कृषि सल्ला – बीबीएफ – पीक सोयाबीन रुंद वरंबा सरी

0
खरीप हंगाम पूर्व तयारी – पीक सोयाबीन रुंद वरंबा सरी (BBF पेरणी यंत्र) पद्धतीने लागवड (Broad bed furrow)
मागील दशकापासून होत असलेल्या हवामान बदलामुळे एकूण पाऊसमान, वितरण, तीव्रता व एकूण पावसाचे दिवस यामध्ये खूप मोठे बदल दिसून येत आहेत. पिकाच्या वाढीच्या व पक्वतेच्या काळात सरासरीपेक्षा कमी जास्त पाऊस होणे, दोन पावसांमध्ये दीर्घ खंड पडणे, जमिनीतील ओलावा कमी होणे इ. कारणांमुळे पिकांच्या उत्पादनामध्ये घट येत असल्याने आढळून आले आहे.
आपल्या मराठवाड्यातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी जिरायती शेती असून, जमीन मध्यम ते भारी प्रकारामध्ये मोडते. 
खरीप हंगामामध्ये घेतल्या जाणार्‍या मुख्य पिकांपैकी सोयाबीन हे एक महत्वाचे शेंगवर्गीय व गळीत पीक आहे. मध्यम ते भारी प्रकारची जमीन व वार्षिक पर्जन्यमान 750 ते 1000 मि.मी. सारख्या प्रमाणात विखुरलेले असल्यास हे पीक चांगले येते. 
परंतु अलीकडील काळात पावसाचे कमी प्रमाण व असमान वितरणामुळे या पिकाच्या वाढीच्या अवस्थांमध्ये पाण्याच्या आवश्यकतेवेळी जमिनीतील ओलावा कमी होऊन पाण्याच्या कमतरतेमुळे उत्पादन कमी मिळून किंवा संपूर्ण पीक वाया जाऊन हाती काहीच मोबदला न मिळाल्याची उदाहरणे पाहायला मिळत आहेत.
खरीप हंगाम (जून महिना) सुरू झाल्यावर नैर्ऋत्य मान्सून वार्‍यांपासून पावसाला चांगली सुरुवात होते व साधारणत: 100 ते 150 मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाल्यावर या पिकाची पेरणी केली जाते. परंतु बर्‍याच वेळा वाढीच्या अवस्थेत असताना महिना-महिना पाऊस लांबतो व दोन पावसांमध्ये दीर्घ खंड पडतो. अशा वेळी पिकाला पाण्याच्या ताणापासून वाचविण्यापासून व सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या जमिनीत मुरलेल्यापाण्याचा(ओलाव्याचा) उपयोग करण्याचा उद्देश डोळ्यांसमार ठेवून हैदराबादस्थित केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेने (क्रीडा) विकसित केलेल्या रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीचा सोयाबीन लागवडीसाठी उपयोग करावा.

बीबीएफ’ पद्धतीची वैशिष्ट्ये :
  • सोयाबीन पिकाच्या वाढीच्या अवस्थेत पावसामध्ये खंड पडल्यास निर्माण होणारी जमिनीतील पाण्याची कमतरता दूर करण्यास बीबीएफ पद्धत उपयुक्त ठरते.
  • ‘बीबीएफ’ पद्धत पडणार्‍या पावसाचे पाणी जमिनीत जास्तीत जास्त मुरवून मातीत ओलावा जास्त काळ टिकवून ठेवते, पडणार्‍या पावसाच्या पाण्यास उताराच्या दिशेने वाहून जाण्यास अटकाव करते व जमिनीची धूप कमी करून जमिनीतील ओलावा पिकाच्या वाढीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरते.
  • ‘बीबीएफ’ पद्धतीमुळे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास आवश्यकतेपेक्षा जास्त झालेले पाणी सर्‍यांमधून वाहून नेले जाते व पीक पाण्यात डुंबून संपूर्ण नुकसान होण्यापासून बचाच होतो. याउलट, हे शेतातले पाणी शेतामध्येच मुरविल्यामुळे पावसाच्या दीर्घ खंडाच्या वेळी या जास्त झालेल्या पाण्याचा (ओलाव्याच्या स्वरूपात) पिकासाठी उपयोग होतो. या दोन्ही परिस्थितींवर ‘बीबीएफ’ने मात करता येऊन सोयाबीनचे जास्तीत जास्त उत्पादन घेता येऊ शकते.
  • रुंद वरंब्यावर सोयाबीनची लागवड केल्याने पाणी साचल्यामुळे होणार्‍या खोड व मूळ कुजव्या रेागांचा प्रादुर्भाव टाळला जातो.
  • सोयाबीनची रुंद वरंब्यावर लागवड केली जाते, त्यामुळे सर्‍यांचा उपयोग करून आंतरमशागतीची कामे सुखकररीत्या करणे सोपे होते.
  • पिकाला पाणी देणे, ठिबक संचाचा पाण्यासाठी वापर करणे, तण नियंत्रण, कीटकनाशक फवारणी इ. कामे योग्य रीतीने करणे शक्य होते.
  • पिकामध्ये हवा खेळती राहते व सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतो त्यामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव होत नाही.

‘बीबीएफ’चा सोयाबीन लागवडीसाठी अवलंब करण्यासाठी लक्षात घ्यावयाच्या बाबी :
  • उन्हाळी हंगामातील पिकाची काढणी किंवा कापणी होताच प्रत्येक वर्षी शक्य नसेल तर दोन वर्षांतून एकदा शेताची खोल नांगरणी करून घ्यावी, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये जमीन चांगली तापली जाईल.
  • मे महिन्यात तिसर्‍या आठवड्यात नांगरलेल्या शेताला कुळवाची एक पाळी द्यावी व तसेच प्रती एकरी 5 टन शेणखत शेतामध्ये सारख्या प्रमाणात विस्कटून द्यावे व कुळवाच्या दुसर्‍या पाळीने शेणखत शेतामध्ये मिसळून घ्यावे व शेताचे सारख्या प्रमाणात लेव्हलिंग (सपाटीकरण) करावे.
  • साधारणत: 100-200 मि.मी. इतका पाऊस झाल्यानंतर जमीन वाफशावर असताना *‘सोयाबीन-बीबीएफ’ सरी यंत्राने 150 सें.मी. रुंद वरंबे व 45 सें.मी. रुंद सर्‍या पाडून, रुंद वरंब्यावर चार ओळी (दोन ओळींतील अंतर 45  किंवा 60 सें.मी.)* अशा प्रकारे सुधारित व जास्त उत्पादन देणार्‍या सोयाबीनच्या वाणांची पेरणी करावी. पेरणीच्या वेळी प्रती एकरी 4 पोते दाणेदार 200 किलो किंवा 20.20.00.13 50 किलो किंवा 18.46.00 DAP 50  किलो सोबत  10 किलो गंधक द्यावे. तसेच सूक्ष्म मूलद्रव्य कमतरता भरून काढण्यासाठी 10 किलो झिंक सल्फेट आणि 5 किलो फेरस सल्फेट द्यावे.
  • दोन ओळींतील अंतर (45 किंवा 60 सें.मी.) व दोन झाडांतील अंतर (7.5 किंवा 10 सें.मी.) 
  • पेरणीनंतर, बी उगवण्यापूर्वी पेरणी पूर्व तणनाशक 48 तासांच्या आत फवारावे.
सोयाबीन लागवडीसाठी ‘बीबीएफ’ यंत्र व त्याची वैशिष्ट्ये :
  • पेरणीची खोली आवश्यकतेनुसार कमी-जास्त करण्याची व्यवस्था या यंत्राला उपलब्ध करून देण्यात आली आहे
  • या यंत्राला पेरणी करताना दोन ओळींमधील अंतर कमी जास्त करण्याची सोय करून देण्यात आली आहे.
  • हे बहुपयोगी यंत्र असून ते खरीप व रबी हंगामातील पिकांची आवश्यकतेनुसार सर्‍या पाडून पेरणी करण्यासाठी सहजासहजी वापरता येते.
  • गाळाच्या किंवा चोपण जमिनीमध्ये पाण्याचे पाट पाडण्यासाठी 30 ते 35 पीटाओ एचपीच्या ट्रॅक्टरद्वारे योग्य रित्याचालविता येते.
  • या यंत्राद्वारे पाडलेल्या सर्‍यांमधून पिकाला आवश्यक तेव्हा पाणी देता येते.
  • आवश्यकतेनुसार फणांची संख्या वाढविता येते अथवा कमी करता येते.
  • या यंत्राद्वारे पेरलेले बियाणे लगेचच मातीमध्ये झाकले जाईल अशी त्याची रचना करण्यात आली आहे.


Source-

कृषि विभाग

अर्धापुर

सुनिल सूर्यवंशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »