दर्जेदार उत्पादनासाठी गंधक आवश्यक

0

दर्जेदार उत्पादनासाठी गंधक आवश्यक

गंधक,sulfur

गंधक प्रकाश संश्लेषणक्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढण्यास मदत करते. फळे तयार होण्यास व पिकण्यास गंधकाची अत्यंत आवश्यकता असते. हे लक्षात घेता माती परीक्षणानुसार गंधकयुक्त खतांचा वापर करणे आवश्यक आहे.

वनस्पतीमधील अमिनो आम्ल तयार करण्यासाठी गंधक आवश्यक घटक आहे. जीव-रासायनिक प्रक्रियेमध्ये गंधकाचा सहभाग महत्त्वाचा असतो. वनस्पतीमध्ये श्वसनक्रिया, तेलनिर्मिती व हरितद्रव्य तयार करण्यात गंधकाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. संकरित वाण जमिनीमधून गंधकाचे मोठ्या प्रमाणावर शोषण करतात. तेलबिया पिकाची गंधकयुक्त खताची गरज जास्त असते. मात्र जमिनीमध्ये गंधकयुक्त खते योग्य प्रमाणात दिली जात नाहीत. उदा. नत्रयुक्त खतामध्ये अमोनियम सल्फेटऐवजी युरियाचा वापर वाढत आहे.

⭕गंधकाचे महत्त्व⭕
१) पीक उत्पादन आणि गुणवत्तेमध्ये वाढ.
२) जमिनीचे आरोग्य आणि उत्पादकता टिकते.
३) नत्राची कार्यक्षमता व उपलब्धता वाढते.
४) गंधकाला भूसुधारक असे म्हणतात. कारण गंधक मातीचा सामू कमी करण्याचे काम करतो, त्यामुळे चुनखडीयुक्त चोपण जमिनीमध्ये याचा वापर करावा.
५) गळीत धान्यामध्ये प्रथिने व तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी गंधक उपयुक्त.
६) इतर अन्नद्रव्यांसोबत सकारात्मक फायदा.

  ⭕गंधकाचे कार्य⭕
१) प्रकाश संश्लेषणक्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढण्यास मदत, त्यामुळे पिकाच्या अन्ननिर्मितीला चालना. कमतरता झाल्यास हरितद्रव्य निर्मितीत १८ टक्क्यांनी घट.

२) वनस्पतीमध्ये गंधक हे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि स्निग्ध पदार्थ यामध्ये आढळते. हे वनस्पतींना तिखट वास प्रदान करतात. उदा. कांदा, लसूण.

३) हे अमिनो आम्लांचा महत्त्वपूर्ण घटक आहे. सिस्टीन व सिस्टाइन या प्रथिनांच्या निर्मितीसाठी गंधक आवश्यक.

४) गंधक हा मिथीओनाईन, थायमिन आणि बायोटिन यांचा महत्त्वपूर्ण घटक.

५) गंधक द्विदल कडधान्य पिकांच्या मुळावरील गाठीमध्ये वाढ होण्यास व जिवाणूद्वारे नत्र स्थिर करण्यास मदत करते.

६) वनस्पतीच्या निरनिराळ्या विकारांच्या व चयापचयाच्या क्रियेत मदत.

७) फळे तयार होण्यास व पिकण्यास गंधकाची अत्यंत आवश्यकता.

⭕कमतरतेची कारणे⭕

१) जमिनीतून पिकांद्वारे गंधकाचा अत्यल्प किंवा न होणारा वापर

२) सघन शेती, दुबार-तिबार पीक पद्धती, अधिक उत्पादनामुळे गंधक शोषणात वाढ.

३) गंधकविरहित अथवा गंधकाचे प्रमाण अतिशय कमी असलेल्या खतांचा वापर.

४) निचऱ्याद्वारे आणि मातीच्या ऱ्हासाद्वारे होणारी गंधकाची धूप.

५) पिकांचे अवशेष, सेंद्रिय खते आणि काडी-कचऱ्याचा न होणारा पुनर्वापर.

*⭕पिकांमधील गंधक कमतरतेची लक्षणे*

१) पाने पिवळी पडतात.

२) फळे पिवळसर हिरवी दिसतात. वाढ कमी होते. रंग बदलतो, आतील गर कमी होतो.

३) नवीन येणारी पाने पिवळी पडू लागतात, देठ किरकोळ व आखूड राहतात. कोवळ्या पानांवर जास्त परिणाम दिसतो.

४) द्विदल पिकांच्या मुळावरील नत्र स्थिरीकरण करणाऱ्या गाठींचे प्रमाण कमी होते.

5) पानगळ लवकर होते. पानांच्या कडा व शेंडे आतल्या बाजूस सुरळी होऊन वळतात.

6) प्रथिने आणि तेलाच्या प्रमाणात घट.
गंधकयुक्त खते (कंसात गंधकाचे प्रमाण)
१) सिंगल सुपर फॉस्फेट : (२० टक्के), २) डबल सुपर फॉस्फेट : (१० टक्के),
३) अमोनियम सल्फेट : (२४ टक्के),
४) अमोनियम फॉस्फेट सल्फेट : (१५ टक्के),
५) पोटॅशियम सल्फेट : (१८ टक्के),
६) झिंक सल्फेट : (१५ टक्के),
७) जिप्सम : (१६-२० टक्के),
८) मूलद्रव्यी गंधक (गंधक पूड) : (८५ ते १०० टक्के),
९) आयर्न पायराईट : (२२ ते २४ टक्के), १०) फॉस्फो जिप्सम : (११ टक्के)

गंधकाचे इतर स्रोत

१) जमीन,
२) सेंद्रिय खते
३) पिकांचे अवशेष,
४) प्रेसमड,
५) गंधकवर्गीय कीडनाशके,
६) पाऊस आणि ओलीत

असा करा गंधकयुक्त खतांचा वापर

– शिफारसीनुसार पिकानुरूप जमिनीद्वारे गंधकयुक्त खते द्यावीत.

– तेलबिया पिकांना हेक्टरी २० किलो गंधक जमिनीद्वारे द्यावे.

– समतोल खत व्यवस्थापनासाठी माती परीक्षण करून जमिनीत अन्नद्रव्यांची उपलब्धता तपासावी.

– गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीत विविध पिकांसाठी २० ते ४० किलो गंधकाची मात्रा उपयुक्त ठरते.

– नत्र : स्फुरद :पालाश : गंधक गुणोत्तर ४:२:२:१ असले पाहिजे.

– गंधकाचा वापर जमिनीमध्ये कसा आणि केव्हा करावा हे गंधकाच्या स्रोतावर अवलंबून असते. साधारणतः गंधकयुक्त खतांच्या मात्रा पेरणीपूर्वी जमिनीत पेरून द्याव्यात.

– जिप्सम आणि सिंगल सुपर फॉस्फेट ही सर्वसाधारणपणे गंधकयुक्त खते म्हणून वापरली जातात. आयर्न पायराईट आणि गंधक भुकटी (मूलद्रव्यी गंधक) वापरायचा असेल तर पिकांच्या पेरणीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावी.

source :

☎संपर्क : डॉ. पपिता गौरखेडे ,
(कृषिरसायन व मृदशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »