कांदा लागवड

0
कांदा
कांदा हे पीक खरीप, लेट खरीप (रांगडा) व रब्बी अशा तीनही हंगामात घेतले जाते. एकूण क्षेत्रापैकी सरासरी २०% क्षेत्र हे खरीप, २०% क्षेत्र हे लेट खरीप (रांगडा) तर ६०% क्षेत्र हे रब्बी हंगामात राहते. रब्बी हंगामातील कांद्याचे उत्पादन व प्रत चांगली राहते परंतु बाजार भाव कमी मिळतात. त्या तुलनेत नोव्हेंबर ते मार्च महिन्यात निघणाऱ्या खरीप व लेट खरीप कांद्याला बाजारभाव चांगला मिळतो. खरीप हंगामातील कांद्याचे उत्पादन थोडे कमी (सुमारे ८० ते १०० क्विंटल प्रतिएकर) मिळते. लेट खरीप कांद्याला पोषक हवामान मिळाल्यामुळे उत्पादन व दर्जा चांगला राहतो. एकंदरीत मागणी व पुरवठा यांचा विचार केला असता खरीप व रांगडा हंगामातील कांदा उत्पादन तंत्रज्ञान हे नक्कीच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे तंत्रज्ञान ठरू शकते.
खरीप कांदा लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची, हलकी ते मध्यम जमीन निवडावी.
हंगामनिहाय कांदा वाण
हंगाम पिकाचा कालावधी वाण उत्पादन (टन/हे.)
खरीप मे ते सप्टेंबर भीमा सुपर, भीमा रेड, अॅग्री फाऊंड, ,डार्क रेड, बसवंत ७८०, एन-५३, फुले समर्थ १५-२०
लेट खरीप ऑगस्ट ते फेब्रुवारी भीमा सुपर, भीमा रेड, फुले सफेद, फुले समर्थ, अॅग्री फाऊंड, डार्क रेड, बसवंत ७८० २२-२५
रब्बी ऑक्टोबर ते एप्रिल अकोला सफेद, अॅग्री फाऊंड, लाईट रेड, एन २४१ २०-२५

रोपवाटिका व्यवस्थापन

रोपवाटिकेच्या व्यवस्थापनातून निरोगी रोपे मिळवली की निम्मी लढाई जिंकली जाते.
रोपवाटिकेसाठी शेतातील उंच भागावरील हलकी ते मध्यम जमिनीची निवड करावी. एक हेक्टर लागवडीसाठी १०-१२ गुंठे क्षेत्र तसेच प्रती एकरी ४-५ किलो बियाणे लागते.
रोपवाटिकेसाठी गादी वाफा / रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करावा. त्यासाठी १ मी रुंद, ३ मी लांब व १५ सेमी उंचीचे गादी वाफे तयार करावेत. मिश्र खत (१०० ग्रॅम १५:१५:१५) व शेण खत (२० किलो) टाकावे.
नियमित व योग्य पाणी द्यावे.
४० -४५ दिवसांत रोपे लागवडयोग्य होतात.

पुनर्लागवड
कांदे जमिनीच्या खाली २५ सेंमीपर्यंत वाढतात. उत्तम निचऱ्याची हलकी ते मध्यम भारी जमिनीची निवड करावी. नांगरणी व वखरणी करून शेतात २० ते २५ टन कुजलेले शेणखत टाकावे.
पुनर्लागवडीकरिता रुंद वरंबा व सरी पद्धतीचा अवलंब करावा. त्यासाठी ४-५ फूट रुंदीचे व १२-१५ सेमी उंचीचे शेताच्या लांबीनुसार वरंबे तयार करून १५ x १० सेंमी अंतरावर लागवड करावी.
ओलिताकरिता ठिबक किवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
रोपांचा शेंड्याकडील १/३ भाग कापून टाकावा. लागवडीपूर्वी रोपे शिफारशीत कीटकनाशक व बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून लागवड करावी.
अन्नद्रव्य व्यवस्थापन

वेळ                     नत्र स्फुरद पालाश
खरीप कांदा
 (उत्पादन क्षमता – २५-३० टन/हे.)
बेसल डोस            २५ कि ४० कि ४० कि
३० दिवसांनी         २५ कि ०० ००
४५ दिवसांनी         २५ कि ०० ००
एकूण                   ७५ कि ४० कि ४० कि
लेट खरीप कांदा 
(उत्पादन क्षमता – ४०-५० टन/हे.)
लागवड पूर्वी           ४० कि ४० कि ६० कि
३० दिवसांनी          ३५ कि ०० ००
४५ दिवसांनी           ३५ कि ०० ००
एकूण                    ११० कि ४० कि ६० कि
जमिनीतून दिलेल्या खतांसोबतच फवारणीच्या माधमातून १९:१९:१९ खते १५, ३० व ४५ दिवसांनी व १३:००:४५ खते ६०, ७५ व ९० दिवसांनी —- ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे द्यावे.
कांदा वाढीच्या अवस्थेनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा.
२० ते २५ किलो गंधक लागवडपूर्व दिल्यास कांद्याची प्रत व टिकवण क्षमता वाढते.
Source-
निवृत्ती पाटील, ९९२१००८५७५
विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषी विज्ञान केंद्र, करडा, जि. वाशीम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »