जमिनीची धूप होण्याची कारणे भाग २

0

भाग २: जमिनीची धूप होण्याची कारणे


मागील भागात आपण धूप चे प्रकार बघितले. आता आपण धूप होण्याची कारणे बघूया.


हवामान

हवामानाच्या धूपकारक घटकांमध्ये, उष्णतामान, वारा व पाऊस या तिन्हींचा समावेश होतो. उष्णतामानातील फरकामुळे जमिनीचे आकुंचन व प्रसरण होवूनन मातीचे कण विलग होतात. गतिमान वा-याच्या भूपृष्ठाशी होणा-या घर्षणानेही मातीचे कण विलग होतात, तर पावसाच्या थेंबाच्या आघातामुळे भूपृष्ठावरील माती कण विलग होतात. हे सर्व विलग झालेले कण वा-याने व भूपृष्ठावरुन वाहणा-या पावसाच्या पाण्याबरोबर वाहून नेले जातात.


मनुष्य व प्राणी –

मनुष्य व प्राणी यांचा सतत वापर जमिनीवर होत असतो. माणसांच्या हालचालीमुळे व जनावरांच्या खुरामुळे जमिनीची झीज होते वव मातीचे विस्कळीत कण काही प्रमाणात त्याबरोबर वाहून नेले जातात.


भूरचना

जमिनीच्या उतारामुळे वाहणा-या पाण्यास गती मिळते. ही गती सतत वाढत असते. यापासून निर्माण होणा-या उर्जेमुळे जमिनीच्या भागाची झीज होते.


शेती मशागत

शेतीसाठी केलेल्या जमिनीच्या मशागतीमुळे मातींची उलथापालथ होते व माती वाहून जाण्यास चालना मिळते.


वृक्ष तोड

भूपृष्ठावरील वनस्पतीमुळे भूपृष्ठावर एक प्रंकारचे आच्छादन तयार होते व त्यामुळे पडणा-या पावसाच्या थेंबाच्या आघाताची तीर्व्रता त्यात शोषली जाते. परंतु वृक्ष तोड केल्यामुळे हे आच्छादन नष्ट होवून धूपेस चालना मिळते.


जमिनीवरील वनस्पतींच्या आच्छादनामुळे अन्यप्रकारेसुध्दा धूपेस प्रतिबंध होत असतो. एकतर वनस्पतींच्या मुळांना मातीचे कण घट्ट धरुन ठेवले जातात व सहजासहजी धुपून जावू शकत नाहीत. दुसरे म्हणजे वनस्पतीमुळे जमिनित सूक्ष्म जीव निर्माण होतात . ते लहान लहान नलिका जमिनीत तयार करीत असतात. त्यामुळे जमिनीत पाणी शोषले जावून भूपृष्ठावरील पाणलोट कमी होतो व धुपेस काही प्रमाणात आळा बसतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »