कपाशीतील मित्रकीटकांचे संवर्धन

0
कपाशीतील मित्रकीटकांचे संवर्धन

भारतीय कापूस पिकामध्ये आढळून येणाऱ्या १६२ कीटकांपैकी केवळ १५ कीटक पिकासाठी हानिकारक आहेत. पिकामध्ये अनेक मित्रकीटक कार्यरत असून, ते पिकाच्या संरक्षणामध्ये मोलाची भूमिका बजावतात. त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
 
जागतिक पातळीवर कापूस परिसंस्थेमध्ये १३२६ पेक्षा जास्त कीटक आढळतात. भारतातील कापूस परिसंस्थेमध्ये एकूण १६२ प्रकारचे कीटक सापडतात, त्यापैकी फक्त १५ कीटक कापूस पिकाला हानी पोचवतात.
कापसाला रोपावस्थेपासून ते वेचणीपर्यंत नुकसान करणाऱ्या प्रमुख किडी
– बोंडअळी – अमेरिकन बोंडअळी, ठिपक्याची बोंडअळी आणि गुलाबी बोंडअळी,
– रसशोषक किडी – तुडतुडे, मावा, फुलकिडे, पांढरी माशी 
कापूस परिसंस्थेमध्ये पिकासाठी फायदेशीर ठरणारे विविध प्रकारचे मित्रकीटक आढळून येतात. ते पिकांवरील हानिकारक किडींची संख्या कमी करण्यास नैसर्गिकरीत्या मदत करतात. यामध्ये परभक्षक कीटक व परोपजीवी कीटकांचा प्रामुख्याने समावेश होतो.
भारतामध्ये कापूस पर्यावरणात मित्रकीटकांची जैवविविधता –
कोळ्याच्या १०६ जाती, कॉक्सिनेलीडसच्या ४५० जाती, क्रायसोपीडच्या ६० जाती, ट्रायकोग्रामाच्या २६ जाती आणि अॅन्थोकोरिड ढेकूण. 
कपाशीतील प्रमुख परभक्षक –
सहा वळणदार ठिपक्याचा ढालकिडा, हरीत पंखी क्रायसोपा, सिरफीड माशी, कोळी परभक्षक, स्टिंक ढेकूण, डिप्टेरन माशी, परभक्षक माकडमाशी, मोठ्या डोळ्याचा ढेकूण. 
कपाशीमध्ये आढळणारे परोपजीवी मित्रकीटक –
ॲनासियस बंबावालेई, मेटाफायकस, ॲनागायरस कमाली, ॲनागायरस डॅक्टोलोपी, ॲनागायरस मिरझाई, टॅक्नीड माशी, रोगस, कॉम्पोलेटिस, ॲपन्टेंलीस, ॲसेरोफॅगस पपई, ब्रॅकॉन, मावा परोपजीवी गांधीलमाशी, ट्रायकोग्रामा चिलोनिस.
उदा. ॲनासियस बंबावलेई हा परोपजीवी कीटक प्रामुख्याने कपाशीवरील पिढ्या ढेकणाला नियंत्रण करण्यामध्ये मदत करते. या कीटकामुळे भारतात कपाशीवरील पिठ्या ढेकणाचे सरासरी ३० टक्के नियंत्रण होते. पपईवरील पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी २०१० मध्ये भारतात पुर्तो रिको वरून ॲसेरोफॅगस पपई, ॲनागायरस लॉकी आणि सुडोप्टोमॅस्ट्रीक्स मेक्सिकोना या तीन परोपजीवी कीटकांची आयात केली गेली. यांचा वापर प्रामुख्याने तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि त्रिपुरामधील पिठ्या ढेकूणग्रस्त पपई शेतामध्ये करण्यात आला. ॲसेरोफॅगस पपई आणि सुडोलेप्टोमॅस्ट्रिक्स मेक्सिकेनाचे अस्तित्व बऱ्याच ठिकाणी आढळून येते. 
मित्रकीटकांच्या संवर्धनासाठी काय करावे?
– मित्रकीटकांच्या संवर्धनासाठी शक्यतोवर पेरणीनंतर दोन महिन्यांपर्यंत कीटकनाशकांचा वापर टाळावा. या काळात मित्रकीटक कापसाच्या शेतामध्ये बहुसंख्येने स्थिर होतील. परभक्षक कीटक ढालकिडा, हरित पंखी क्रायसोपा, कोळी आणि परोपजीवी कीटक ॲनासियस, ॲनागायरस, मावा परजीवी गांधीलमाशी कापसामधील तुडतुडे, मावा, फुलकिडे, पांढरी माशी यासारख्या रसशोषक किडींची संख्या मर्यादित राखण्यास मदत करतात.
– नीम तेल, एरंडी तेल, मासोळी तेल युक्त वनस्पतीजन्य आणि जैविक कीटकनाशकांचा (लिकॅनीयम लिकॅनी) वापर करावा.
– कमी विषारी असणाऱ्या कीटक वाढनियंत्रके, कीटकनाशके (उदा. बुप्रोफेजीन, स्पायरोफेसिफेन, पायरीप्रोक्सीफेन, डॉयफेन्थीयुरॉन) यांचा पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी वापर करावा.
– कमी नुकसानकारक दुय्यम पतंग किडी (उदा. पाने गुंडाळणारी अळी, उंट अळी) यासाठी रासायनिक फवारणी शक्यतो टाळावी. या अळ्या कापसाच्या झाडाला फारच कमी इजा पोचवतात, त्यामुळे परोपजीवी कीटकांना (उदा. ट्रायकोग्रामा, ॲपेन्टॅलीस आणि सिसिरिपा) इजा पोचणार नाही. हे कीटक अमेरिकन बोंड अळीच्या नैसर्गिक नियंत्रणाचे काम करतात.
– जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने पर्यावरणासाठी अति विषारी (वर्ग १) कीटकनाशके (उदा. मिथाईल पॅराथियॉन, मोनोक्रोटोफॉस, डायक्लोरव्हास, मिथोमील, फोरेट, ट्रायझोफॉस, मेटासिस्टॉक्स) यांचा वापर टाळावा. ही कीटकनाशके पर्यावरणाच्या व मित्रकीटकांच्या दृष्टीने हानिकारक ठरतात.
– कीटकनाशकांच्या मिश्रणाचा वापर टाळावा. मिश्रणाचा वापर पर्यावरणास अनुकूल नाही. 
Source:
केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »