जी-20 देशांनी घेतलेल्या निर्णयांना जागतिक पातळीवर महत्व- केंद्रीय अर्थ मंत्रालय सल्लागार वीरेंद्र सिंह यांचे प्रतिपादन
जी २० ही केवळ २० देशांची संघटना नाही तर जागतिक पातळीवरील १३ महत्वाच्या संघटना देखील त्याच्या सदस्य असल्यामुळे या परिषदेने घेतलेल्या कोणत्याही निर्णयांना जागतिक पातळीवर अतिशय महत्व प्राप्त होत असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे सल्लागार विरेंद्र सिंह यांनी आज पुण्यात बोलताना सांगितले.
जी २० बैठकीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे सहसचिव सालोमन अरोकियाराज, सुरत महापालिकेच्या आयुक्त शालिनी अगरवाल, एशियन डेव्हलपेंट बँकेचे शहरी तज्ञ संजय ग्रोव्हर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात दूर संवाद पद्धतीने विविध महाविद्यालयातील सुमारे १ लाख विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले होते.
उपस्थित विद्यार्थ्यांना जी २० परिषदेविषयी सर्वंकष माहिती देताना विरेंद्र सिंह यांनी परिषदेची रचना, कामाची पद्धत आणि जागतिक पातळीवर त्यांच्या निर्णयांना असणारे महत्व याविषयी मार्गदर्शन केले.
या गटात काही विकसित देशांबरोबर विकसनशील देश सहभागी असल्याने जगाच्या विविध भागातील प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होते आणि सर्वमान्य तोडगा निघतो असे विरेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षापासून या संघटनेचे अध्यक्ष पद विकसनशील देशाकडे असल्याने आणि यंदा भारत तर पुढील वर्षी ब्राझील कडे हे अध्यक्षपद राहणार असल्याने प्रामुख्याने विकसनशील राष्ट्रांना फार मोठा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले .कोविड काळात या संघटनेने फार महत्वाची भूमिका बजावल्याचे विरेंद्र सिंह म्हणाले.
अर्थ मंत्रालयाचे सह सचिव सालोमन अरोकियारज यांनी स्वागत केले. शालिनी अगरवाल यांनीही आपले काही अनुभव सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मान्यवरांनी समर्पक उत्तरे दिली.