत परिणाम नवीन लावलेल्या फळझाडांवर तसेच फळे देणाऱ्या झाडांवर होत असतो.
यामुळे कोवळी फूट करपणे, खोड तडकणे, फळगळ होणे, फळांचा आकार लहान होणे, सर्व पाने, फळे गळून झाडे वाळून जाणे, झाडांची वाढ थांबणे आणि शेवटी झाड मरणे असे प्रकार होतात. याकरिता पाणी आणि उपलब्ध साधनांचा कार्यक्षम वापर करावा.
पाण्याचा कार्यक्षम वापर
१) ठिबक सिंचन किंवा भूमिगत सिंचन पद्धतीने थेट फळझाडांच्या मुळापाशी गरजेनुसार पाणी द्यावे. या पद्धती पाण्याची कमतरता असलेल्या क्षेत्राकरिता अत्यंत फायदेशीर आहेत. या पद्धतीत इतर प्रचलित पद्धतीपेक्षा ५० ते ६० टक्के पाण्याची बचत होते.
उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ मिळू शकते. या पद्धतीमुळे झाडांच्या गरजेनुसार पाणी मोजून देता येते व पाण्याचा अपव्यय होत नाही. पाण्याबरोबर खते देता येतात,त्यामुळे खताच्या खर्चात बचत होते.
२) फळबागेस/पिकास पाणी सकाळी अथवा रात्री दिल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होतो.पाण्याची कमतरता असलेल्या क्षेत्रात एक आड एक सरीने पाणी द्यावे. पाणी देण्याच्या पाळीत (अंतरात) वाढ करावी.
उदाहणार्थ एखाद्या बागेस १० दिवसांच्या अंतराने पाणी देत असाल तर पुढील पाणी १२ दिवसांनी, त्यापुढील पाणी १५ दिवसांनी अशा प्रकारे जमिनीचा मगदूर, तापमान आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घ्यावी.
३) कमी क्षेत्रातील व जास्त अंतरावरील फळझाडांना मडका सिंचन पद्धती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. या पद्धतीत लहान झाडांना साधारणपणे दोन ते तीन वर्षाकरिता ५ ते ७ लिटर पाणी बसणारी लहान मडकी वापरावीत.
जास्त वयाच्या मोठ्या झाडांकरिता १० ते १५ लिटर पाणी मावेल, अशी मडकी वापरावीत. मडकी शक्यतो जादा छिद्रांकित किंवा आढीत कमी भाजलेली असावीत. पक्क्या भाजलेल्या मडक्याच्या बुडाकडील बाजूस लहानसे छिद्र पाडावे.
त्यामध्ये कापडाची चिंधी किंवा नारळाची शेंडी बसवावी. प्रत्येक झाडास दोन मडकी जमिनीत खड्डा खोडून बसवावीत. त्यामध्ये संध्याकाळी पाणी भरून ठेवावे. मडके पाण्याने भरल्यानंतर त्यावर झाकणी किंवा लाकडी फळी ठेवावी.त्यामुळे मडक्यातील पाणी बाष्पीभवनाने वाया जाणार नाही. या पद्धतीमुळे ७० ते ७५ टक्के पाण्याची बचत होते.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »