पक्षी, शेती आणि पर्यावरण

0
🦜🕊पक्षी, शेती आणि पर्यावरण🌿🌱
“सामान्यपणे मानवास व शेतीस हानिकारक असणार्‍या कीटकांचा समावेश पक्ष्यांच्या अन्नामध्ये होतो. अनेक प्रजातींचे पक्षी फक्त कीटकच खात नाहीत, तर त्यांची अंडीही मोठ्या प्रमाणावर फस्त करून टाकतात. त्यामुळे वेगवेगळ्या अवस्थेतील कीटक उदा. अंडी, अळी, कोष, पूर्ण कीटक हे पक्ष्यांकडून खाल्ले जातात, त्यामुळे कीटकांची संख्या नियंत्रित राखण्यास मदत होते…
आजच्या बिहार राज्यातील पुसा येथील ‘अ‍ॅग्रिकल्चर रीसर्च इन्स्टिट्यूट’मधील सी. डब्ल्यू. मॅसन आणि एच. मॅक्सवेल लेफ्रॉय या कीटकशास्त्रज्ञांनी ‘भारतातील पक्ष्यांचे अन्न’ या विषयावर विसाव्या शतकाच्या प्रारंभी संशोधन केले. त्यात त्यांना असे आढळून आले की; शेतातील पिकांवर येणारे अनेक पक्षी असे आहेत की, ज्यांचे खाद्य प्राधान्याने पिकांवरील कीड आणि कीटक हे आहे; तर शेतामधील उत्पादित धान्य हे काही पक्ष्यांचे खाद्य असते. त्यामुळे काही पक्षी हे कीड नियंत्रणास मदत करतात, तर काही पक्ष्यांमुळे पिकांचे नुकसान होते. शेती आणि पर्यावरण यांना साहाय्यभूत ठरणार्‍या पक्ष्यांबद्दलची माहिती प्रस्तुत लेखातून देण्यात आलेली आहे.
उपद्रवी किडीचे व कीटकांचे निर्मूलन करणारे पक्षी
कीटकांची विविधता़, त्यांची संख्या व अधाशीपणे खाण्याची सवय हे सर्व अविश्वसनीय आहे. भारतीय उपखंडात जवळपास तीस हजार प्रकारचे कीटक असल्याची नोंद आढळते. या सर्व कीटकांना अन्न पुरवण्याचे काम वनस्पती व प्राणी यांच्याकडून होते. कीटकांची संख्या मर्यादित राहिली नाही, तर शेतीबरोबरच कोणत्याही प्रकारच्या वनस्पती जिवंत राहणार नाहीत. प्रत्येक सजीव मग तो प्राणी असो वा वनस्पती; त्याला अन्नासाठी स्पर्धा ही करावीच लागते. अनेक कीटक (अळ्या) दिवसातून दोन वेळा त्यांच्या वजनाइतकेच अन्न ग्रहण करतात. कोवळी पाने खाणार्‍या अळ्या 24 तासांत त्यांच्या वजनाच्या दोनशे पट अन्न खातात. टोळ ज्याप्रमाणे त्यांच्या खाण्याच्या असाधारणपणासाठी प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे ते मुबलक प्रजोत्पादनासाठीही प्रसिद्ध आहेत. त्यांचा गट कधीकधी इतका मोठा असतो की, तो काही तासांतच एका बहारदार झाडाचेे रूपांतर निरुपयोगी अशा रिकाम्या खोडामध्ये करतो. मादी टोळ जमिनीमध्ये एका कोषात साधारणपणे १०० अंडी घालते, तर एक मादी असे अनेक कोष तयार करते. दक्षिण आफ्रिकेतील शेतात एका वेळी १ हजार ३३५ हेक्टर क्षेत्रातून चौदा टन अंडी खोदण्यात आली होती, ज्यांच्यापासून अंदाजे एक हजार दोनशे पन्नास दशलक्ष इतकी टोळांची संख्या वाढली असती.
कीटकांचे हे वाढते प्रमाण आणि अन्नरूपात वनस्पतीभक्षण करण्याची त्यांची क्षमता लक्षात घेता, कीटकांची संख्या एका विशिष्ट/ठरावीक प्रमाणात नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे आणि पक्ष्यांमार्फत हे काम निसर्गतः केले जाते. सामान्यपणे वनस्पतींसाठी, विशेषतः शेतातील पिकांसाठी आणि विविध प्राण्यांसाठी उपद्रवी ठरणार्‍या कीटकांचा समावेश पक्ष्यांच्या अन्नामध्ये होतो. त्यामुळे अनेक प्रजातींचे पक्षी फक्त कीटकांनाच खात नाहीत, तर त्यांची अंडीही मोठ्या प्रमाणावर फस्त करतात. त्यामुळे वेगवेगळ्या अवस्थेतील कीटक उदा. अंडी, अळी, कोष, पूर्ण कीटक पक्ष्यांकडून खाल्ले जातात. त्यामुळे कीटकांची संख्या नियंत्रित राखण्यास मदत होते. दरवर्षी हिवाळ्यामध्ये कीटकांची एक नवी पिढी तयार होत असते. भोरड्या आणि मैना हे पक्षी याच ऋतूमध्ये हिमालयातून लाखोंच्या संख्येने देशातील वेगवेगळ्या भागांत येतात आणि ज्वारी व बाजरी यांसारख्या पिकांना घातक ठरणार्‍या कीटकांच्या टोळ्या आणि अळ्या खाऊन किडींपासून होणारे पिकांचे नुकसान रोखून धरतात. किडींपासून पिकांचे संरक्षण करणार्‍या पक्ष्यांमध्ये कावळे, नीलकंठ यांसारख्या पक्ष्यांचाही समावेश होतो. शेतीसाठी घातक असणारे कीटक, गवतातील बिया इत्यादींपासून संरक्षण करण्याचे काम प्रौढ फिंचेस व सुगरण (Finches & Weavers), चंडोल (larks), चिमण्या (Pipits) आणि वटवटे (Warblers) या जातींचे पक्षी करतात. प्रौढ फिंचेस व सुगरण या जातींचे पक्षी पिकांवरील अळ्या आणि अंडी त्यांच्या पिल्लांना भरवतात, तसेच शेतातील गवतांच्या बिया खाऊन ते तणांचा वाढता प्रसार थांबवतात. अशा प्रकारच्या पक्ष्यांचे प्रमाण आपल्या परिसरातील गवताळ भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

पाकोळ्या (Swifts and Swallow) प्रवर्गातील पक्षीही गव्हावरील कीडनियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावतात. हिवाळ्यात आणि मध्य उन्हाळ्यात पिकांवर ज्या किडींचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव होतो, त्यांवर हे पक्षी उदरनिर्वाह करतात. गमतीशीर बाब म्हणजे वटवटे (Warblers) जातीचे पक्षी ऊस पिकातील कीटक खात असताना आपणांस पाहायला मिळतात. बुश चॅट, खाटीक, कोतवाल, वेडा राघू हे पक्षी पिकांभोवती दिवसा वेगवेगळ्या कीटकांना खाताना आढळतात. पांढरा करकोचा, शराटी यांसारखे पक्षी जमिनीतील वेगवेगळे कीटक पायाने उकरून खात असतात.
पक्ष्यांच्या अन्नातील कीटकांचे प्रमाण पाहिल्यास असे लक्षात येते की, भोरड्यांची एक जोडी २४ तासांत ३७० वेळा घरट्याकडे अन्न घेऊन येते. त्यामध्ये अळी, टोळ, नाकतोडे असे विविध कीटक असतात. भोरड्यांकडून घरट्यात आणल्या जाणार्‍या अन्नाचे वजन त्या-त्या भोरड्याच्या वजनाइतके असते असे निरीक्षणावरून लक्षात आले आहे. सुप्रसिद्ध ब्रिटिश पक्षितज्ज्ञ डॉ. डब्ल्यू. ई. कोलिंग (Dr. W. E. Collinge) यांच्या मतानुसार, एक चिमणी एका दिवसात २२० ते २६० वेळा आपल्या घरट्यात अन्न घेऊन येते; ज्यामध्ये वेगवेगळ्या अळ्यांचा व इतर कीटकांचा समावेश असतो. एका जर्मन पक्षितज्ज्ञाने अंदाज मांडलेला आहे की, ‘टोपीवाला’ या पक्ष्याची एक जोडी तिच्या पिल्लासह एका वर्षात कमीतकमी १२० दशलक्ष कीटकांची अंडी किंवा १ लाख ५० हजार अळ्या आणि कोष नष्ट करते. यावरून असे लक्षात येते की; कीटकांच्या वाढीवर व कीटकांमुळे होणार्‍या उपद्रवावर नियंत्रण ठेवण्यासाठी, मोठ्या प्रमाणात नैसर्गिकरीत्या पक्ष्यांची मदत होते. निसर्गातील अन्नसाखळीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे.
वनीकरणासाठी साहाय्यभूत ठरणारे पक्षी
परागीभवनाचे, तसेच अनेक वनस्पतींच्या बिया इतरत्र विखुरण्याचे महत्त्वाचे काम पक्ष्यांमार्फत होत असल्यामुळे वनीकरणाच्या दृष्टीने पक्ष्यांंच्या भूमिकेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ठरावीक वनस्पतीच्या प्रजातींचे अस्तित्व हे ठरावीक पक्ष्यांच्या अस्तित्वाशी प्रत्यक्षरीत्या संबधित आहे. पक्ष्यांच्या खाण्याच्या संदर्भातील सूक्ष्म निरीक्षणाने मी हे ठामपणे नमूद करू शकतो की; बोरवर्गीय प्रजाती, कडुलिंब, वड, उंबर, पिंपळ यांसारख्या अनेक प्रजातींच्या वनस्पतींची; तसेच इतर वनस्पतींची फळे हे पक्षी खातात आणि न पचलेल्या बिया त्यांच्या विष्ठेद्वारे बाहेर टाकतात किंवा काही वेळाने तोंडावाटे इतरत्र पसरवतात. यामध्ये प्रामुख्याने बुलबुल़, मैना़, कोकिळा, सातभाई, तांबट, धनेश, कबुतरे या पक्ष्यांचासुद्धा समावेश होतो. त्याचप्रमाणे बुलबुल व तांबट हे पक्षी मोठ्या प्रमाणात चंदनाच्या बिया विखुरतात.
वनीकरणाच्या दृष्टीकोनातून फायदेशीर असलेला पक्ष्यांचा हा गुण काही बाबतींत मात्र आज हानिकारक ठरतो आहे. उदाहरणार्थ, मोठ्या प्रमाणात होत असलेला घाणेरी किंवा टनटनी या वनस्पतींचा प्रसार. पक्ष्यांच्या माध्यमातून या वनस्पतींच्या बिया विखुरण्याचे काम हळद्या, बुलबुल, मैना, सातभाई यांसारख्या विविध पक्ष्यांमार्फत होत असून या झाडांची वाढती संख्या आपल्या परिसरातील अधिवासामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करत आहे.
कुरतडणार्‍या प्राण्यांपासून संरक्षण करणारे पक्षी
कुरतडणार्‍या प्राण्यांचे विनाशक म्हणून घुबड, पिंगळा, नारझीनक (Kestrel), बहिरी ससाणा (Hawk) आणि इतर शिकारी पक्षी ओळखले जातात. आपल्या पाळीव पक्ष्यांना त्रास देणारे पक्षी म्हणूनही ते ओळखले जात असले; तरी शेताची नासाडी करणार्‍या आणि अनेक आजारांना आमंत्रण देणार्‍या उंदीर-घुशींवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे काम हे शिकारी पक्षी करत असतात. त्यामुळे ते शेतीसाठी उपयोगी असणार्‍या पक्ष्यांइतकेच महत्त्वाचे ठरतात.
मराठवाड्यामध्ये एके काळी प्लेगची महाभयंकर साथ पसरली होती, त्याच काळात तिथे उंदरांची आणि कुरतडणार्‍या इतर प्राण्यांचीही बेसुमार वाढ झालेली होती. या प्राण्यांची संख्या आटोक्यात आणण्यात शिकारी पक्ष्यांचे योगदानही खूप महत्त्वाचे राहिले आहे. या काळात शिकारी पक्ष्यांच्या खाद्यात मोठ्या प्रमाणात शेतातील उंदरांचा समावेश असल्याचा उल्लेख डॉ. सलीम अली यांच्या एका अभ्यासात आढळतो. त्यात त्यांनी शेतीतील उंदीर खाण्याचे काम विशेषतः शृंगी घुबडाकडून झाल्याचे नमूद केले.
मोल प्रजातीचे उंदीर वर्षभर प्रजनन करतात आणि ते एका वेळी पाच ते दहा पिलांना जन्म देतात, मात्र ऑक्टोबरमध्ये व नोव्हेंबरमध्ये ही संख्या चौदा ते अठरापर्यंत जाते. उंदीर हे तितकेच विनाशक व प्रजोत्पादक असतात. पक्ष्यांनी मारलेली उंदराची एक जोडी म्हणजे ८८० उंदरांची संख्या वाढण्यावर ठेवलेला अंकुश आहे. घुबडाची व इतर अनेक निशाचर पक्ष्यांची उपजीविका मोठ्या प्रमाणात उंदरांवर होत असते. त्यामुळे गरुड, घुबड, पिंगळा यांसारखे विविध शिकारी पक्षी शेतीसाठी किंबहुना शेतकर्‍यांसाठी वरदानच आहेत. शृंगी जातीची घुबडे एका रात्रीत एक किंवा त्याहीपेक्षा जास्त कुरतडणारे प्राणी खात असतात. घुबडाची एक जोडी व त्यांची पिल्ले मिळून जवळपास एक हजार कुरतडणार्‍या प्राण्यांना खात असतात. त्यामुळे घुबड शेतकर्‍यांचे खरे मदतनीस आहेत.
उंदरांमुळे गहू, तांदूळ यांसारख्या पिकांचे १० ते ५० टक्के उत्पादन कमी झाल्याचे दिसून येते. कत्तलखान्याच्या बाहेर पडलेले अथवा टाकलेले पदार्थ, कोंबडीवर्गीय प्राणी, उंदीर, बेडूक हे उपद्रवी प्राणी शिकारी पक्ष्यांचे अन्न असते. त्यामुळे निसर्गातील घाण, किंबहुना शेतीतील पिकांना यापासून निर्माण होणारा धोका, कमी होण्यास मदत मिळते.
परागीभवनासाठी मदत करणारे पक्षी
मधमाशा, फुलपाखरे आणि इतर कीटक यांप्रमाणेच विविध कुळांतील व प्रजातींमधील पक्षीही फुलाच्या विजातीय फलनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात, मात्र पक्ष्यांच्या या भूमिकेला कीटकांइतकी दाद दिली जात नाही. फुलांच्या नळकांड्यातील तळापासून मध शोषण्यासाठी बहुतेक पक्ष्यांची चोच व जीभ यांच्या रचनेत, तसेच त्यांच्या कार्यपद्धतीत बदल घडले आहेत. फुलांमधील मधात मोठ्या प्रमाणात कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) असतात व त्यांतून इतकी पुरेशी पोषक तत्त्वे मिळतात की, काही फूलपक्षी हे कमीअधिक प्रमाणात यांवरच उपजीविका करतात. मधापर्यत पोहोचण्याच्या प्रयत्नांत पक्ष्यांचे डोके पुंकेसराच्या संपर्कात येते व परिपक्व सोनेरी परागकण पिसांना चिकटतात आणि त्यानंतर भेट दिल्या गेलेल्या फुलाच्या परिपक्व झालेल्या स्त्रीकेसरापर्यंत ते आपोआप वाहून नेले जातात़  साहजिकच, त्यातून फुलाचे विजातीय फलन होते.
काही वनस्पतींच्या प्रजातींसाठी ‘सूर्यपक्षी’ हे महत्त्वाचे परागवाहक आहेत. आपल्या परिसरातील ज्वारी, बाजरी, सूर्यफूल यांसारख्या पिकांच्या फुलोराअवस्थेत बरेच पक्षी कणसावर बसून त्या ठिकाणी असणारे कीटक खात असतात, त्या वेळी त्यांच्या वजनाने ते कणीस इतर कणसांवरती आपटते व परागीभवन घडून येते. यामध्ये सुगरण, सातभाई, वटवटे यांसारखे पक्षीही मोलाची मदत करतात.
एकूणच, शेती आणि पर्यावरण संवर्धन यांमध्ये पक्ष्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, मात्र आपल्या अजाणतेपणामुळे शेतीसाठी होणार्‍या फायद्यापुरताच भारतातील पक्ष्यांसंबंधीचा अभ्यास मर्यादित राहिला. भारताच्या तुलनेत उत्तर अमेरिकेतील आणि युरोपातील काही देशांत झालेला पक्ष्यांचा अभ्यास अधिक व्यापक स्वरूपात राहिला असून, परदेशांतील पक्ष्यांविषयींचे संशोधन हे तेथील पीकरचनेशी आणि पक्ष्यांमुळे शेतीला होणारे फायदे व नुकसान यांचे योग्य संतुलन राखण्याशी संबंधित राहिले आहे. या संशोधनाच्या परिणामांअंतर्गत पक्ष्यांच्या अस्तित्वाचे महत्त्व लक्षात आल्यामुळे पक्ष्यांकडून शेतीचे जे नुकसान होते, त्याची योग्य ती भरपाई शेतकर्‍यांना तेथील शासनामार्फत दिली जाते. हे लक्षात घेऊन भारतासारख्या कृषिप्रधान देशानेसुद्धा अशा प्रकारच्या संशोधनांवर भर देण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
Source
 डॉ. महेश गायकवाड, पर्यावरण-अभ्यासक व अध्यक्ष, निसर्गजागर प्रतिष्ठान, बारामती.
संपर्क: 99224 14822
माहिती स्रोत; वनराई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »