Potato Prices : बटाट्याचे दरही कोसळले; बाजारभावातून उत्पादन खर्चही निघेना

0

Potato Prices : बटाट्याचे दरही कोसळले; बाजारभावातून उत्पादन खर्चही निघेना

उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये यंदा बटाटा उत्पादन वाढल्याने बाजारातील आवक वाढली आहे. त्यामुळे दरावर दबाव आला.
Potato News : कांदा दर (onion Rate) कोसळ्याने शेतकरी अडचणीत असतानाच आता बटाटा उत्पादकांवरही संक्रांत आली. देशात यंदा बंपर बटाटा उत्पादन (Potato Production) झाल्याने बाजारभाव निम्म्याने कोसळले. सध्याच्या दरातून फक्त उत्पादन खर्च वसूल होत आहे.
पुढील काळात मात्र दरात आणखी घसरण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे कांद्याप्रमाणे बटाटा उत्पादकांनाही फटाक बसणार हे स्पष्ट झाले.
कांदा आणि भाजीपाल्याचे दर (Vegetable Rate) वाढल्याने शेतकरी पुरते हैरान झाले. उत्पादनात वाढ होऊन बाजारातील आवक वाढली. त्यामुळे दर उत्पादनखर्चापेक्षाही कमी झाले. कांद्याचे भाव तर प्रतिकिलो २ रुपयांपर्यंत घसरले.
यातून उत्पादनखर्च तर सोडा साधा वाहतूक खर्चही निघत नाही. भाजीपाल्यालाही मागणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला पीक तसचं सोडून द्यावं लागत आहे. आता बटाटा दराचाही प्रश्न निर्माण झाला.
देशात बटाटा उत्पादनात उत्तर प्रदेश पहिल्या तर पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही राज्यांमध्ये यंदा बंपर उत्पादन झाले. यामुळे बटाट्याचे दर घसरले आहेत. दरात आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उत्तर प्रदेशात हंगामाच्या सुरुवातीला हायब्रीड व्हरायटीचे दर २५० ते ३०० रुपयांपासून सुरु झाले होते.  
सरकारच्या अंदाजाप्रमाणे यंदा उत्तर प्रदेशातील बटाटा उत्पादन २४० लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे, असे उत्तर प्रदेश कोल्ड स्टोरेज असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद अगरवाल यांनी सांगितले.
अॅग्री बीझनेलाईनला अगरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील सर्वच केंद्रांवर यंदा उत्पादन वाढल्याचे स्पष्ट झाले. तर पंजाब आणि मध्य प्रदेशातील उत्पादन काहिसे घटले. पण या दोन्ही राज्यांमध्ये थेट वापराच्या बटाट्याचे उत्पादन होत नाही.
उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील बटाटा काढणी आता मध्यात आली आहे. त्यामुळे यंदा बंपर उत्पादन झाले असे म्हणता येईल. पश्चिम बंगालमध्ये यंदा १३० ते १४० लाख टन बटाटा उत्पादनाचा अंदाज आहे.
म्हणजेच उत्पादनात तब्बल २९ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. मागील हंगामात पश्चिम बंगालमध्ये ८५ लाख टन बटाटा उत्पादन झाले होते.
उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये यंदा बटाटा उत्पादन वाढल्याने बाजारातील आवक वाढली आहे. त्यामुळे दरावर दबाव आला. सध्या बटाट्याचे सरासरी दर ७५० ते ८०० रुपयांच्या दरम्यान पोचले.
मागील हंगामात याच काळात १४०० ते १६०० रुपये भाव होता. तर बटाट्याचा उत्पादन खर्च ७५० ते ८०० रुपयांच्या दरम्यान येतो. म्हणजेच सध्या शेतकऱ्यांना केवळ उत्पादन खर्चाऐवढाच भाव मिळत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »