Weather Upadate : विदर्भात आज वादळी पावसाचा इशारा
Weather Upadate : विदर्भात आज वादळी पावसाचा इशारा
उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार
पुणे : राज्यात उन्हाच्या झळा वाढल्याने कमाल तापमान (Maximum Temprature) ३९ अंशांच्या पुढे गेले आहे. आज (ता. ३०) विदर्भात तुरळक ठिकाणी विजा मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे. दुपारच्या वेळी उकाड्यातही वाढ झाली आहे. बुधवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
वर्धा येथे ३९ अंश, सोलापूर, अमरावती, चंद्रपूर येथे कमाल तापमान ३८ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३३ ते ३७ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानातही चांगलीच वाढ झाली असून, बहुतांश ठिकाणी पारा १५ ते २४ अंशांच्या दरम्यान आहे.
उत्तर मध्य प्रदेशपासून विदर्भ, तेलंगणा, रायलसीमा ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. तसेच वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाले आहेत. पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागापासून उत्तर ओडिशापर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
तसेच नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ३०) विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा असून, तर राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏