चवळी लागवड

0

चवळी लागवड


सुधारित जाती

खरीप पिकाची काढणी झाल्यानंतर ताबडतोब जमिनीची मशागत करून चवळी लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळते. लागवडीसाठी कोकण सदाबहार, कोकण सफेद, सी-152 या जातींची निवड करावी.
मध्यम आणि भारी जमिनीत चवळीचे चांगले उत्पादन येते. या पिकासाठी जमिनीचा सामू उदासीन असावा. पूर्व पिकाची काढणी केल्यानंतर जमीन नांगरून घ्यावी. कुळवाच्या साह्याने 1 ते 2 पाळ्या देऊन जमीन लागवडीयोग्य करावी. शेवटच्या कुळवणीवेळी हेक्‍टरी पाच टन शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. शेवटी लागवडीसाठी योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करावेत.
1) पेरणी 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावी. डिसेंबरनंतर पेरणी केल्यास उत्पादनात कमालीची घट येते. प्रतिहेक्‍टरी 25 ते 30 किलो बियाणे लागते.
२) प्रथम प्रतिकिलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. बियाणे सावलीत वाळवून त्यानंतर प्रति10 किलो बियाणास रायझोबियम जीवाणू संवर्धकाची 250 ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी. बियाणे सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावे.
3) पेरणी टोकण पद्धतीने किंवा पाभरीने करावी. पेरणीसाठी पसरट जातीकरिता 45 सेंमी आणि उभट जातीकरिता 30 सेंमी अंतर ठेवावे. दोन रोपांमधील अंतर 10 ते 15 सेंमी ठेवावे.
4) पाभरीने पेरणी केल्यास पेरणीनंतर 15 दिवसांनी विरळणी करून दोन रोपांमधील अंतर 10 ते 15 सेंमी ठेवावे.
5) प्रतिहेक्‍टरी 5 टन शेणखत किंवा कंपोस्ट खताशिवाय हेक्‍टरी 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद द्यावे. खताची संपूर्ण मात्रा पेरणीवेळी द्यावी. खते ओळीमध्ये बियांखाली 5 ते 7 सेंमी खोलीवर दिल्यास पिकाची वाढ चांगली होते. खते आणि बियाणे एकाच वेळी पेरणीची सोय असलेल्या दोन चाडीच्या पाभरीच्या साह्याने दिल्यास खताचा अपव्यय टळतो.
6) उर्वरित ओलाव्यावर चवळीची लागवड ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये केली जाते. जमिनीमध्ये पाण्याचा साठा उपलब्ध असेपर्यंत पिकाची वाढ चांगली होते. परंतु, पुढे फुले येण्याचा काळ तसेच दाणे भरण्याचा आणि पक्व होण्याच्या कालावधीत पाण्याची कमतरता भासल्यास उत्पादनामध्ये कमालीची घट येते. अशा वेळेस पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेमध्ये 2-3 संरक्षित पाणी दिल्यास पिकाची वाढ चांगली होऊन उत्पन्न चांगले मिळते.
7) चवळीसाठी पेरणीनंतर 15 ते 30 दिवस हा तण नियंत्रणासाठी अतिमहत्त्वाचा कालावधी आहे. या कालावधीत तणांचे नियंत्रण न केल्यास उत्पन्नामध्ये 15 ते 30 टक्के घट येते. त्यासाठी पेरणीनंतर 15 दिवसांनी कोळपणी करून 30 दिवसांनी निंदणी करावी किंवा पेरणीनंतर 15 आणि 30 दिवसांनी निंदणी करून पीक तणमुक्त ठेवावे.
सुधारित जाती
अ.क्र. —- जातीचे नाव —- कालावधी दिवस —- उत्पादन (क्विं./हे.)
1 —- कोकण सदाबहार —- 60 ते 70 —- 10 ते 12
2 —- कोकण सफेद —- 90 ते 95 —- 10 ते 12
3 —- सी-152 —- 90 ते 100 —- 12 ते 15
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »