खोडकिड सर्व माहिती

0

खोडकिडीचे प्रौढ भुंगेरे साधारणतः मान्सूनपूर्व, जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात खोडातून बाहेर येतात. खोडकिडीचा जीवनक्रम, नुकसान करण्याचा प्रकार जाणून त्यातील कमकुवत अवस्था जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. या कमकुवत अवस्थेमध्ये एकात्मिक नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

खोडकिडीचे प्रौढ भुंगेरे साधारणतः मान्सूनपूर्व, जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात खोडातून बाहेर येतात. खोडकिडीचा जीवनक्रम, नुकसान करण्याचा प्रकार जाणून त्यातील कमकुवत अवस्था जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. या कमकुवत अवस्थेमध्ये एकात्मिक नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

द्राक्ष बागेमध्ये स्ट्रोमॅशिअम बारबॅटम, सिलोस्टर्ना स्क्रॅब्राटर, डर्व्हिशिया कडंबी (नवीन लाल अळी) आणि २०१८ साली आढळलेली कोलिओप्टेरा प्रवर्गातील नवीन प्रजाती या चार महत्त्वपूर्ण खोडकीडीच्या प्रजाती आढळतात. यापैकी स्ट्रोमॅशिअम बारबॅटम ही पूर्वी दुय्यम स्वरुपाची खोडकीड होती. ही कीड प्रामुख्याने जुन्या बागांमध्ये दिसून येत असे. मात्र, अलिकडे या किडीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. दुय्यम असलेली कीड ही प्रमुख किडीपैकी एक म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. या खोडकिडीचा जीवनक्रम, नुकसान करण्याचा प्रकार जाणून त्यातील कमकुवत अवस्था जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. या कमकुवत अवस्थेमध्येच एकात्मिक नियंत्रणाचे उपाययोजना राबवल्यास बंदोबस्त करणे सोयीस्कर ठरेल.

स्ट्रोमॅशिअम बारबॅटम ही जंगली खोडकीड आहे. ती वाळलेल्या लाकडांमध्ये, पॅकिंग सामुग्री, फर्निचर, प्लायवूड व घराला वापरण्यात येणाऱ्या लाकडांमध्ये दिसून येत होती. मात्र, आता ६ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाच्या जुन्या झालेल्या द्राक्षबागेमध्ये तिचे प्रमाण जास्त आढळून येते. आधी मेलेल्या किंवा वाळलेल्या लाकडावर या किडीचा जास्त प्रादुर्भाव असे. पाण्याची कमतरता, जास्त तापमानामुळे बागेमध्ये वाळलेल्या झाडांची, फांद्याची संख्या वाढते. द्राक्षबागेचे वाढत जाणाऱ्या वयासोबत मेलेल्या किंवा वाळलेल्या खोड व ओलांड्याचे प्रमाण वाढत जाते.

या खोडकिडीचे प्रौढ भुंगेरे साधारणतः मान्सूनपूर्व, जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात खोडातून बाहेर येतात. मादी भुंगेरे मुख्यतः ढिली किंवा सुटलेल्या सालीच्या आत, खोडावर व ओलांड्यावर एकेक किंवा एकत्रित अंडी घालते.

अंड्यातून बाहेर आलेली अळी खोड आत आत पोखरत जाते. बोगदा तयार करते. भुसा बाहेर न टाकता बोगद्यातच ठासून भरलेला दिसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना हिचा प्रादुर्भाव सहजासहजी समजून येत नाही.

पोखरलेले खोड ठिसूळ होऊन लवकर मोडते. साधारणपणे २ ते ३ वर्षात या किडीच्या प्रादुर्भावामुळे द्राक्षपिकाची ५० टक्क्यापेक्षा अधिक उत्पादनक्षमता घटते.

एकात्मिक नियंत्रण

या खोडकिडीची अंडी सुटलेल्या सालीच्या आत व खोडावर असतात. त्यामुळे एप्रिल छाटणीनंतर झाडावरची संपूर्ण ढिली किंवा सुटलेली साल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मान्सून पूर्व कालावधीत हाताने काढून घ्यावी.

मान्सूनपूर्व किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बागेजवळ १ प्रकाश सापळा प्रति एकर लावावा. या सापळ्याकडे खोड किडीचे भुंगेरे आकर्षित होतात. आकर्षित झालेले भुंगेरे कीटकनाशक मिश्रीत पाण्यात नष्ट केल्यास पुढील उत्पत्ती कमी होते.

या खोडकिडीच्या अळी व्यवस्थापनासाठी कोणतेही आंतरप्रवाही कीटकनाशक काम करत नाही. तसेच कोणतेही स्पर्शजन्य कीटकनाशक खोडातील अळीपर्यंत पोचत नाही. म्हणून प्रकाश सापळ्यात हे भुंगेरे आढळत असल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मॉन्सूनपूर्व, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ३ ते ४ दिवसाच्या अंतराने खालील किटकनाशकांच्या द्रावणाने ५ ते ६ वेळा खोड आणि ओलांडे चांगले धुवून घ्यावेत.

फवारणी प्रमाण प्रती लीटर पाणी

लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.९ सीएस) ०.५मिली किंवा

फिप्रोनील (८० डब्ल्यूजी) ०.०६२५ ग्रॅम किंवा

इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) ०.३ मिली.

संपर्क डॉ. दीपेंद्र सिंह यादव, ०२०-२६९५६०३५

(वरिष्ठ किटकशास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी जि. पुणे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »