फूल शेतीतून नफा

0

कमी कालावधीत मिळेल फूल शेतीतून नफा
########################
Source:

डॉ. जी. जी. जाधव, डॉ. मनीषा देशमुख 

########################

झेंडू : 

हवामान, जमीन : उष्ण- कोरडे, तसेच दमट हवामान मानवते. काही संकरित बुटक्या जाती थंड हवामानात उत्तम वाढतात. 

जाती : 
१) आफ्रिकन झेंडू : १ ते १.५ मीटर उंच झाड, फुले मोठी आणि त्यावर केशरी पिवळ्या रंगाची छटा. हारासाठी वापर. 
जाती : कॅकर जॅक, गियाना गोल्ड, आफ्रिकन टॉल, डबल मिक्स्ड, जायंट डबल, आफ्रिकन ऑरेंज, आफ्रिकन यलो क्लायमॅक्स, गोल्ड एज, काउन ऑफ गोल्ड, हवाई अलास्का. 
२) फ्रेंच झेंडू : झाडे ३० ते ५० सें.मी. उंचीची आणि झुडपांसारखी. फुलांचा आकार लहान ते मध्यम. बगीचात ताटव्यांमध्ये लावतात. 
जाती : रेड ब्रोकेड, रस्टी रेड, स्प्रे, बटरबॉल, बटरस्कॉच, लेमन ड्रॉप्स, फ्रेंच डबल मिक्स्ड. 
काही प्रचलित जाती : मखमली, गेंदा, गेंदा डबल, पुसा नारंगी, गेंदा पुसा, बसंती गेंदा. 

रोपेनिर्मिती : दाेन ते एक मीटर आकाराचे गादीवाफे बनवावेत. गादीवाफ्यात शेणखत मिसळून २ ते ३ सें.मी. अंतरावर ओळीत बी पेरावे. बारीक मातीच्या थराने झाकून घ्यावे. नंतर झारीने पाणी द्यावे. बी उगवेपर्यंत सकाळ – संध्याकाळ झारीने पाणी द्यावे. पुढे वाफ्यातून पाटाने पाणी द्यावे. 

लागवड : जमिनीची मशागत करून एका हेक्टरमध्ये २५ ते ३० गाड्या शेणखत मिसळावे. सपाट वाफे किंवा सरी- वरंब्यावर हंगाम व प्रकारानुसार ४५ x ३० सें.मी. किंवा ६० x ३० सें.मी. अंतरावर लागवड करावी. मागील हंगामातील हेक्टरी ७५० ते १२५० ग्रॅम बियाणे वापरावे. पुनर्लागवडीकरिता ३ ते ४ आठवड्यांची रोपे वापरावीत. प्रत्येक ठिकाणी एकच रोप लावावे. 

खत व्यवस्थापन : हेक्टरी १०० किलो नत्र : ५० किलो स्फुरद : २५ किलो पालाश द्यावे. संपूर्ण स्फुरद व पालाश आणि अर्धे नत्र लागवडीच्या वेळी आणि उर्वरित अर्धे नत्र एक महिन्याने द्यावे. 
पाणी व्यवस्थापन : पावसाळ्यात १५ व उन्हाळ्यात ५ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. कळ्या आल्यापासून तोडणी संपेपर्यंत पाण्याचा ताण पडू देऊ नये. 

मोगरा : 
जमीन : हलकी ते मध्यम, उत्तम निचरा होणारी (सामू ६.५ ते ७.५) जमीन योग्य. गाळाची, वाळूमिश्रित पोयटा जमिनीत अधिक उत्पादन येते
पूर्वमशागत : जमीन २ ते ३ वेळा नांगरून घ्यावी. दोन ते तीन वखराच्या पाळ्या द्याव्यात. वखराच्या शेवटच्या पाळीसोबत हेक्टरी १० ते १५ टन शेणखत जमिनीत मिसळावे. तणे वेचून काढून वाफे बांधून घ्यावेत. 
लागवड : जमिनीत १ x १ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे करून माती आणि शेणखताने समप्रमाणात भरावेत. चांगला पाऊस झाल्यावर लागवड करावी. 
खते : हेक्टरी १२० किलो नत्र : २४० किलो स्फुरद : २० किलो पालाश द्यावे. छाटणीअगोदर खांदणी करताना जानेवारीत अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे. उरलेले नत्र कळ्या धरण्याच्या वेळी द्यावे. 
पाणी : पावसाळ्यात जमिनीच्या मगदुराप्रमाणे नियमित पाणी द्यावे. हिवाळ्यात १० ते १२ दिवसांनी, तर उन्हाळ्यात ५ ते ७ दिवसांनी पाणी द्यावे. 

गुलाब : 
हवामान : समशीतोष्ण हवामान, मोकळी हवा, भरपूर सूर्यप्रकाश व मध्यम तापमान योग्य. 
जमीन : उत्तम निचरा होणारी, पोयट्याची जमीन (सामू ६ ते ७.५) चांगली. 
लागवड : लागवड पावसाळ्यात करावी. सप्टेंबर – ऑक्टोबर हा काळसुद्धा उत्तम आहे. थंडीत लागवड करू नये. 
लागवडीची पद्धत : 
१) कलमे लावून अथवा जागेवर वाढलेल्या खुंटावर चांगल्या जातीचे डोळे भरून नंतर त्या कलमाची लागवड करता येते. 
२) खात्रीशीर रोपवाटिकेतूनच कलमे आणून लागवड करावी. कलमे प्लॅस्टिकच्या पिशवीतून काढताना कलमाची हंडी न फोडता अलगदपणे वेगळी करावी. 
३) कलम खड्ड्यात लावताना त्याचा सांधा जमिनीपासून ८ ते १० सें.मी. वर ठेवावा. बांबूची काठी रोवून आधार द्यावा. लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. कलमाजवळ एक टक्का बोर्डोमिश्रणाचे द्रावण टाकावे. 

पाणी व्यवस्थापन : पावसाळ्यात पाऊस नसताना १५ दिवसांनी, हिवाळ्यात १० ते १२, तर उन्हाळ्यात ५ ते ७ दिवसांनी पाणी द्यावे. ठिबक सिंचन पद्धत फायदेशीर. 
आंतरमशागत : 
१) बाग तणविरहित ठेवावी. कलमाच्या सांध्याखालून येणारी जंगली खुंटावरील फूट वेळोवेळी काढून टाकावी. 
२) बागेत पाणी साचू देऊ नये. सुरवातीच्या कळ्या खुडून टाकाव्यात, म्हणजे झाडाची शाखीय वाढ जोमदार होईल. 
३) मोठ्या आकाराची फुले मिळावीत म्हणून प्रत्येक दांड्यावर एकच कळी ठेवावी. 

 
१) लागवडीपासून १५ दिवसांनी प्रत्येक झाडास १० ग्रॅम युरिया द्यावा. एक महिन्याने १० ग्रॅम डी.ए.पी. अधिक १० ग्रॅम युरिया द्यावा. 
२) लागवडीनंतर दोन महिन्यांनी प्रत्येक झाडास २५ ग्रॅम १९ः१९ः१९ अधिक २० ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट द्यावे. 
३) लागवडीपासून तीन महिन्यांनी प्रत्येक झाडाला शेणखत दोन किलो अधिक ५० ग्रॅम निंबोळी खत द्यावे. 
४) दुसऱ्या वर्षी प्रतिहेक्टरी २५ टन शेणखत, ६०० किलो नत्र : २०० किलो स्फुरद : २०० किलो पालाश द्यावे. 

निशिगंध : 
हवामान : उष्ण व दमट हवामान चांगले. कोरड्या हवामानात पाण्याची सोय असल्यास चांगले उत्पादन. 
लागवडीची वेळ : वर्षभरात केव्हाही लागवड केली तरी चालते. मे ते जूनचा पहिला पंधरवडा योग्य. मात्र जास्त पाऊस (जूनचा दुसरा पंधरवडा – जुलै महिना) व जास्त थंडी (नोव्हेंबर – डिसेंबर) असलेल्या काळात लागवड करू नये. 

लागवडीची पद्धत : सारख्या आकाराचे आणि २० ते ३० ग्रॅम वजनाचे कंद लागवडीसाठी वापरावेत. कंद मागील वर्षाच्या गुलछडीच्या पिकापासून निवडतात. कंद काढून २-३ आठवडे सावलीत पसरून ठेवावेत. 

जमीन : उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. क्षारयुक्त, चोपण जमीन अयोग्य. 

पूर्वमशागत : जमिनीची उभी- आडवी नांगरणी करून हराळी, लव्हाळा इत्यादी तणे मुळासकट वेचून काढावीत. त्यानंतर कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. लागवड २० x २० सें.मी. अंतरावर करावी. 

जाती : 
सिंगल – फुले पांढरीशुभ्र, सुवासिक, फुलांचा दांडा बारीक, फुलदाणीत, गुच्छ व हारांमध्ये वापर. 
डबल : सुवास कमी व दांडा भरपूर जाड, फुलदाणीसाठी योग्य. 
सेमी डबल : कळीच्या अवस्थेत पांढरीशुभ्र, फुलदाणी व गुच्छासाठी योग्य. 

खते व पाणी : हेक्टरी २०० किलो नत्र : ३०० किलो स्फुरद : २०० किलो पालाश द्यावे. संपूर्ण स्फुरद व पालाश आणि एकतृतीयांश नत्र लागवडीच्या वेळी द्यावे. पीक २ ते ४ पानांवर असताना प्रत्येक वेळी ६५ किलो नत्र द्यावे. 

गॅलार्डिया : 
हवामान : उष्ण व दमट हवामान चांगले. मोकळी हवा, भरपूर सूर्यप्रकाश आणि मध्यम तापमान लाभदायक. लागवडीच्या काळात २० ते ३५ अंश सेल्सिअस तापमान चांगले. अतिपर्जन्यवृष्टी व कडाक्याची थंडी (१० से.हून कमी तापमान) मानवत नाही. 

जमीन : झाड काटक असल्यामुळे ते हलक्या ते मध्यम जमिनीत चांगले उत्पादन देते. पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. शक्यतो मध्यम पोयट्याची (सामू ५ ते ८) जमीन लागवडीसाठी निवडावी. 

जाती : 
पिक्टा : फुले आकाराने मोठी, पण एकेरी पाकळी. उदा. इंडियन चीफ, डॅझलर, टेस्टा फिएस्टा. 
लॉरेन्झियाना : फुले मोठी व दुहेरी पाकळी. उदा. रेड पिक्टा मिक्स्ड, सनशाईन, गेईटी डबल मिक्स्ड, डबल ट्रेटा. 

खत व्यवस्थापन : हेक्टरी १०० किलो नत्र : ५० किलो स्फुरद : ५० किलो पालाश द्यावे. संपूर्ण स्फुरद व पालाश आणि अर्धे नत्र लागवडीवेळी आणि उर्वरित नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे. 

पाणी व्यवस्थापन : पावसाळ्यात आवश्‍यकतेनुसार १५ दिवसांनी, तर उन्हाळ्यात ५ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. कळ्या आल्यापासून तोडणी संपेपर्यंत पाण्याचा ताण पडू देऊ नये. 

शेवंती : 
हवामान : भरपूर सूर्यप्रकाश व समशीतोष्ण हवामान चांगले. सुरवातीच्या शाकीय वाढीसाठी माेठा दिवस व २० ते ३० अंश सेल्सिअस तापमान आवश्‍यक. कळ्या व फुले येण्याच्या काळात मात्र दिवस लहान व तापमान १० ते १५ अंश सेल्सिअस इतके गरजेचे असते. दीर्घकाळ अतिवृष्टी हानिकारक असते. 

जमीन : हलकी ते मध्यम, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन ( सामू ६.५ ते ७) निवडावी. 
पूर्वमशागत : जमीन उभी – आडवी नांगरून कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन भुसभुशीत करून घ्यावी. शेवटच्या कुळवापूर्वी हेक्टरी ५० गाड्या शेणखत टाकून जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. 

लागवड : लागवड काशा (सकर्स), तसेच फाटे कलमापासून केली जाते. ३० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. काशा किंवा कलमे बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून, सऱ्यांमध्ये दोन रोपांत ३० सें.मी अंतर ठेवून लावून घ्याव्यात. लागवड दुपारनंतर कडक ऊन कमी झाल्यावर केल्याने मर कमी होते. 

खत व्यवस्थापन : हेक्टरी ३०० किलो नत्र : २०० किलो स्फुरद : २०० किलो पालाश द्यावे. १०० किलो नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीवेळी द्यावे. १०० किलो नत्राचा दुसरा हप्ता त्यानंतर एक महिन्याने व उर्वरित नत्राचा तिसरा हप्ता त्यानंतर एक महिन्याने द्यावा. 

पाणी व्यवस्थापन : हवामान तसेच जमिनीच्या मगदुराप्रमाणे ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. कळ्या व फुले लागण्याच्या काळात पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. मात्र जरुरीपेक्षा जास्त पाणी झाल्यास मूळ व खोडकूज रोगाचा प्रादुर्भाव होतो. 

आंतरमशागत : वेळोवेळी निंदणी करून तणनियंत्रण करावे, त्यामुळे जमीन भुसभुशीत राहून मुळे व फांद्यांची वाढ होते. फुलांच्या वजनाने झाड जमिनीवर पडून फुलांची प्रत खराब होऊ नये यासाठी झाडाला काठीचा आधार द्यावा. 

जाती : पीकेव्ही शुभ्रा, राजा, पिवळी रेवडी, पांढरी रेवडी, सोनाली, तारा, बग्गी, बिरबल सहानी, आयआयएचआर -४ . 

संपर्क : डॉ. जी. जी. जाधव, ९४२२९३९०६७ 
(डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

फूलशेती पीक संरक्षण 
१) फुलकिडे : ही कीड गुलाब, अॅस्टर, शेवंती, झेंडू, मोगरा व गॅलार्डिया या सर्व फूलपिकांत येते. 
नुकसानीचा प्रकार : पिले व प्रौढ हे कोवळी पाने, शेंडे, फुले आदी खरवडून त्यातून रसशोषण करतात. त्यामुळे पाने, फुले आकसून वेडीवाकडी होतात. 

नियंत्रण : फवारणी – प्रति लिटर पाणी (प्रादुर्भाव दिसताच) 
डायमिथोएट (३० टक्के प्रवाही) २.५ मि.लि. 
आवश्‍यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने कीटकनाशक बदलून व सल्ला घेऊन दुसरी फवारणी करावी. 

२) लाल कोळी : गुलाब फूलपिकांत येते. 
नुकसानीचा प्रकार : पिले व प्रौढ पानांतून रस शोषण करतात; परिणामी पाने पिवळी पडून गळून पडतात. 
नियंत्रण : प्रति लिटर पाणी (प्रादुर्भाव वाढल्यास) 
आवश्‍यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी. 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »