ऑक्टोबर छाटणी नंतर दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी द्राक्षबागेचे व्यवस्थापन

0
ऑक्टोबर छाटणी नंतर दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी द्राक्षबागेचे व्यवस्थापन 
द्राक्षाचा वेल मूळचा रशियातील समशीतोष्‍ण भागांतील आहे. भारतात द्राक्षाचा प्रसार इराण आणि अफगाणिस्थानातून झाला. वायव्य हिमालयावर द्राक्षांच्या जंगली वेली आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात द्राक्ष लागवडीखालील सर्वात जास्त क्षेत्र आहे.
द्राक्ष हे महात्त्वाचे निर्यातक्षम; परंतु अल्पकाल टिकणारे फळ आहे. त्याचा उपयोग मुख्यत: तीन प्रकारे केला जातो. पहिल्या प्रकारात द्राक्षे ताजी खाण्यासाठी (टेबल द्राक्षे) वापरतात. दुसर्‍या प्रकारात द्राक्षे वाळवून, टिकवून खाण्यासाठी वापरतात. तिसर्‍या प्रकारात मद्य आणि इतर पेये बनविण्यासाठी द्राक्षांचा उपयोग केला जातो. जगातील द्राक्षांच्या एकूण उत्पादनापैकी ८०% उत्पादनाच वापर मद्य आणि विविध प्रकारची पेये बनविण्यासाठी केला जातो. १०% द्राक्षे ताजी खाण्यासाठी १०% मनुका तयार करण्यासाठी वापरतात. महाराष्‍ट्रांत नाशिक येथे द्राक्षांची लागवड फारच मोठया प्रमाणावर होते. पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद या ठिकाणीही द्राक्षांची लागवड आहे.
भारतात द्राक्ष लागवडीसाठी असणा-या एकूण क्षेत्राच्या निम्यापेक्षा जास्त क्षेत्र हे एकटया महाराष्ट्रातच असल्याने द्राक्ष शेतीस महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत विशिष्ट असे स्थान प्राप्त झालेले आहे. यशस्वी द्राक्ष उत्पादन हे एका विशिष्ट व उच्च तंत्रावर अवलंबून आहे. दर्जेदार व निर्यातक्षम द्राक्षाची प्रत ही फार उच्च दर्जाची असावी लागते. अशा द्राक्षाचे उत्पादन करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी बंधूनी त्याच्या शेतावर आवलंबला तर अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांच्या द्राक्षाची मागणी वाढून निर्यात वाढेल.
द्राक्ष वेलीच्या जीवनक्रमात एप्रिल छाटणी व ऑक्टोबर छाटणीला अत्यंत महत्त्व आहे. ऑक्‍टोबर छाटणी हे कौशल्याचे काम आहे. ऑक्‍टोबर छाटणी ही प्रत्यक्षपणे उत्पादनाशी निगडित असते. एकसारख्या निघणाऱ्या फुटी व फुटीबरोबर दिसणाऱ्या घडांच्या संख्येवर पुढील हंगामाचे भवितव्य ठरलेले असते. ऑक्टोबर छाटणी नंतरचे द्राक्ष बागेचे व्यवस्थापन करताना खालील बाबींचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते.
श्री. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर
अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन :
द्राक्ष वेलीच्या ऑक्टोबर छाटणीनंतर आलेला फुटवा व बहार सदृढ होण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन एक महत्त्वपूर्ण बाब आहे. द्राक्ष वेलीचे माती, पाणी व देठ निरिक्षण मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून करून घेतल्यास उपलब्ध आणि कमतरता असलेले अन्नद्रव्यांची पूर्व कल्पना येते व त्यानुसार अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करता येते. माती परिक्षण करून त्याप्रमाणे खत व्यवस्थापन करावे. निकृष्ट, कमी कसदार जमिनीत खतांचा वापर अधिक प्रमाणात करावा लागतो.
जमिनीतील पाणी प्रमाण, भुसभुसितपणा, खनिजद्रव्यांची उपलब्धता, क्षार व सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण व त्यातून होणारी जीवाणूंची वाढ इ. बाबींचा विचार करून द्राक्ष वेलीला खते द्यावीत. तसेच जमिनीचा पोत, हवामान, वेलीचे वाय, लागवडीचे अंतर, इ. बाबींचाही विचार करावा. हिरवळीच्या खतांचा वापर करून जमिनीचा पोत सुधारून सुपीकता वाढविणे शक्य आहे. धैंचा, उडीद, मुग, चवळी, गिरिपुष्प, इ. पिकांचा वापर हिरवळीच्या खतांमध्ये करता येतो. तसेच कत्तलखान्यातील खत, मासळी खत, तेलबियांच्या पेंडी, इ. खतांचाही वापर करता येतो.
द्राक्ष वेलीचे जेवढे ड्राय वजन असते तेवढेच अन्नद्रव्ये वेल जमिनीतून शोषून घेत असते. वेली जमिनीतून सतत खतांची मात्रा ग्रहण करत नाही तर प्रत्येक नव्या वाढीसाठी टप्प्यात आवश्यकतेनुसार नत्र, स्फुरद व पालाश द्राक्ष वेल ग्रहण करते. नवीन फूट येताना, आलेली पाने पसरून हरीतद्रव्ये बनवत असताना व फुलोरा वाढत असताना अश्या तीन अवस्थेमध्ये वेल अन्नद्रव्ये शोषून घेत असते. सर्वसाधारणपणे एका एकरमधून १० टन उत्पन्न मिळविण्यासाठी ४० किलो नत्र व प्रत्येकी २० किलो स्फुरद व पालाश तर १६ टन उत्पादनासाठी ६२ किलो नत्र, १२ किलो फोस्फेट, ५४ किलो पालाश, ३२ किलो कैल्सियम व १८ किलो मैग्नेशियम जमिनीतून शोषून घेतले जाते. यपेक्षा अधिक दिलेल्या खतांमुळे जमिनीचे आरोग्य बिघडते. एका एकरला १०० किलो अमोनियम सल्फेट छाटणी पूर्वी, छाटणी नंतर १८ ते २० दिवसांनी आणि द्राक्षवेली फुलोऱ्यापूर्वी किंवा छाटणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी द्यावा. तसेच, ३०० किलो सुपर फोस्फेट द्राक्ष बागेत चर खोडून द्यावे. छाटणीनंतर ६० दिवसानंतर वेलीचे खोड फुगू लागते, त्यावेळी ४०० किलो स्टेरामिल द्यावे.
४० किलो नत्र, २० किलो स्फुरद व ५० किलो पालाशचा पुरवठा करण्यासाठी १० टन पूर्ण कुजलेले शेणखत बागेला टाकतात. द्राक्षबागेतील दुसऱ्या डीपिंग नंतर घड मऊ झाल्यावर प्रत्येकी १०० किलो डीएपी व एसओपी आणि ५०० किलो करंज व शेंगदाणा पेंड दिल्यास उच्च प्रतीचा आणि निर्यातक्षम गुणवत्तेचा वजनदार द्राक्षमाल तयार होतो.
द्राक्ष मण्यांमध्ये साखर भरताना तसेच फुलोरा अवस्थेत द्राक्ष वेलीला पालाशची आवश्यकता असते. छाटणीनंतर ८० दिवसांनी द्राक्ष बागेतील एखादा घड परिपक्व झाल्यावर ५० किलो एसओपी द्यावे, यावर मालाचा दर्जा, वजन, टिकाऊपणा, गोडवा अवलंबून असतो. ९० दिवसांच्या आसपास मण्यांमध्ये साखर भरली जाते. या काळात पालाश कमी पडले तर ते पानांमधून घेतले जाते, त्यामुळे पाने पिवळी पडून गळतात. त्या खालोखाल फुलोरा अवस्थेत पालाशची आवश्यकता वेलीला असते.
द्राक्ष बागेला सेन्द्रीय खते दिल्यास जमिनीचा पोत सुधारतो. पाण्याचा निचरा होऊन जमिनीची पाणीधारण क्षमता वाढते. जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढून ते अधिक कार्यक्षम होतात. बागेतील जमिनीत हवा व पाणी यांचे समप्रमाण राखून चांगले उत्पन्न घेता येते. 
श्री. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर
संजीवकांचे व्यवस्थापन :
उच्च प्रतीच्या निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात पीक संजीवकांचा फार मोलाचा वाटा आहे. पीक संजीवके हे वेलीच्या अंतर्गत क्रियेत अमुलाग्र बदल घडवून आणणारी महत्त्वाची रसायने आहेत. संजीवकांच्या वापराशिवाय निर्यातक्षम द्राक्षनिर्मिती अशक्य असल्यासारखेच आहे. भरघोस आणि उच्च प्रतीचे उत्पादन मिळविण्यासाठी द्राक्षाच्या खरड छाटणीपासून ते निर्यातीपर्यंत संजीवकांचा योग्य त्या अवस्थेत योग्य त्या प्रमाणत वापर करणे आवश्यक आहे. द्राक्षाच्या दर्जेदार उत्पादनासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी संजीवकांचा वापर करत आहेत परंतु योग्य माहिती अभावी योग्य त्या अवस्थेत, योग्य त्या प्रमाणात वापर न केल्यामुळे व अतिवापरामुळे अन्य वाईट परिमाण दिसून येतात. 
द्राक्षाची गुणवत्ता ही मण्यांच्या आकारातील व रंगातील एकसारखेपणा, मण्यामधील साखर-आम्लता प्रमाण व मण्यांची साठवणक्षमता यावर अवलंबून असते. हे सर्व घटक अपेक्षेप्रमाणे निर्माण होण्यासाठी संजीवकांचा वापर करणे अनिवार्ह आहे.
गुणवत्तेसोबतच इतर कार्यांसाठी (डोळे फुटून येण्यासाठी, घड जिरू नये, इ.), तसेच साठवण करताना मणीगळ नियंत्रित करण्यासाठी सुद्धा संजीवाकांचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे द्राक्षबागेत वेलीच्या छाटणीनंतर हायड्रोजन सायानामाईड, जिब्रेलिक आम्ल, सीपीपीयु (फोरक्लोरोफेन्युरॉन), नेप्थालिक अ‍ॅसिटीक आम्ल, इ.चा वापर विविध अवस्थांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो.
द्राक्षबागेत फळ छाटणीनंतर हायड्रोजन सायानामाईडचा वापर फळ छाटणीनंतर वेलीवरील काड्यांची एकसारखी फूट निघण्यासाठी करतात. एकसारखी फूट निघण्यासाठी एकसारखी जाडीची काडी असणे व काडीच्या जाडीनुसार हायड्रोजन सायानामाईडचे पेस्टिंग करणे या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात.
काडीच्या जाडीनुसार हायड्रोजन सायानामाईडचा वापर :
काडीची जाडी हायड्रोजन सायानामाईडचे प्रमाण
(१ लिटर पाणी) १ लि. हायड्रोजन सायानामाईड किती लिटर पाण्यात वापरावे
६ मि.मी. ४० मि.लि. २५ लिटर
८ मि.मी. ५० मि.लि. २० लिटर
१० मि.मी. ६० मि.लि. १६.७ लिटर
१२ मि.मी. ८० मि.लि. १२.५ लिटर
• हायड्रोजन सायानामाईडचा योग्य वापर होण्यासाठी ते द्रावण काडीच्या डोळ्यांना व्यवस्थित लावणे आवश्यक असते. द्रावणात लाल रंग वापरून रसायनाची लावणी योग्यरीत्या होत असल्याची खात्री करता येते.
• ज्या व्यक्तींना हायड्रोजन सायानामाईडची एलेर्जी आहे त्यांणी पेस्टिंगचे काम करू नये.
• पेस्टिंग करण्यापूर्वी हातांना पेट्रोलियम जेली, एरंडेल तेल किंवा व्हेसलीन व रबरी हातमोजे घालूनच या द्रावनाचा वापर करावा.
• हायड्रोजन सायानामाईडच्या बाटलीसोबत वापरासंबंधी दिलेल्या सुचानांचे तंतोतंत पालन करावे.
घडाचे आकारमान वाढविण्यासाठी संजीवकांचा वापर :
घडाच्या आकारमानाच्या द्राक्ष उत्पादनात मोलाचा वाट आहे. निर्यातक्षम घडाचे आकारमान हे सामान्यपणे ३०० ते ७५० ग्राम इतके असते. हे साधण्यासाठी जीबेर्लिक आम्लाचा फुलोरा येण्यापूर्वी वापर महत्त्वाचा असतो.
द्राक्षमणी आकारमान वाढविण्यासाठी संजीवकांचा वापर :
संजीवकांचा वापर मण्याचा आकार-रंग व त्यातील गार नियंत्रित करण्यासाठी केला जातो. मणी आकारमान वाढविण्यासाठी जीबेर्लिक आम्ल व सीपीपीयु यांचा वापर फारच उपयोगी पडतो. ही संजीवके पेशींची संख्या वाढवून आकारमानात वाढ घडवून आणतात. त्यामुळे या संजीवकांचा वापर मण्यातील पेशी ज्या अवस्थेत जोमात वाढतात त्या अवस्थेत देणे फायद्याचे ठरते.
संजीवकांचा वापर :
अ. क्र. संजीवक तीव्रता वापरण्याची वेळ उद्देश
१. जीबेर्ल्लिक आम्ल   + फोरक्लोरफेनुरॉन  ४-५० पीपीएम + १-२ पीपीएम ३-४ व ६-७ मि.मी. जाडी आकाराचे मनी असताना देठांची जाडी वाढविण्यासाठी
२. जीबेर्लिक आम्ल + युरिया, फोस्फेट  १० पीपीएम
(५.५-६ पी.एच.)  घडाचा पोपटी रंग – स्प्रे  घडाचे आकारमान वाढविण्यासाठी
३. जीबेर्लिक आम्ल + सायट्रिक आम्ल  १५ पीपीएम
(५.५-६ पी.एच.) वरील अवस्थे नंतर ३-४ दिवसांनी – डीपिंग घडाचे आकारमान वाढविण्यासाठी
४. जीबेर्लिक आम्ल + सायट्रिक आम्ल  २० पीपीएम
(५.५-६ पी.एच.) वरील अवस्थे नंतर ३-४ दिवसांनी – डीपिंग घडाचे आकारमान वाढविण्यासाठी
५. कैल्शिअम नायट्रेट
०.५ ते १ टक्के ७५, ९० किंवा १०५ दिवसा नंतर एकदाच मण्यांच्या पेशींचा ताठरपणा, पेशीभित्तिका वाढविण्यासाठी
६. नेप्थालिक अ‍ॅसिटीक आम्ल ५-१०० पीपीएम फळ काढणी अगोदर ८ ते १० दिवस काढणी पाश्च्यात मण्यांची गळ कमी
श्री. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर
द्राक्ष वेलीच्या पानांचे व्यवस्थापन :
दर्जेदार द्राक्ष उत्पादनात कॅनोपी मॅनेजमेंट (पानांचे विस्तार व्यवस्थापन) ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. प्रकाशसंश्‍लेषण क्रियेतून होणाऱ्या अन्नसाठ्यामुळे पाने मजबूत होतात. द्राक्षवेलीवरील पानांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळण्यासाठी पानांचे योग्य नियोजन आवश्‍यक आहे.
दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी ऑक्‍टोबर छाटणीनंतर सर्व टप्प्यांवर योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. वेलीतील अन्नद्रव्ये फळाला पुरविण्यासाठी पानांचे कार्य सर्वांत महत्त्वाचे ठरते. पाने सक्रिय व मजबूत राहण्यासाठी त्यांना एकसारखा सूर्यप्रकाश जास्तीत जास्त काळ मिळेल अशा पद्धतीने त्यांचे नियोजन आवश्‍यक आहे. वेळेच्या आत वांझफुटी काढून टाकाव्यात. फांदीची लांबी जास्तीत जास्त ८५ ते ९० सेंमी असावी. सव्वा मीटरपर्यंत लांबत गेलेल्या फांदीमध्ये मोठा अन्नसाठा वाया जातो. काडीची जाडी आठ मिलिमीटरपेक्षा अधिक नसावी. वेलीवर पानांची गर्दी अधिक झाल्यास पाने पिवळी पडून मणीगळ वाढते.
वेलीवरील पानांच्या योग्य नियोजनामुळे द्राक्षाच्या वजनात लक्षणीय फरक पडत असल्याचे प्रयोगातून आढळून आले आहे. द्राक्षवेलीवरील पानांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही, तर कितीही खतांचे डोस दिले तरी ते पुरेसे ठरत नाहीत. सर्वसाधारणपणे एका वेलीवर ३५० ते ४०० पाने असावीत. मंडपावरील एका चौरसफुटात १६ ते २० पाने असावीत. एकावर एक तीन थरांपेक्षा जास्त पाने नसावीत. पानांची खुडणी (टॉपिंग) वेळेवर होणे गरजेचे आहे. फलधारणेच्या काळात अपेक्षित शेंडावाढ मिळण्यासाठी वेळेत होणारी पींचिंग, टॉपिंग, पाणी नियोजन महत्त्वाचे आहे.
श्री. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर
द्राक्ष घड व्यवस्थापन :
द्राक्ष बाग स्वमुळावर असेल तर आठ दिवसांत व खुंटावर असेल तर १० ते १२ दिवसांत फुटी निघतात. या फुटी निघाल्यानंतर फुटीला साधारणतः एका आठवड्याने ३ ते ५ पाने दिसू लागतात. अशातच काही फुटींसोबत घड निघण्याऐवजी बाळी घड निघतात, त्यालाच घड जिरणे असे म्हणतात. काही फुटींसोबत जर घड आधीच जोमात असेल तर घड जिरणार नाही; परंतु बऱ्याच ठिकाणी घडाचा जोम पूर्णतः नसतो, त्यामुळे घड जिरण्याची समस्या उद्‌भवते. हे लक्षात घेऊन बागेचे योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.
छाटणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हायड्रोजन सायनामाईडची पेस्टिंग करावी. अनेक द्राक्षबागायतदार या वेळी हायड्रोजन सायनामाईड वापरत नाहीत. तरीसुद्धा बागेत फुटी निघतात. परंतु वातावरणात तापमान जास्त व आर्द्रता कमी असल्याकारणाने बाग मागेपुढे व उशिरा फुटते. हायड्रोजन सायनामाईड पेस्टिंग अथवा फवारणी केल्यास बाग लवकर फुटण्यास मदत होईल, यामुळे ओलांडा डागाळणार नाही.
हायड्रोजन सायनामाईड लावल्यानंतर फुटी आठ ते १२ दिवसांत दिसू लागतात. द्राक्ष बाग स्वमुळावर असेल तर आठ दिवसांत व खुंटावर असेल तर १० ते १२ दिवसांत फुटी निघतात. या फुटी निघाल्यानंतर फुटीला साधारणतः एका आठवड्याने ३ ते ५ पाने दिसू लागतात. अशातच काही फुटींसोबत घड निघण्याऐवजी बाळी घड अथवा बाळी निघतात, त्यालाच घड जिरणे असे म्हणतात. काही फुटींसोबत जर घड आधीच जोमात असेल तर घड जिरणार नाही; परंतु बऱ्याच ठिकाणी घडाचा जोम पूर्णतः नसतो व घड जिरण्याची समस्या उद्‌भवते.
घड जिरण्याच्या समस्येचे मूळ कारण जरी एप्रिल छाटणीतील व्यवस्थापन व त्या वेळीस होणारा वातावरणातील बदल असेल तरी या समस्येस बरीच कारणे आहेत.
घड जिरण्याची कारणे :
१) उशिरा झालेली खरड छाटणी : खरड छाटणी उशिरा झालेल्या बागांमध्ये खरड छाटणीनंतर अन्नसाठा तयार होणाऱ्या कालावधीमध्ये सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे ऑक्‍टोबर छाटणीनंतर घड जिरण्याची समस्या येते.
२) खरड छाटणीनंतर ढगाळ हवामान : खरड छाटणी मुख्यतः सुप्त अवस्थेतील घडनिर्मिती घडवून आणण्याकरिता केली जाते. सूक्ष्म घडनिर्मितीची प्रक्रिया चालू असताना वातावरणातील घटक अनुकूल नसल्यास पेशी विभाजनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम घडनिर्मितीवर होतो किंवा अंशतः घडनिर्मिती होऊन प्रत्यक्षात फूट निघण्याच्या वेळी दिसून येणारा घड हा योग्य प्रकारे तयार होत नाही.
३) फुलोरा निर्मितीतील घटकांमधील बदल : फळधारक डोळ्यांची निर्मिती तीन अवस्थांमधून होते. ऍनालाजेनची निर्मिती, फळधारक डोळ्यांची निर्मिती आणि फुलांची निर्मिती या तीन अवस्थांपैकी फुलोऱ्यांची निर्मिती ही अवस्था खूप महत्त्वाची असते. या अवस्थेच्या निर्मितीसाठी कारणीभूत असलेल्या घटकांमध्ये त्यात प्रकाश सायटोकायनिन, आरएनए (रायबोन्युक्‍लिक ऍसिड) बदल झाल्यास त्याचा परिणाम बाळी किंवा शेंडा निर्मितीमध्ये होतो.
४) सूक्ष्म घडांचे पोषण : काडी तपासणी अहवालामध्ये अनेक वेळा पांढऱ्या घडांची नोंद असते, म्हणजेच सूक्ष्म घडनिर्मितीमधील पहिले दोन टप्पे व्यवस्थित पार पडलेले असतात; परंतु तिसऱ्या टप्प्यात खरड छाटणीनंतर ६१ ते ९० दिवसांच्या कालावधीत काही कारणामुळे घडांचे पोषण योग्य प्रकारे होत नाही. त्यातच असे घड फुटीची वाढ होताना पावसाळी हवा असेल तर असे घड फुटींच्या वाढीच्या अवस्थेत जिरण्याची शक्‍यता जास्त असते. स्वच्छ हवामानात असे घड टिकून राहतात; परंतु वाढ फारशी समाधानकारक होत नाही.
५) वेलीतील अन्नसाठा : खरड छाटणीनंतर काडी पक्वतेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये रोगांचा प्रादुर्भाव, पाने गळणे किंवा नवीन फुटींची सतत वाढ या कारणांमुळे वेलींमध्ये पुरेसा अन्नसाठा होत नाही. या अगोदर सूक्ष्म घडनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण झालेली असते. त्यामुळे ऑक्‍टोबर छाटणीनंतर घड जिरण्याची समस्या या परिस्थितीमध्ये यायला नको, तरी फुटींच्या वाढीसोबत घडाचा विकास होणे अडचणीचे ठरते.
६) बोद व पांढऱ्या मुळींची संख्या : संशोधनाअंती आढळून आले, की बागांमध्ये छाटणीच्या वेळी वेलींच्या वाढीसाठी आवश्‍यक असलेली पांढरी मुळे नसल्याने त्याचा प्रत्यक्ष परिणाम घड जिरण्यात होतो. वेलींमध्ये मुळातच अन्नसाठा कमी त्यात मुळी कार्यक्षम नसल्याने तसेच पांढरी मुळे कार्यक्षम न करून घेतल्याने फूट बाहेर पडण्यासाठी आवश्‍यक जोम मुळांद्वारे मिळत नाही, त्यामुळे घड जिरण्याची समस्या उद्‌भवते.
७) ऑक्‍टोबर छाटणीतील चुका : ऑक्‍टोबर छाटणी करताना झालेल्या चुकांमुळे वेलीवर कमी घड लागतात. योग्य ठिकाणी छाटणी न झाल्यामुळे घड जिरण्याची शक्‍यता कमी होते. हायड्रोजन सायनामाईडची पेस्टिंग करताना जास्त डोळ्यांना पेस्टिंग केली गेल्यामुळे जास्त डोळे फोडून निघतात. वेलीमध्ये अन्नसाठ्याचा अभाव असताना जास्त डोळे फुटल्यास फुटीचा जोम कमी राहतो. अन्नसाठ्याची विभागणी होते व घड जिरणे किंवा लहान येणे यासारखे दुष्परिणाम दिसून येतात.
ऑक्‍टोबर छाटणी घड जिरू नये म्हणून उपाययोजना :
बागेच्या व्यवस्थापनात झालेल्या काही चुका तसेच काही घटकांचा ऑक्‍टोबर छाटणीशी असणारा प्रत्यक्ष संबंध याचा विचार करता या समस्येवर ऑक्‍टोबर छाटणीनंतर कशाप्रकारे मात करता येईल यासाठी काही उपाययोजना करणे आवश्‍यक असते.
१) खरड छाटणी शक्‍यतोवर उशिरा करू नये.
२) द्राक्ष काडीची घडासाठी तपासणी करावी : ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी द्राक्ष काडीची तपासणी करून काडीवरील डोळ्यांमधील घडांची परिस्थिती समजावून घेणे आवश्‍यक आहे. सुरवातीच्या डोळ्यांमध्ये घडनिर्मिती चांगली झालेली असते तेव्हा परिस्थिती लक्षात घेऊन छाटणी केल्यास चांगली घडनिर्मिती झालेले डोळे उपयोगात येऊ शकतात.
३) ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी ताण देणे : छाटणीअगोदर ताण दिल्यास पानांमधील अन्नसाठा द्राक्ष काडीकडे व डोळ्यांकडे वळविला जाऊन त्याचा फायदा नवीन फुटीस होईल व एकसारखी फूट निघण्यास मदत होईल.
४) योग्य छाटणी व एकसारखी फूट : योग्य छाटणी व नियंत्रित डोळ्यांमधून एकसारखी फूट काढणे यास देखील महत्त्व आहे. काडीवरील जितके जास्त डोळे फुटून येतील तेवढा अन्नसाठ्याचा व्यय जास्त होईल. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी घड जिरण्याची समस्या उद्‌भवू शकते. म्हणूनच नेमके डोळे फुटून येण्यासाठी छाटणी व पेस्टिंगद्वारे उपाययोजना करावी. हायड्रोजन सायनामाईडचे प्रमाण योग्य वापरून पेस्टिंग करताना नेमकेच डोळे फोडून काढावेत व नंतर साधारणतः एका काडीवर एक घडाची फूट व विस्ताराच्या दृष्टीने काही वांझ फुटी राखाव्यात.
घड जिरण्याची समस्या दिसत असल्यास वाढ विरोधकांचा वापर करावा. सध्या सीसीसी सारख्या वाढविरोधकास मनाई नसली तरी त्यावरील प्रयोग सुरू असल्यामुळे ते वापरणे इष्ट होणार नाही म्हणून दुसरे वाढविरोधके वापरू नयेत. वेलीच्या वाढीचा वेग हा पाणी तसेच नत्र यांच्या नियंत्रणाने कमी करावा. या वेळी वेलीच्या वाढीचा वेग मंदावणे गरजेचे असते. त्यासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा योग्य वापर करावा. त्यामध्ये जास्त रसायनाचा वापर टाळावा व जोपर्यंत घड व्यवस्थित होत नाही तोपर्यंत नत्र तसेच जीएचा वापर करू नये. या दरम्यान सी.विड एक्‍सट्रॅक्‍ट किंवा तत्सम रसायनांचा वापर टाळावा. घडात सुधारणा दिसू लागल्यानंतर जीएच्या फवारणीस सुरवात करावी.
५) जमिनीचे व्यवस्थापन : पांढऱ्या मुळींची संख्या बरेच प्रमाणात घड जिरण्याच्या समस्येसाठी कारणीभूत आहेत. त्यामुळे ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी जमिनीचे व्यवस्थापन करायला हवे. जमिनीच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत ऑक्‍टोबर छाटणीपूर्वी बोद हलकेसे हलवून मोकळे करावेत. तसेच पांढऱ्या मुळीच्या वाढीस पोषक वातावरण तयार करणे आवश्‍यक असते.
अनियमित पावसामुळे घड जिरण्याची समस्या उद्‌भवते. एप्रिल छाटणी उशिरा झालेल्या द्राक्ष बागांमध्ये ही समस्या उद्‌भवू शकते. त्यामुळे त्यांना वरील काही उपाययोजना फायदेशीर ठरतील.
– श्री. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर
पी.एचडी. (फळशास्ञ) स्कॉलर, जुनागढ कृषी विद्यापीठ, गुजरात.
संपर्क- ९४२२२२११२०
ईमेल- vinayakshinde73@gmail.com
ब्लॉग- drvinayakshindepatil.blogspot.in
कोणताही लेखक जेव्हा लेख लिहित असतो तेव्हा तो स्वतःचे ज्ञान आणि विविध भाषेतील लेख, पुस्तके, मासिके, वेबसाईटस्, इ. वरील माहिती वाचून, संकलन करून ती लेखाच्या स्वरूपात मांडत असतो… त्या लेखावर मूळ लेखकाचे अधिकार असतात, ज्यांना आपल्या कायद्यात “इंटेलेक्चुअल प्रोपर्टी राईटस् (Intellectual Property rights)” या रकान्याखाली संरक्षण दिलेले आहे… तेव्हा कोणत्याही मूळ लेखकाचे नाव रिमूव करताना, लेखाला स्वतःचे नाव टाकून पुढे पाठवताना काळजी घ्या… मूळ लेखक कॉपीराईट (Copyrights), ट्रेड सिक्रेटस् (Trade Secrets), इ. कलमांखाली आपल्यावर कारवाई करू शकतो… या कायद्यांच्या उंल्लघनासाठी १ ते ३ वर्ष तुरूंगवास, ६० हजार ते १ लाख रूपयांपर्यंत दंड या प्रकारची शिक्षा होवू शकते… आपणांस वाटते तेवढे हे सर्व सोपे नाही… मूळ लेखकाचे नाव रिमूव करून, स्वतःचे नाव टाकून मेसेज पुढे पाठवू नका….
|| अन्नदाता सुखी भवः ||
अधिक माहितीसाठी आपले फेसबुक पेज लाईक करा, आपल्या परिचितांनाही याबद्दल नक्की सांगा… आपले लेख आहे तसे शेअर करा…
Source:
– श्री. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर
पी.एचडी. (फळशास्ञ) स्कॉलर, जुनागढ कृषी विद्यापीठ, गुजरात.
Add:
होय आम्ही शेतकरी®
https://m.facebook.com/profile.php?id=982075821822866

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »